‘मनाविरुद्ध घडणार्‍या प्रसंगांत टोकाचा विचार न करता ‘त्यांना सामोरे कसे जावे’, याविषयी साधिकेने केलेले चिंतन !

सुश्री (कु.) वर्षा जबडे

१. साधकांमध्ये स्वीकारण्याची वृत्ती अत्यल्प असल्यास ते भावनाशील बनून मायेत अडकण्याची शक्यता असणे

‘साधकांमध्ये स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता अल्प-अधिक प्रमाणात असते, तसेच परिस्थिती अन् प्रसंग यांना स्वीकारण्याची वृत्तीही अल्प किंवा मध्यम प्रमाणात असते. त्यांच्यात अहंची तीव्रता अधिक असल्याने काही प्रसंगांत त्यांना वाईट वाटून ते भावनाशील होतात आणि टोकाच्या भूमिकेतून विचार करू लागतात. काही साधक या संघर्षापासून दूर जाण्यासाठी घरी जाऊन शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदी करण्याचा विचार करू लागतात.

२. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे स्मरण करून अंतर्मुख होणे

अशा साधकांनी वास्तवाचा विचार करून ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेमुळे आपण चुकीचा विचार करत आहोत’, हे लक्षात घ्यायला हवे. त्याच वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांनी क्षणोक्षणी दिलेल्या शिकवणीचा विचार करायला हवा आणि मनाला विचारायला पाहिजे की, ‘मी खरंच साधनेविना राहू शकणार आहे का ? गुरुमाऊली माझा हात कधी सोडणार आहेत का ?’, असा विचार केल्यावर मन अंतर्मुख होऊ लागते आणि साधनेचे प्रयत्न करण्यासाठी मनाची सिद्धता होऊ लागते.

३. लहान ध्येय घेऊन प्रयत्नांना आरंभ करणे

त्यानंतर ‘मनाविरुद्ध घडणार्‍या प्रसंगांतही साधना म्हणून काय प्रयत्न करू शकतो ?’, याविषयीचे लहान ध्येय घेऊन प्रयत्नांना आरंभ करावा ! या प्रयत्नांचा दिवसातून ८ ते १० वेळा आढावा घ्यावा.

३ अ. व्यष्टी स्तरावर : मनात अनावश्यक विचार येत असतील, तर ‘दिवसभर अखंड नामजप करायचा आहे’, असे ध्येय ठरवणे.

३ आ. समष्टी स्तरावर : अन्य साधकांचा विचार करून इतरांना साहाय्य करण्याचा भाग वाढवणे. यामुळे स्वकेंद्रितपणा न्यून होऊ लागून मनात होणार्‍या संघर्षाचा विसर पडू लागतो.’

प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता !’

– सुश्री (कु.) वर्षा जबडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक