श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘रथोत्सव’ साजरा करण्याविषयी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेले मार्गदर्शन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले दैवी विभूती आहेत’, हे विश्वाला सांगण्याची वेळ आली असल्याने गुरुदेवांचा ‘रथोत्सव’ साजरा होत आहे !

नाडीपट्टीचे वाचन करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन्

‘जे अध्यात्माच्या शिखरावर आहेत, ज्ञानी लोकांमध्ये जे सर्वांत ज्ञानी आहेत, ज्यांच्यामध्ये अन्य जिवांना अनुग्रह देण्याची क्षमता आहे, ज्यांना अहंकारी जिवांचा अहं न्यून करण्याचे रहस्य ठाऊक आहे, जे वैद्यांचेही वैद्य आहेत, ज्यांच्या करुणेला तोड नाही, असे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे कलियुगातील दैवी विभूती आहेत’, हे आता विश्वाला सांगण्याची वेळ आली आहे. त्यासाठीच या वर्षी श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचा हा रथोत्सव आहे.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. २०१, १३.५.२०२२)

१. गुरुदेवांच्या समोर त्यांच्या उजवीकडे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि डावीकडे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आसन ग्रहण करावे !

 

‘गुरुदेवांच्या जन्मतिथीला आपल्याला गुरुदेवांचा रथोत्सव साजरा करायचा आहे. या रथोत्सवाच्या वेळी रथात गुरुदेव बसलेले असतील, तिथे त्यांच्या जवळ एक शंख ठेवावा. या रथात श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या आध्यात्मिक आसनाच्या समोर उजवीकडे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि डावीकडे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आसन ग्रहण करावे.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९७, ७.३.२०२२)

२. रथोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आतुर असलेल्या देवता आणि सप्तर्षी !

‘स्वर्गलोकातील सर्व देवी-देवता, त्यांचे गण आणि ऋषिलोकातील ८८ सहस्र ऋषी ‘श्रीमन्नारायणाचे अंशावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले कधी रथावर आरूढ होऊन येतील आणि त्यांना या रूपात नारायणाचे दर्शन होईल’, या दिवसाची वाट पहात आहेत. पृथ्वीवर श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचा हा रथोत्सव होत असतांना सर्व देवी-देवता, ऋषी, सप्तर्षी उपस्थित असतील. श्रीमन्नारायणाचा हा रथ पृथ्वीवर येण्यासाठी आम्ही सप्तर्षी सहस्रो वर्षे वाट पहात आहोत.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९६, ३.२.२०२२)

३. रथोत्सवाच्या वेळी सनातनच्या ३ गुरूंनी परिधान करायच्या वस्त्रांविषयी

अ. रथोत्सवात गुरुदेवांनी ‘कनकपुष्कराज’ (Yellow Sapphire) या रत्नासारख्या रंगाचे, म्हणजे सोनेरी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पाचूसारख्या (Green Emerald) हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
इ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जांभळ्या खड्याच्या रंगाचे (Amethyst Stone), म्हणजे जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९७, ७.३.२०२२)

रथोत्सवात ‘श्रीराम शाळिग्राम’ पालखी असण्याविषयी सप्तर्षींनी सांगितलेली सूत्रे

‘श्रीराम शाळिग्रामा’ची पालखी (गोलात शाळिग्राम मोठा करून दाखवला आहे.)

१. श्रीरामनवमीच्या दिवशी नेपाळमधून हिमालयातील शाळिग्राम क्षेत्र असलेल्या दामोदर कुंडातून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ‘श्रीराम शाळिग्राम’ प्राप्त होणे : ‘नेपाळमध्ये हिमालयाच्या उत्तरेकडे ‘अन्नपूर्णा पर्वत’ शृंखला आहे. या अन्नपूर्णा पर्वत शृंखलेमध्ये ‘दामोदर कुंड’ नावाचा गोड पाण्याचा तलाव आहे. हा ‘दामोदर कुंड’ तलावच शाळिग्रामचे पृथ्वीवरील उत्पत्तीस्थान आहे. १०.४.२०२२ या श्रीरामनवमीच्या दिवशी दामोदर कुंडातून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे ‘श्रीराम शाळिग्राम’ आला. (‘हा वैशिष्ट्यपूर्ण शाळिग्राम कसा मिळाला ?’, याविषयी पुढे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लिखाण प्रसिद्ध होणार आहे.’ – संकलक) १५.४.२०२२ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या जीवनाडीपट्टी वाचनाच्या वेळी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी हा शाळिग्राम नेला होता. या वेळी सप्तर्षींनी या शाळिग्रामाविषयी पुढील सूत्रे सांगितली.’ – श्री. विनायक शानभाग

