एका पुणे जिल्ह्यात सहस्रो बालके कुपोषित असणे चिंताजनक आहे. ही महाराष्ट्राची प्रगती म्हणायची का ? बालक म्हणजे देशाची भावी पिढी, हे लक्षात घेऊन कुपोषित बालकांचे प्रमाण अल्प करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
पुणे – जिल्ह्यात बालकांच्या करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीमध्ये कुपोषित, तसेच मध्यम स्वरूपाच्या कुपोषित बालकांची श्रेणी निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात २ लाख १२ सहस्र ३१८ बालकांची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये १ सहस्र २८९ बालके मध्यम कुपोषित आणि ३७१ बालके अतीतीव्र कुपोषित असल्याचे आढळले आहे. या बालकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार पुरवण्यात येणार आहे. अजूनही मुलांची पडताळणी पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून आहार पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
महिला आणि बाल कल्याण विभागाने राज्यात गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, तसेच मध्यम आणि तीव्र कुपोषित श्रेणीतील बालकांच्या आरोग्य पडताळणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य विभाग आणि प्रमाणित उपकरणांच्या साहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य तपासणीची प्रक्रिया राबवण्यात येत असून, मातांचे समुपदेशन केले जात आहे.