कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांची जे.एन्. पटेल आयोगाकडे साक्ष नोंद !

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांची जे.एन्. पटेल आयोगाकडे साक्ष नोंद

मुंबई – कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांना जे.एन्. पटेल आयोगाकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आले होते. ५ मे या दिवशी येथील ‘सह्याद्री गेस्ट हाऊस’ येथे शरद पवार यांची आयोगाकडून चौकशी करण्यात आली. या वेळी शरद पवार यांनी मांडलेली काही प्रमुख सूत्रे

१. कोरेगाव भीमा प्रकरणी मला दुसर्‍या दिवशी वृत्तमाध्यमांतून कळले. जेव्हा हा आयोग निर्मित झाला, तेव्हा मला इथे येऊन जबाब देण्याचे समन्स आले. त्यानुसार मी माझे प्रतिज्ञापत्र सादर केले.
२. एल्गार परिषदेला ज्या व्यक्ती आल्या नव्हत्या, त्यांच्यावरही गुन्हे नोंद झाले. हे योग्य नाही. त्यामुळे ‘या प्रकरणात एल्गार परिषदेविषयी पोलिसांनी केलेले अन्वेषण हे पोलीस विभागाला काळिमा फासणारे आहे’, असे मी बोललो असेन; पण कोरेगाव भीमाविषयी बोललो नाही. या दोन्ही घटना वेगळ्या आहेत.
३. एल्गार परिषदेच्या आयोजकांविषयी मला माहिती नाही. या संपूर्ण वादाचा आरंभ वढू बुद्रुकमधून झाला का ? हे मला ठाऊक नाही; परंतु काही उजव्या विचारसरणीचे लोक तसे वातावरण निर्माण करू पहात होते, हे मला दंगलीनंतर समजले. (कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या प्रकरणी पू. भिडेगुरुजी यांचे शरद पवार यांनी नाव घेतले; मात्र नंतर घूमजाव करून त्यांचा सहभाग नसल्याचे सांगितले. शरद पवार यांनी कोणत्या आधारावर त्यांचे नाव घेतले ? आणि पुन्हा ‘उजव्या विचारसरणीचे लोक वातावरण निर्माण करू पहात होते’, हे कोणत्या आधारावर विधान करतात ? यातून हिंदुत्वनिष्ठांविषयी संबंध नसतांना संशय निर्माण करण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा त्यांचा छुपा हेतू उघड होत नाही का ? – संपादक) कोरेगाव भीमा हिंसाचार हे पोलिसांचे अपयश होते. हे थांबवण्याची तत्कालीन राज्य सरकारची राजकीय इच्छाशक्ती नव्हती. सामाजिक माध्यमांवरील चुकीची माहिती त्यांनी दुर्लक्षित केली. त्यामुळे समाजविघातकांचा यामागील हेतू साध्य झाला. कायदा-सुव्यवस्था राखणे आणि निदर्शनांमध्ये समाजकंटकांना आंदोलनांतून अडथळा निर्माण करण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलणे, हे पोलिसांचे दायित्व आहे.