मध्यप्रदेशचे भाजप सरकार मंदिरांच्या भूमीहिन पुजार्‍यांना प्रतिमहा ५ सहस्र रुपये मानधन देणार !

भोपाळ (मध्यप्रदेश) – भूमीहिन असणार्‍या मंदिरांच्या पुजार्‍यांना प्रतिमहा ५ सहस्र रुपये मानधन देण्याची घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. येथील गुफा मंदिर परिसरात ‘अक्षय उत्सव’ नावाच्या कार्यक्रमात भगवान श्री परशुरामच्या २१ फूट उंच मूर्तीचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘शाळेच्या अभ्यासक्रमात भगवान श्री परशुरामाशी संबंधित धडाही समाविष्ट करण्यात येणार आहे’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

मंदिरांचे व्यवस्थापन पुजार्‍यांकडूनच हवे !

मुख्यमंत्री चौहान पुढे म्हणाले की, मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन पुजार्‍यांच्या हातातच असले पाहिजे. यात सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नाही. मंदिरांची भूमी कधीही विकली जाणार नाही. सरकार मंदिरांच्या भूमीचा कधीही लिलाव करणार नाही. जर करायचा असेल, तर केवळ पुजार्‍याकडूनच हे केले जाईल. त्यासाठी समिती स्थापन केली जाईल. काही ठिकाणी भूमी विकण्यात आल्याची आणि तेथे गडबड झाल्याचीही माहिती मिळाली आहे.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्येक राज्य सरकारने असा निर्णय घेतला पाहिजे !