लोकशाही कि भ्रष्टशाही ?
राज्यव्यवस्थेच्या आणि देशाच्या विरोधात कार्य करणार्यांना मोकळीक देणे, हे व्यवस्थेला लज्जास्पद !
भाग ३.
भाग २. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/548544.html
३. भारतातील लोकशाहीची शोकांतिका !
‘सध्या भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. आपल्याला भारतीय स्वातंत्र्याचा अभिमान आहेच; मात्र आजही अनेक वृद्ध ‘या लोकशाहीपेक्षा इंग्रजांची सत्ता बरी होती’, असे मत व्यक्त करतांना दिसतात ! याचा अर्थ त्यांना पारतंत्र्य हवे आहे का ? तर निश्चितच नाही ! मात्र ‘त्या काळातील राजकीय, प्रशासकीय व्यवस्था ही आजच्या तुलनेत चांगली होती’, असा त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ असतो. या दृष्टीने आपणही स्वातंत्र्योत्तर काळाचे ढोबळ मानाने अवलोकन केले असता, भारतात लोकशाही अस्तित्वात आल्यावर भारताची शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण, राजकारण आदी सर्वच क्षेत्रांत परम अधोगती झाल्याचे दिसून येते. प्रगती झाली असेलच, तर ती भ्रष्टाचार, गुंडगिरी, अनैतिकता, स्वैराचार, धर्मांधता, जातीयवाद, फुटीरतावाद, देशद्रोह आदींमध्ये ! अर्थात् निष्कर्ष काढायचा झाल्यास, भारतात तरी लोकशाही अस्तित्वात असल्यामुळे चांगले परिणाम झाल्याचे दिसून येत नाहीत !
३ अ. राष्ट्रवादाच्या कसोटीवरही विद्यमान लोकशाहीची झालेली परवड ! : भारतात अनेक ठिकाणी राष्ट्रविघातक कृती होतांना दिसतात. याची काही उदाहरणे खाली दिली आहेत.
३ अ १. गुंटूर, आंध्रप्रदेश येथील ‘जीना टॉवर’वर राष्ट्रध्वज फडकावू पहाणार्या व्यक्तीलाच पोलिसांनी बळजोरीने अटक करणे : याच वर्षीच्या प्रजासत्ताकदिनी आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे ‘जीना टॉवर’वर भारतीय राष्ट्रध्वज फडकावू पहाणार्या व्यक्तीलाच पोलीस बळजोरीने अटक करून घेऊन गेले. दुर्दैव म्हणजे या पोलिसांनी आणि राजकीय सरकारने भारताच्या राष्ट्रीय सन्मानाचे रक्षण करण्याची शपथ घेतलेली असते ! ते भारतीय नागरिकांनी भरलेल्या करातून वेतन घेत असतात; मात्र प्रत्यक्षात ते भारताची फाळणी करून पाकिस्तान बनवणार्या ‘जीना’चे संरक्षण करत आहेत.
३ अ २. भारतात अल्पसंख्यबहुल भागांत रहाणार्यांचे पाकप्रेम ! : आजही भारतात अनेक ठिकाणी शत्रूराष्ट्र पाकचा झेंडा बिनधास्तपणे फडकावला जातो, तसेच भारतातील अनेक अल्पसंख्यबहुल प्रदेशांत पाकिस्तानच्या समर्थनार्थ आणि भारतविरोधी घोषणा दिल्या जातात. मागील वर्षी क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यात प्रथमच पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर या प्रदेशांत आनंदोत्सव, जल्लोष पहायला मिळाला होता. जम्मू-काश्मीर राज्यातील काश्मीरमध्ये तर उघडउघड ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’च्या घोषणा दिल्या जातात.
