पलानीसामी गटाने पनीरसेल्वम यांच्यावर बाटल्या फेकल्या !

तमिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्षात वर्चस्वासाठी संघर्ष !

(‘अण्णाद्रमुक’ म्हणजे ‘अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम’ (अखिल भारतीय अण्णा द्रविड प्रगती संघ))

‘अण्णाद्रमुक’ पक्षाचे नेते ओ. पनीरसेल्वम (डावीकडील) आणि ई. पलानीसामी
पक्षाचे प्रमुख कोण होणार, यावरून पक्षांतर्गत संघर्ष

चेन्नई (तमिळनाडू) – वर्ष २०१६ मध्ये अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांचा मृत्यू झाल्यापासूनच अण्णाद्रमुक पक्षाचे प्रमुख कोण होणार, यावरून पक्षांतर्गत संघर्ष चालू आहे. अण्णाद्रमुक पक्षात एकल नेतृत्वावरून २३ जून या दिवशी संघर्ष झाला. पक्षाच्या एका बैठकीच्या वेळी व्यासपिठावर उपस्थित माजी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते पनीरसेल्वम यांच्यावर पक्षाचे संयुक्त समन्वयक ई. पलानीसामी यांच्या समर्थकांनी बाटल्या फेकल्या. पनीरसेल्वम यांना तेथून पळ काढावा लागला. पक्षातील फूट टाळण्यासाठी तमिल मगन हुसेन यांची पक्षाच्या बैठकीचे नेतृत्व करण्यासाठी सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. पक्षाची पुढील बैठक ११ जुलै या दिवशी होईल.

पक्षात एकच नेतृत्व असावे, अशी मागणी पूर्वीही झाली होती. पलानीसामी यांच्या पाठीराख्यांनी ती केली होती. त्यानंतर पनीरसेल्वम यांच्या समर्थकांनी फलक लावून त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘पनीरसेल्वम यांची दिवंगत जयललिता यांनी नेता म्हणून निवड केली होती’, असे त्यात म्हटले होते.

संपादकीय भूमिका

जे राजकीय पक्ष अंतर्गत राजकारणात गुंतून एकमेकांवर आक्रमण करतात, ते राष्ट्रहितासाठी कधीतरी प्रयत्न करू शकतील का ? अशा राजकीय पक्षांमुळेच लोकशाही अपयशी ठरत आहे. या दु:स्थितीवरून सात्त्विक राजकारण्यांच्या ‘हिंदु राष्ट्रा’ची अपरिहार्यता लक्षात येते !