संपादकीय
ज्याज्या राज्यांत भाजपचे शासन आहे, तिथे हिंदूंवरील आघातांच्या संदर्भात कुठल्या ना कुठल्या समस्येवरील उपायांच्या दृष्टीने कायदे अस्तित्वात येत असलेले दिसत आहेत. कर्नाटकमध्ये प्रथम गोरक्षणाचा कायदा झाला आणि आता राज्यातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेऊन निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळले. ‘केवळ हिंदूंच्या मंदिरांत अर्पण होणारे कोट्यवधी रुपयांचे धन सरकारजमा होणे आणि ते सामाजिक किंवा अन्य पंथीय यांच्या कामांसाठी वापरले जाणे’ हा अन्याय हिंदूंवर वर्षानुवर्षे होत आहे. हे सर्व करण्यासाठी ‘राज्यातील मुख्य मंदिरे तेथील २-३ पक्ष अक्षरशः वाटून घेतात आणि त्यांच्यावर त्यांच्या माणसांची नेमणूक करतात’, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. गेली २ दशके हिंदु जनजागृती समिती मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी पोटतिडकीने विविध माध्यमांतून प्रबोधन करत आहे. हिंदुत्वनिष्ठांमध्येही गेल्या ५ वर्षांत याविषयी मोठ्या प्रमाणात जागृती झाली आणि अंतिमतः कर्नाटक सरकारचा हा निर्णय घोषित झाल्यावर हिंदूंसाठी तो अतिशय उत्साहवर्धक ठरला.
जातीद्वेष उकरून काढणारे काँग्रेसी !
हिंदूंना त्यांचा हक्क सहज मिळेल, असा काळ अजून आलेला नाही. हिंदुहिताच्या निर्णयांना वेग आलेला पाहून पुरो(अधो)गामी आणि काँग्रेसी यांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे जाणवू लागले आहे. मंदिरांवरील सरकारचे नियंत्रण काढणे म्हणजे ‘मंदिरातील ब्राह्मण पुजार्यांच्या हातात या मंदिरांचा पैसा जाणार आणि त्यांची मक्तेदारी वाढणार’, ‘त्यातून इतर सर्व समाजाची गुलामगिरी वाढून ८० टक्के समाज ब्राह्मणांच्या नियंत्रणाखाली जाणार’, ‘पुन्हा (कथित) मनुवाद येणार’ असे बोलून काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. नि(अ)धर्मी पुरो(अधो)गामी आणि काँग्रेसी यांनी रंगवलेला हा ‘मनुवाद’ धादांत खोटा आणि ‘आंग्लनिर्मित इतिहास’ आहे, हे धर्माभिमानी हिंदूंनी आता ठासून सांगितले पाहिजे. जातीयवाद वाढवणारा कथित मनुवादाचा हा ‘फोबिया’ (भ्रम) नष्ट करण्यासाठी हिरिरीने त्याचा उदाहरणासहित प्रतिवाद केला पाहिजे. ‘मनु हे क्षत्रिय राजा होते, ब्राह्मण नव्हते’, हेही ठाऊक नसलेल्यांना मनुस्मृतीविषयी बोलायचे असेल, तर प्रथम त्यांनी मनुस्मृतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मनु यांनी प्रसंगी ब्राह्मणांना शूद्रांपेक्षाही अधिक कडक दंड केले आहेत. ‘ब्राह्मणांसह सर्व वर्णांना त्यांची विहित कर्मे चांगली आणि विवेकपूर्वक करता येऊन समाजव्यवस्था उत्तम रहावी’, या उद्देशाने राजा मनु यांनी मनुस्मृति लिहिली आहे. फेड्रिक नित्शे या प्रसिद्ध जर्मन तत्त्वचिंतकाने तर ‘बायबल बंद करा, मनुस्मृती उघडा’, असा आदेशच दिला होता. जगातील यच्चयावत् संस्कृती नष्ट झाल्या असतांना लक्षावधी वर्षांपासून मनुस्मृतीने आमचा समाज अखंड आणि तग धरून ठेवला आहे. ‘ब्राह्मणांनी गुलामगिरी निर्मिली नाही, तर स्वतः त्यागी जीवन जगून लक्षावधी वर्षे संस्कृती अबाधित ठेवली’, हे सत्य आता पुढे येत असल्याने हिंदुद्वेष पसरवणार्यांची डाळ आता अधिक काळ शिजणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
हिंदुहिताच्या निर्णयांविषयी काँग्रेसींनी बोलू नये !
सिद्धरामय्या आणि त्यांच्यासारख्या हिंदुहिताला पाण्यात पहाणार्या अन् विनाकारण हिंदूंची दिशाभूल आणि बुद्धीभेद करून समाजात विद्वेषाचे वातावरण निर्माण करणार्या सर्वांचाच वैचारिक समाचार घेणे, हे आता काळ अनुकूल होत असल्याने हिंदुत्वनिष्ठांना सहज शक्य आहे. राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी संघटित होऊन, वैचारिक प्रतिवाद करून हिंदुहिताच्या निर्णयांत खोडा घालणार्यांना सडेतोड उत्तरे देऊन त्यांची बोलती बंद केली पाहिजे. ज्या काँग्रेसने ७४ वर्षे हिंदुहितासाठी काहीही न करता अन्य पंथियांचे तुष्टीकरण करून केवळ आणि केवळ हिंदूंवर अन्याय केला, त्या काँग्रेसींना हिंदूंनी आता सत्ताच्युत केले आहे; त्यामुळे आता हिंदुहिताच्या निर्णयांविषयी काहीही बोलण्याचा अधिकार काँग्रेसींनी गमावला आहे !
भक्त निर्माेही आणि कर्तव्यपरायण !
आता मंदिरे स्थानिक भक्तांच्या कह्यात गेल्यावर त्याविषयीचे व्यवस्थापन कसे असेल ? आदींच्या संदर्भातील नियम अथवा धोरणे ठरवण्यासाठी शंकराचार्य, संत, हिंदु संघटना, आखाडा परिषद आदींशी चर्चा करावी, असे आवाहनही हिंदु जनजागृती समितीने केले आहे. खरा भक्त हा निर्माेही आणि कर्तव्यपरायण असतो. तो देवाची सत्ता अंतिम मानत असतो, पापभिरू असतो. त्याच्या आवश्यकता आणि आसक्ती दोन्ही न्यून असतात. त्यामुळे भाविकांनी अर्पण केलेल्या धनाचा धर्मशास्त्रानुसार काटेकोर विनियोग करण्याची क्षमता आणि आत्मबल त्याच्याकडे असते. सनातन धर्मपरंपरेत अशा अगणित भक्तांची उदाहरणे आहेत. वैयक्तिक काम करतांना शासकीय व्ययातून आलेल्या तेलाच्या पणतीची ज्योत विझवणार्या आर्य चाणक्य यांची परंपरा आमच्याकडे आहे. भारतातील तीर्थक्षेत्री असलेली अगणित मंदिरे, शक्तीपिठे, ज्योतिर्लिंगे, दत्तस्थाने, स्वयंभू मंदिरे, विष्णूच्या अवतारांची मंदिरे आदी सर्वच प्राचीन आणि अतीप्राचीन आहेत. मठ, मंदिरे हाच भारतदेशाचा आत्मा असल्याने त्यांच्या पैशांचा विनियोग कसा आणि कुठे करायचा याचीही अतीप्राचीन परंपरा आमच्याकडे आहे. १३५ वर्षांपूर्वी जन्मलेल्या आंग्लाळलेल्या काँग्रेसने ते सांगायची आवश्यकता नाही. या संदर्भात अगदी अलीकडच्या काळातील मोठे उदाहरण द्यायचे झाले, तर महाराष्ट्रातील शेगावच्या गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांनी मंदिराचा कारभार उत्तम सांभाळून भाविकांच्या अर्पण धनाचा विनियोग केला. स्वातंत्र्यापूर्वीपर्यंत मंदिरांतील कारभारात कुठे अफरातफर झाली किंवा घोटाळा झाला, भूमी किंवा सोने लाटले असे कधी इतिहासात ऐकले आहे का ? सिद्धरामय्यांनी ऐकले असेल, तर सप्रमाण त्याचे उदाहरण द्यावे अन्यथा हिंदू जागृत होत असल्याने कथित मनूवादाचे तेच तेच घोडे दामटणे आणि जातीद्वेषाची फूट पाडणे बंद करावे, हेच उत्तम !