३ अ ३. अफगाणिस्तानमध्ये आतंकवादी तालिबान्यांची सत्ता आल्यावर भारतातील धर्मांध नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करणे : भारतातील काही राजकीय पक्षांच्या मुसलमान नेत्यांनी तर अफगाणिस्तानातील लोकशाही उलथवून तेथे आतंकवादी तालिबानचे अत्याचारी सरकार सत्तेत आल्यावर तालिबानचे अभिनंदन केले. अशांची लोकशाहीप्रतीची भूमिकाच या घटनेतून स्पष्ट होते.
३ अ ४. भारतात फुटीरतावादी आतंकवादी संघटनेचे वाढते स्तोम ! : भारतात पंजाबमधील खलिस्तानवादी या फुटीरतावादी गटाने पुन्हा डोके वर काढले असून शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने केलेल्या आंदोलनात मृत खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याची छायाचित्रे असणारे ध्वज, बॅनर, भित्तीपत्रके उघडपणे वापरले गेले. देहलीतील लाल किल्ल्यावरील भारताचा तिरंगा उतरवून तेथे खलिस्तानचा ध्वज लावला गेला.
(सौजन्य : TFI English)
३ अ ५. फुटीरतावाद्यांनी तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आनंदोत्सव साजरा करणे : याहून भयंकर म्हणजे भारताचे पहिले तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (सी.डी.एस्.) जनरल बिपीन रावत यांचा अन्य सैन्याधिकार्यांसह एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्यानंतर समाजमाध्यमांवर आनंदोत्सव साजरा केला गेला. या फुटीरतावादाची आता दक्षिण भारतातही लागण होत असून तमिळनाडूच्या कन्याकुमारी येथील जी.के. शिवराजभूपती याने ‘फेसबूक’वर लिहिले, ‘फॅसिस्टां’चे भाड्याचे हुकूमशहा बिपीन रावत यांच्यासाठी अश्रू ढाळणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’ देशातील प्रमुख राजकीय पक्षांचे काही नेते अशा प्रसंगांत राष्ट्रवादाच्या भूमिकेतून एकत्र न येता, त्या फुटीरतावाद्यांचे समर्थन करतांना दिसत होते.
३ अ ६. राष्ट्रघातकी कारवायांचे अड्डे बनलेली भारतातील काही विश्वविद्यालये ! : भारताच्या काही शिक्षणसंस्थांमधूनही राष्ट्रवादाची शिकवण देण्याऐवजी राष्ट्र्रद्रोही मनोवृत्ती घडवली जात आहे. त्याचे उदाहरण म्हणजे, काही वर्षांपूर्वी देहलीतील जे.एन्.यू.मध्ये (जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये) भारताचे तुकडे-तुकडे करण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे एका मार्गाला दिलेले नाव पुसून ‘बॅ. महंमद अली जीना’ असे नाव दिले गेले. स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनांतून भारतातील या विश्वविद्यालयांतून किती देशद्रोही आणि विषारी पिढी घडवली जात आहे, हे लक्षात येते. या देशद्रोही पिढीतील विद्यार्थी उच्चशिक्षित असून ते उद्या भारताच्या राज्यव्यवस्थेत सहभागी होऊन विविध महत्त्वांच्या पदांवर काम करणार आहेत. याचा अर्थ असा होतो की, ते राज्यव्यवस्थेत राहून, भारताचे वेतन घेऊन भारतीय राज्यव्यवस्थेच्याच विरोधात कार्य करणार आहेत.
यात कहर म्हणजे, आपल्या लोकशाहीधिष्ठित देशाचे इतके लचके तोडूनही असे प्रकार करणार्या कुणावरही जरब बसेल, अशी कारवाई केली जात नाही ! न्यायालयही राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहून त्याचा अनादर करणार्यांना त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य संबोधून मोकळीक देत आहे. आज कुणालाच कायद्याचे भय राहिलेले नाही. हे विद्यमान लोकशाहीचे घोर अपयश आहे. याला ‘भारतीय लोकशाहीची शोकांतिका’ म्हणायचे नाही, तर काय म्हणायचे ?’
भाग ४. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/549071.html
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.