रशियामध्ये जाऊ नका, प्रवास करू नका !

रशिया-युक्रेन यांच्यातील संभाव्य युद्धाच्या शक्यतेमुळे अमेरिकेचा त्याच्या नागरिकांना सल्ला

भारत कधी त्याच्या नागरिकांना अशा प्रकारचा सल्ला देऊन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो का ? – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव निर्माण झाल्यामुळे सध्या रशियामध्ये जाऊ नका किंवा तेथे प्रवास करू नका. अमेरिकेच्या नागरिकांना तेथे पुष्कळ त्रास सहन करावा लागू शकतो आणि त्यांच्यापर्यंत पोचणे आम्हाला फार अवघड जाईल, असा सल्ला अमेरिकेने त्याच्या नागरिकांना दिला आहे. तसेच युक्रेनच्या राजधानीत असणार्‍या अमेरिकेच्या राजदूतांच्या कुटुंबांना तात्काळ देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने तिच्या नागरिकांना रशियात न जाण्याचा सल्ला दिला आहे. रशियाने युक्रेनलगत सीमेवर १ लाखाहून अधिक सैन्य जमा केले आहे. रशियाने सैन्यासह रणगाडे, तोफखाना आणि क्षेपणास्त्रेही सीमेवर तैनात केली आहेत. याद्वारे युक्रेनच्या क्रिमियाप्रमाणे आणखी एखाद्या भूभागावर नियंत्रण मिळवण्याचा रशियाचा हेतू असावा, अशीही चर्चा चालू आहे.

युक्रेनच्या नाटोमधील संभाव्य समावेशामुळे रशिया आक्रमक !

‘उत्तर अटलांटिक करार संघटना’ अर्थात् ‘नाटो’मध्ये युक्रेनच्या संभाव्य समावेशामुळे रशिया आक्रमक बनला आहे. युक्रेन ‘नाटो’मध्ये सहभागी झाल्यास या संघटनेची व्याप्ती थेट रशियाच्या सीमेपर्यंत येऊन पोचते. यापूर्वी लिथुआनिया, एस्टोनिया आणि लॅटव्हिया या देशांना नाटोमध्ये सहभागी करून विशेषत: अमेरिकेने रशियावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, अशी रशियाच्या नेत्यांची आणि विशेषत: पुतिन यांची भावना आहे. ही राष्ट्रे पूर्वीच्या सोव्हिएत संघामध्ये होती. ‘नाटो’ ही सैनिकी सहकार्य संघटना आहे. या संघटनेत सहभागी झालेल्या कोणत्याही एका सदस्य देशावरील आक्रमण हे संपूर्ण संघटनेवरील आक्रमण मानून त्याला प्रतिसाद दिला जातो. वर्ष १९९७ नंतर पूर्व युरोपातील १४ देश या संघटनेत सहभागी झाले. या देशांना अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी अशा मोठ्या पाश्‍चिमात्य सत्तांकडून शस्त्रसामग्रीचा पुरवठा होतोच, खेरीज नाटोच्या फौजा आणि क्षेपणास्त्रेही या देशांमध्ये तैनात आहेत.