२. सत्ययुगात पृथ्वीवर असलेला शाळिग्राम हे पृथ्वीवर श्रीविष्णूचे साक्षात् रूप आहे ! : ‘शाळिग्राम हे पृथ्वीवर श्रीविष्णूचे साक्षात् रूप आहे. रथोत्सवात श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या रथासमोर एक पालखी असावी. या पालखीमध्ये दामोदर कुंडातून मिळालेला ‘श्रीराम शाळिग्राम’ ठेवावा. श्रीविष्णूच्या कृपेने सनातन संस्थेला ‘सुवर्णरेषा असलेला श्रीराम शाळिग्राम’ लाभला आहे. शाळिग्रामावर एक सुवर्णरेषा आहे. ती साक्षात् श्रीविष्णूची रेषा आहे. ती श्रीविष्णूची ब्रह्मांड चालवणारी ब्रह्मनाडीच आहे. भगिरथाच्या प्रयत्नांमुळे ‘गंगा’ शिवाच्या जटेतून पृथ्वीवर आली. ‘श्रीराम शाळिग्राम’ हा शिवाच्या जटेतील गंगेत निर्माण झालेला शाळिग्राम आहे. हा शाळिग्राम सत्ययुगातच पृथ्वीवर आला.

३. कलियुगात भगवंताला सनातनच्या तीन गुरूंकडून स्वतःची पूजा करवून घ्यायची आहे; म्हणून तो आता या शाळिग्रामच्या रूपात सनातन संस्थेकडे आला आहे. कलियुगात रामराज्याच्या स्थापनेसाठी हा शाळिग्राम आलेला आहे.’

– सप्तर्षी (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९८, १५.४.२०२२)

साधक रथोत्सवाविषयी जसा भाव ठेवतील, त्याप्रमाणे त्यांना फळ मिळेल !

‘गाभार्‍यातील मूळ मूर्तीच्या दर्शनासाठी भक्त मंदिरात जातात. सर्व भक्तांना काही कारणामुळे मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही. यासाठीच देवांचा रथोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. देव रथात बसल्यामुळे आणि रथाचे गावात भ्रमण झाल्याने त्या देवाचे सर्वांना दर्शन होते. आता साधक आणि भक्त यांना श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचे भरभरून दर्शन मिळावे; म्हणून आम्ही सप्तर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव साजरा करावा’, असे सांगितले आहे. रथात विराजमान असलेले श्रीमन्नारायणाचे अंशावतार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती ज्याचा जसा भाव असेल, तसे त्या जिवाला फळ मिळेल. साधकांनी ‘रथात साक्षात् श्रीमन्नारायण विराजमान आहेत’, असा भाव ठेवल्यास त्यांना श्रीविष्णूचा आशीर्वाद मिळेल. साधकांनी ‘रथात ‘गुरु’ विराजमान आहेत’, असा भाव ठेवल्यास त्यांना तसा आशीर्वाद मिळेल. जसा ज्याचा भाव असेल, तसे त्याला ईश्वर ‘तथास्तु’ म्हणणार आहे. जो श्रीमहाविष्णु त्रेतायुगात श्रीरामाच्या रूपात आला, द्वापरयुगात श्रीकृष्णाच्या रूपात आला, तोच आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात जन्माला आला आहे आणि तेच कलियुगातील या चरणात धर्मसंस्थापना करणार आहेत, हेच त्रिवार सत्य आहे.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. २०१, १३.५.२०२२)

• परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले,  श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे भगवंताचे अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. ‘सनातन प्रभात’च्या संपादकांचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही या विशेषांकात लिखाण प्रसिद्ध करत आहोत. – संपादक