शब्दांना सांधून (जोडून) त्यांचा जोडशब्द बनवणारा ‘संधी’ !

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘स्वरसंधी’चे प्रकार पाहिले. आजच्या लेखात ‘व्यंजनसंधी’ म्हणजे काय आणि ते कसे सिद्ध होतात ?’, यांविषयी जाणून घेऊ.

(लेखांक ७ – भाग ४)

लेखांक ७. भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/540369.html

४. संधीचे प्रकार

४ आ. व्यंजनसंधी : ‘या संधीविषयी आजच्यासह पुढील रविवारीही लेख प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या लेखामध्ये देण्यात येणारी माहिती समजून घेण्यासाठी आजच्या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध तांत्रिक शब्दांविषयीचे विवेचन स्वतःजवळ ठेवल्यास सोयीचे होईल.

४ आ १. भाषेतील ‘व्यंजने’ म्हणजे अपूर्ण उच्चारली जाणारी मुळाक्षरे, म्हणजेच ‘वर्ण’ ! : मराठी भाषेत ‘अ, आ, इ…’पासून ‘…स्, ह्, ळ्’पर्यंत ४८ मुळाक्षरे आहेत. या मुळाक्षरांना ‘वर्ण’ असेही म्हणतात. मुळाक्षरांमधील ‘क्, ख्, ग्….’पासून ‘….स्, ह्, ळ्’पर्यंतच्या ३४ मुळाक्षरांना ‘व्यंजने’ असे म्हणतात. व्यंजने ही नेहमीच ‘क्’, ‘ख्’, ‘ग्’ अशी अपूर्ण उच्चारांची असतात. त्यामुळे ती लिहितांना त्यांचा पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे. व्यंजनांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी त्यांच्यामध्ये ‘अ’ हा स्वर मिसळावा लागतो, उदा. ‘क् + अ = क’. विविध शब्द सिद्ध होतांना ‘अ’च्या ऐवजी ‘आ’, ‘इ’, ‘ई’ इत्यादी स्वरसुद्धा व्यंजनांमध्ये मिसळतात.

४ आ २. व्यंजनांचे पाच गट : ३४ व्यंजनांपैकी पहिल्या २५ व्यंजनांचे पाच गट पडतात. ‘क्’, ‘च्’, ‘ट्’, ‘त्’ आणि ‘प्’ हे ते पाच गट आहेत. ‘क्’ या गटामध्ये ‘ख्, ग्, घ्, ङ्’ ही व्यंजने येतात. याप्रमाणे अन्य चार गट आणि त्यांच्यामध्ये येणारी व्यंजने पुढीलप्रमाणे आहेत.

‘च्’, छ्, ज्, झ्, ञ्

‘ट्’, ठ्, ड्, ढ्, ण्

‘त्’, थ्, द्, ध्, न्

‘प्’, फ्, ब्, भ्, म्

४ आ ३. अनुनासिके : व्यंजनांच्या पाच गटांमधील प्रत्येक गटातील शेवटच्या ‘ङ्’, ‘ञ्’, ‘ण्’, ‘न्’ आणि ‘म्’ या व्यंजनांचा उच्चार करतांना तो तोंडासह नाकातूनही होतो. त्यामुळे त्यांना ‘अनुनासिके’ असे म्हणतात.

४ आ ४. कठोर वर्ण : जे वर्ण उच्चारावयास कठीण असतात, त्यांना ‘कठोर वर्ण’ असे म्हणतात. व्यंजनांच्या पाच गटांपैकी प्रत्येक गटातील पहिली दोन व्यंजने, म्हणजे ‘क्, ख्’; ‘च्, छ्’; ‘ट्, ठ्’; ‘त्, थ्’ आणि ‘प्, फ्’ ही अन्य व्यंजनांच्या तुलनेत उच्चारावयास कठीण आहेत. यांच्यासह ‘श्, ष् आणि स्’ या व्यंजनांचाही उच्चार करणे तुलनेने कठीण आहे. या सर्व व्यंजनांना ‘कठोर वर्ण’ असे म्हटले जाते.

४ आ ५. मृदू वर्ण : जे वर्ण उच्चारावयास कोमल, तसेच सोपे असतात, त्यांना ‘मृदू वर्ण’ असे म्हणतात. ‘अ’पासून ‘औ’पर्यंतचे बारा स्वर हे उच्चारावयास कोमल असतात. त्याचबरोबर व्यंजनांच्या पाच गटांपैकी प्रत्येक गटातील शेवटची तीन व्यंजने, म्हणजे ‘ग्, घ्, ङ्’; ‘ज्, झ्, ञ्’; ‘ड्, ढ्, ण्’; ‘द्, ध्, न्’ आणि ‘ब्, भ्, म्’ ही तुलनेने उच्चारावयास सोपी असतात. अन्य व्यंजनांपैकी ‘य्, र्, ल्, व्, ह्, ळ्’ ही व्यंजनेही कोमल आहेत. या सर्व वर्णांना ‘मृदू वर्ण’ असे म्हटले जाते.

४ आ ६. ‘व्यंजनसंधी’चे प्रकार

४ आ ६ अ. व्यंजनांच्या पाच गटांतील अनुनासिके वगळून अन्य कोणत्याही व्यंजनापुढे ‘कठोर व्यंजन’ येणे : ‘आपद् + काळ’ या दोन शब्दांमधील पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर व्यंजनांच्या पाच गटांपैकी ‘त्’ या गटातील आहे. दुसर्‍या शब्दातील पहिले अक्षर ‘क्’ हे ‘कठोर व्यंजन’ आहे. या दोहोंची संधी होतांना ‘द्’ या अक्षराच्या जागी त्याच्या गटाचा प्रमुख असलेला ‘त्’ हा पहिला ‘कठोर वर्ण’ येतो. अशा प्रकारे हा संधी ‘आपद् + काळ = द् + क् = त् + क् = त्क्’ असा होतो आणि ‘आपत्काळ’ हा शब्द सिद्ध होतो. या संधीची एकच अट आहे, ती म्हणजे, ‘पहिल्या शब्दातील शेवटचे अक्षर अनुनासिक असता कामा नये.’ अशा प्रकारचे संधी अधिकतर संस्कृत भाषेमध्ये होतात. मराठी भाषेत प्रचलित असलेल्या अशा संधींची फोड केली असता एकत्र येणार्‍या व्यंजनांच्या दोन्ही फोडी ‘आपत्काळ’प्रमाणे वेगवेगळ्या न होता एकसारख्याच होतात. या संधीची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

(क्रमशः पुढील रविवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०२१)