समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांचा काळ लोटल्यावर संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी अनेक भाषांची निर्मिती झाली. कालांतराने या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्‍या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

७ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात आपण ‘समास’ म्हणजे काय ?’, ‘सामासिक शब्दाचा ‘विग्रह’, ’समासाचे प्रकार’ आदी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया. (लेखांक ६ – भाग २)


या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/524963.html


कु. सुप्रिया नवरंगे

४. समासाच्या प्रकारांची नावे संस्कृत व्याकरणातील असून त्या नावांचे अर्थ थोडे क्लिष्ट आणि आपल्या दैनंदिन वापराच्या दृष्टीने आवश्यक नसल्यामुळे या लेखात ते अर्थ दिलेले नसणे

या लेखामध्ये समासाचे प्रकार देतांना त्यांची जी नावे दिली आहेत, ती केवळ माहितीसाठी आहेत. त्या नावांना संस्कृत व्याकरणात विशिष्ट अर्थ आहेत; परंतु काही वाचकांना तो भाग थोडा क्लिष्ट वाटण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे, दैनंदिन लेखन-व्यवहारात सामासिक शब्द लिहितांना समासांच्या नावांचा आणि त्या नावांच्या अर्थाचा आपल्याला कुठेही उल्लेख करावा लागत नाही. त्यामुळे या नावांचे अर्थ लेखामध्ये देण्यात आलेले नाहीत. भविष्यात व्याकरणाचा अधिक सखोल अभ्यास मांडतांना हा सर्व भाग देण्यात येईल.
आता समासांचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे यांविषयीची माहिती पाहू.

५. सामासिक शब्दातील पहिला शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा असेल, तर त्या समासास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणत असणे

‘आजन्म’ या सामासिक शब्दात ‘आ’ आणि ‘जन्म’ असे दोन शब्द एकत्र आले आहेत. यांतील ‘आ’ या पहिल्या शब्दामुळे ‘आजन्म’ या शब्दाचा ‘जन्मभर’ हा अर्थ स्पष्ट होतो. केवळ ‘जन्म’ म्हटले, तर हा अर्थ लक्षात येत नाही. त्यामुळे या जोडशब्दात अर्थाच्या दृष्टीने ‘आ’ हा पहिला शब्द अधिक महत्त्वाचा आहे. अशा समासास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. या समासाची काही उदाहरणे आणि ती सुलभतेने लक्षात यावीत, यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

६. सामासिक शब्दातील दुसरा शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा असेल, तर त्या समासास ‘तत्पुरुष समास’ असे म्हणत असणे

‘राजपुत्र’ या सामासिक शब्दामध्ये ‘राज’ आणि ‘पुत्र’ असे दोन शब्द आहेत. त्यांपैकी ‘पुत्र’ हा दुसर्‍या क्रमांकाचा शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे; कारण निवळ ‘राज’ म्हटले, तर त्याचा अर्थ ‘राजा’ असा होतो. ‘राजपुत्र’ या शब्दाद्वारे आपल्याला राजाविषयी बोलावयाचे नसते, तर राजाच्या पुत्राविषयी बोलावयाचे असते. अशा प्रकारे ज्या सामासिक शब्दात त्याच्या अर्थाच्या दृष्टीने दुसरा शब्द अधिक महत्त्वाचा असतो, त्या प्रकारच्या समासास ‘तत्पुरुष समास’, असे म्हणतात. या समासाची काही उदाहरणे आणि ती सुलभतेने लक्षात यावीत, यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

७. ‘कृतज्ञताभाव’ हा शब्द मोठा होत असला, तरी जोडून लिहिण्याचे कारण

या शब्दात ‘कृतज्ञता’ आणि ‘भाव’ असे दोन शब्द आहेत. या पूर्ण शब्दाची फोड ‘कृतज्ञतेचा भाव’ अशी होते. यांतील ‘भाव’ हा शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे; कारण ‘कृतज्ञताभाव’ या शब्दाद्वारे आपण केवळ कृतज्ञतेविषयी बोलत नाही, तर कृतज्ञतेच्या भावाविषयी बोलतो, उदा. ‘नंदनमध्ये कृतज्ञता आहे’, हे वाक्य अर्थाच्या दृष्टीने अपूर्ण आणि अयोग्य आहे. ‘नंदनमध्ये कशाविषयी किंवा कुणाविषयी कृतज्ञता आहे ?’, हे या वाक्यावरून कळत नाही. त्या जागी ‘नंदनमध्ये कृतज्ञताभाव आहे’, असे म्हटल्यास वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. पूर्ण जोडशब्दातील दुसरा शब्द महत्त्वाचा असल्यामुळे हा ‘तत्पुरुष समास’ आहे. त्यामुळे हा शब्द थोडा लांबलचक होत असला, तरी ‘सामासिक शब्द’ या नात्याने जोडून लिहावा. अशा प्रकारची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
शरणागतभाव, बालकभाव, वात्सल्यभाव, सेवकभाव, भोळाभाव इत्यादी.

– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२१)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/529159.html