Afghan Taliban Forces Attack Pakistan : पाकिस्तान-अफगाण सीमेवरील युद्धात तालिबानने ठार केले पाकचे १९ सैनिक

तालिबानने पाकिस्तानी सैन्याच्या २ चौक्यांवर मिळवले नियंत्रण !

काबूल (अफगाणिस्तान) – पाकिस्तानी वायूदलाने अफगाणिस्तानात केलेल्या आक्रमणाचा सूड घेण्यासाठी तालिबानच्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर आक्रमण केले. तोफगोळे आणि अवजड मशीनगन यांद्वारे केलेल्या आक्रमणात पाकिस्तानी सैन्याची मोठी हानी झाली आहे. यात आतापर्यंत पाकचे १९ सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर अनेक जण घायाळ झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याने याविषयी मौन बाळगले आहे.

१. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाच्या सूत्राने ‘टोलो न्यूज’ला सांगितले की, ही लढाई ड्युरंड रेषेवरील खोस्त आणि पक्तिया प्रांतात झाली. या आक्रमणानंतर पाकिस्तानी सैन्याच्या २ चौक्यांवर नियंत्रण मिळवले आहे. पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्त्यांवर मोर्टारद्वारे आक्रमण केले, ज्यात ३ नागरिक ठार झाले.

२. ‘टोलो न्यूज’च्या वृत्तानुसार तालिबानी सैनिकांनी ड्युरंड रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या जाळल्या. या चौक्यांवरून पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत किंवा पळून गेले आहेत.

३. पाकिस्तानातील पेशावर प्रांतावर तालिबान दावा करत आहे. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यामध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या आतंकवादी संघटनेने गेल्या वर्षभरात सुमारे ४०० पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे.