युक्रेनमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांच्या विरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागेपुढे पहाणार नाही ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची धमकी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) – युक्रेनमध्ये हस्तक्षेप करणार्‍या देशांनी आम्हाला धमकावल्यास आम्ही अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागेपुढे पहाणार नाही, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्‍चात्त्य देशांना दिली आहे. पुतिन सेंट पीटर्सबर्ग येथे रशियन खासदारांना संबोधित करत होते. रशियाने काही दिवसांपूर्वी आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र जगातील कोणत्याही लक्ष्यावर मारा करू शकते, असा दावा रशियाने केला आहे.

पुतिन म्हणाले की,

१. युक्रेनमध्ये जे काही घडत आहे त्यात हस्तक्षेप करण्याचा कुणाचा हेतू असेल, तर त्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, रशिया ते अजिबात सहन करणार नाही. जो कुणी रशियाला धमकावेल त्याला आम्ही प्राणघातक आणि वेगाने प्रत्युत्तर देऊ. आमच्याकडे यासाठी आवश्यक सर्व शस्त्रे आहेत. आमच्याकडे अशी संहारक शस्त्रेदेखील आहेत, ज्यांच्याविषयी इतर कुणीही बढाई मारू शकत नाही. आम्हाला त्यांच्याविषयी अधिक सांगायचे नाही; परंतु आम्ही त्यांचा वापर करू.

२. रशियन सैन्य निश्‍चितपणे सर्व उद्दिष्ट पूर्ण करील. आमचे सैनिक मोठे संघर्ष टाळण्यासाठी लढत आहेत. युक्रेन जैविक शस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. हाच आपल्या देशाला खरा धोका आहे. रशियाने नेहमीच युक्रेनशी सहानुभूती दर्शवली आणि एक मित्र, एक सहकारी आणि एक भाऊ म्हणून युक्रेनसमवेत काम केले. आम्ही मुक्त युक्रेन राज्याचा विचार केला. आम्हाला वाटले की, ते नेहमीच आमच्यासाठी अनुकूल राज्य असेल; मात्र, तसे झाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.