देशात फाशीची शिक्षा देणे चालूच ठेवणार ! – नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

जो बायडेन यांनी ३७ गुन्हेगारांची फाशीची शिक्षा केली रहित !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – मी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच न्याय विभागाला बलात्कारी, खुनी आणि रानटी लोकांपासून अमेरिकी कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देत रहाण्याचे आदेश देईन. देशात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्था भक्कम करणार, अशी घोषणा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी २३ डिसेंबर या दिवशी ३७ गुन्हेगारांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत पालटली. त्यावर ट्रम्प यांनी वरील घोषणा केली. एकदा राष्ट्रपतींनी एखाद्याची शिक्षा अल्प केली किंवा माफ केली की ती पालटता येत नाही.

बायडेन यांनी स्वतःच्या मुलाची शिक्षाही केली होती माफ !

यापूर्वी जो बायडेन यांनी त्यांचा मुलगा हंटर बायडेन याची शिक्षाही माफ केली होती. हंटर बायडेन बेकायदेशीर बंदूक बाळगणे आणि कर चुकवल्याच्या प्रकरणी शिक्षा भोगत होते. या प्रकरणी बायडेन म्हणाले होते की, माझा कायदा आणि सुव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास आहे; मात्र राजकारणाने ते गलिच्छ केले आहे. हे न्यायव्यवस्थेचे अपयश आहे. हंटरच्या खटल्याचा पाठपुरावा करणार्‍या कोणत्याही विवेकी व्यक्तीला हे समजेल की, तो माझा मुलगा आहे म्हणून त्याला लक्ष्य केले गेले.