नौदलाच्या विमानांची देखभाल-दुरुस्ती (मेंटेनंस) करण्यात भारताला आत्मनिर्भर बनवणारे तंत्र केले विकसित !
सावंतवाडी – ‘आत्मनिर्भर भारत’ या धोरणानुसार नौदलाच्या ‘विमानांची देखभाल आणि दुरुस्ती’ (मेंटेनंस) करण्याची सुविधा निर्माण केल्याविषयी नौदलात लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत असलेले मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील सूरज जयसिंग वारंग यांंना ४ डिसेंबर या दिवशी ‘नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदका’ने सन्मानित करण्यात आले. सनातनचे माणगाव येथील साधक श्री. उदयसिंह वारंग यांचे सूरज हे पणतू आहेत.
नौदलातील ‘एम्.आय.जी. २९ के’ या विमानाच्या देखभाल-दुरुस्तीची (मेंटेनंसची) सुविधा भारतात नव्हती. विमानांचे ‘मेंटेनंस’ रशियाकडून करून घेतले जात होते. विमानांसाठी सर्व सुविधा (ओव्हर ऑल फॅसिलिटी) भारतात निर्माण (सेटअप) करण्याविषयी लेफ्टनंट कमांडर सूरज वारंग यांनी प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले. आज विमानांच्या देखभालीसाठी रशियावर अवलंबून रहावे लागत नाही. नौदलाच्या (नेव्हीच्या) विमानांची देखभाल करण्यासाठीच्या सर्व सुविधा भारतात निर्माण होत आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होत आहे. लेफ्टनंट कमांडर सूरज यांच्या या कामाची, तसेच नौदलातील अन्य कामांची नोंद घेऊन नौदलाने त्यांना ‘नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदक’ देऊन सन्मानित केले आहे.
माणगाव येथील अधिवक्ता जयसिंह वारंग आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली वारंग यांचे सूरज हे सुपुत्र आहेत. सूरज यांची पत्नी सौ. ज्युही वारंग याही नौदलामध्ये लेफ्टनंट कमांडर आहेत. सूरज यांचे १० वीपर्यंतचे शिक्षण माणगाव येथील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात झाले. लहानपणापासून त्यांना विमानांविषयी आकर्षण होते आणि त्यांना वैमानिक होण्याची इच्छा होती, असे त्यांचे वडील अधिवक्ता वारंग यांनी सांगितले.
सूरज यांनी ‘एरॉनॉटिकल इंजिनीयर्स’ची पदवी पुणे येथे प्राप्त केली. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यू.पी.एस्.सी.च्या) वतीने घेण्यात येणार्या ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एस्.एस्.बी.) द्वारे त्यांची निवड झाली. नौदलाच्या आय.एन्.ए. इजमल्ला, केरळ येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची नौदलाच्या ‘एव्हीएशन केडर’मध्ये निवड झाली. त्यानंतर मिग २९ के या लढाऊ विमानाचे इंजिनीयरिंग ऑफिसर म्हणून प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांची निवड गोवा येथे फ्रन्टलाईन स्वॉर्डन म्हणून करण्यात आली.
सध्या सूरज वारंग हे एअरोडायनॅमिक स्पेशलायझेशन करता आय.आय.टी. कानपूर येथे प्रशिक्षण घेत आहेत.