Chinmoy Das Targeted by Yunus Govt : बांगलादेशातील अंतरिम सरकार चिन्मय प्रभु यांना सोडू इच्छित नाही ! – Advocate Rabindra Ghosh

पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांचा आरोप

पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष (डावीकडे) इस्कॉनचे सदस्य चिन्मय प्रभु (उजवीकडे)

कोलकाता (बंगाल) – बांगलादेशातील इस्कॉनचे सदस्य चिन्मय प्रभु यांनी कथित देशद्रोहाच्या गुन्ह्यावरून अटक करण्यात आली आहे. त्यांना जामीन देण्याला विविध कारणाने टाळाटाळ केली जात आहे. या संदर्भात त्यांचे अधिवक्ता पू. रवींद्र घोष यांनी आरोप केला आहे की, चिन्मय प्रभु यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत.

चिन्मय प्रभु यांची कारागृहातून लवकर सुटका होऊ नये, अशी पोलीस आणि सरकार यांची इच्छा आहे; मात्र आम्ही त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष व इस्कॉन कोलकाता अध्यक्ष राधारमण दास

पू. घोष सध्या बंगालच्या बराकपूरमध्ये रहात आहेत. ते उपचारासाठी भारतात आले आहेत. कोलकाता येथे त्यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली आणि इस्कॉन कोलकाता अध्यक्ष राधारमण दास यांची भेट घेतली.

बांगलादेशात जाऊन अत्याचार सहन करणार्‍यांसाठी लढेन !

पू. रवींद्र घोष बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष आहेत. कोलकाता येथील इस्कॉन मंदिराबाहेर पत्रकारांसमवेत बोलतांना पू. घोष म्हणाले की, मी बांगलादेशात परत जाईन आणि तेथील अत्याचार सहन करणार्‍या लोकांसाठी लढेन.

मी चिन्मय प्रभु यांची लढाई लढत राहीन !

पू. घोष यांनी दावा केला की त्यांनी चितगाव सत्र न्यायालयात उपस्थित राहून जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांना तसे करण्याची अनुमती नव्हती. आता या प्रकरणाची सुनावणी २ जानेवारी २०२५ ला होणार आहे. माझी प्रकृती ठीक राहिल्यास मी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहीन. मी हे करू शकत नसल्यास, मी एका चांगल्या अधिवक्त्याची व्यवस्था करीन. मी त्यांची लढाई लढत राहीन.

बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर आक्रमणाच्या ६ सहस्र ६५० घटना

पू. घोष म्हणाले की, बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून अल्पसंख्यांकांवर आक्रमणांच्या ६ सहस्र ६५० घटना घडल्या आहेत. मी अधिवक्ता असून माझा राजकारणाशी संबंध नाही. कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत.

संपादकीय भूमिका

पू. (अधिवक्ता) घोष यांचा आरोप खोटा आहे, असे आतापर्यंतच्या बांगलादेश सरकारच्या भूमिकेवरून वाटत नाही. तेथील अनेक हिंदु नेत्यांनीही सरकार, पोलीस आणि सैन्य यांच्या हिंदुद्वेष्ट्या भूमिकेविषयी ‘सनातन प्रभात’ला वेळोवेळी माहिती दिली आहे. सरकार हिंदुद्वेषी असल्याने प्रभु यांचे कारागृहातच काही बरेवाईट झाले, तर आश्‍चर्य वाटू नये ! त्यापूर्वी जागतिक स्तरावर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे !