अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे युक्रेनला आश्वासन
विलमिंग्टन (युक्रेन) – रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तर अमेरिका आणि त्यांचे मित्र देश निर्णायक कारवाई करतील, असा दिलासा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकताच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांना दिला. बायडेन यांनी त्यांच्याशी दूरभाषवर संपर्क साधून हा दिलासा दिला. या दोघांमध्ये युक्रेन लगतच्या सीमेवर रशियाच्या सैन्याच्या वाढत्या उपस्थितीच्या संदर्भात चर्चा झाली. ‘व्हाईट हाऊस’चे माध्यम सचिव जेन साकी यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
१. बायडेन यांनी म्हटले की, रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तर त्याच्यावर आर्थिक निर्बंध लादले जातील. मित्र देशांच्या सल्ल्याविना युरोपवर परिणाम करणार्या कोणत्याही धोरणावर चर्चा करणार नाही, अशी ग्वाहीही बायडेन यांनी दिली.
२. एकीकडे युक्रेन आणि अमेरिका यांच्यात चर्चा चालू असतांना दुसरीकडे ‘या संकटामुळे अमेरिकेसमवेतचे संबंध पूर्णत: संपुष्टात येऊ शकतात’, अशी धमकी रशियाने दिली आहे.