आज लहान मुलांचे अभ्यासाच्या कारणास्तव ‘मोबाईल’ (भ्रमणभाष) हाताळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या काळात चालू झालेली ‘ऑनलाईन’ची प्रक्रिया अजूनही चालू आहे. अभ्यासाची गैरसोय होऊ नये; म्हणून पालक आणि शिक्षक मुलांना या व्यसनापासून दूर ठेवू शकत नाही, ही अनेकांनी व्यक्त केलेली शोकांतिका आहे. एका वृत्तपत्रातील लेखातून या व्यसनाच्या आहारी जाण्याची परिसीमा दर्शवणारे उदाहरण दिले होते, ‘मैदानी खेळ खेळण्याच्या वयात मुले मैदानावरही बसून ‘मोबाईल गेम’च खेळत आहेत.’
भविष्यातही भ्रमणभाष असेल; पण शाळा/महाविद्यालयाचे मैदान, खेळ खेळण्यासाठी सवंगडी, शिकवण्यासाठी शिक्षक, जिद्दी मन, मोकळे वातावरण आणि कितीही उड्या मारता येतील, पळता येईल असे शरीर, मन आणि बालपण नसेल. नवनवीन गोष्टी अवगत करण्याचे हे वय आयुष्यात एकदाच येते, त्याचे सोनेही तेव्हाच करून घेणे आवश्यक आहे.
मैदानी खेळांतून मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास अधिक प्रमाणात होतो. आट्यापाट्या, कबड्डी, कुस्ती, खो-खो, ‘फुटबॉल’, ‘बॅडमिंटन’, मल्लखांब, लंगडी, लगोरी अशा अनेक खेळांची नावे यामध्ये घेता येतील. यातील बहुतांश खेळ भारतीय आहेत. यातून शरीर तंदुरुस्त आणि आरोग्यदायी होते. शरिराची लवचिकता आणि कणखरता वाढते, स्नायूंना बळकटी येते. चपळता, अचूक निर्णयक्षमता, विजिगीषूवृत्ती, प्रसंगावधानता, सतर्कता, पराजय स्वीकारणे, झोकून देणे आदी अनेक बौद्धिक आणि मानसिक गुणांचाही विकास होत असतो. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वय हे वरील सर्व गोष्टी अवगत करण्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य असते. या वयात शरिराला दिलेले कष्ट ते सहज सहन करू शकते, यातून आत्मविश्वासही वाढतो. स्वत:वर कोणतेही दायित्व नसल्याने ताणविरहित गोष्टी करणे, त्यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होते.
शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वय हे शरीर, मन, बुद्धी यांना स्वयंशिस्त लावण्याचे वय आहे. यातून आदर्श व्यक्तीमत्त्व घडते; मात्र या वयात मुलांच्या हातातील भ्रमणभाषमुळे आदर्श व्यक्तीमत्त्व लोप पावत जाते. भ्रमणभाषमुळे मुले आभासी जगात रमतात. त्यामुळे वेळीच सावध होऊन त्यांना आभासी जगातून बाहेर काढून वास्तव जगाची जाणीव करून दिली पाहिजे. पालकांनी अभ्यासासाठी दिवसभरातील ठराविक वेळ भ्रमणभाष वापरण्यास देणे आणि अन्य वेळी विविध कौशल्ये आत्मसात करण्यावर भर देणे, हे पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाभदायी ठरेल.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी