समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्‍या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

१४ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्या लेखात समासाच्या प्रकारांची काही उदाहरणे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

(लेखांक ६ – भाग ३)


या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/527178.html


कु. सुप्रिया नवरंगे

८. सामासिक शब्दातील दोन्ही शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाचे असतील, तर त्या समासास ‘द्वंद्व समास’ असे म्हणत असणे

‘ऋद्धिसिद्धि’ या सामासिक शब्दात ‘ऋद्धि’ आणि ‘सिद्धि’ असे दोन शब्द आहेत. केवळ ‘ऋद्धि’ म्हटले किंवा केवळ ‘सिद्धि’ म्हटले, तर ‘ऋद्धि आणि सिद्धि’ या पूर्ण अर्थाचा बोध आपल्याला होऊ शकत नाही. याचा अर्थ, ‘हे दोन्ही शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाचे आहेत.’ अशा प्रकारच्या समासाला ‘द्वंद्व समास’ असे म्हणतात. या सामासिक शब्दाची फोड करतांना ‘आणि, अथवा, किंवा, अन्’ आदी शब्द वापरून जोडशब्दातील दोन शब्द परस्परांशी जोडले जातात. या समासाची काही उदाहरणे आणि ती सुलभतेने लक्षात यावीत, यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

८ अ. या नियमाला अपवाद असणारे काही शब्द

८ अ १. राम-लक्ष्मण : हा शब्द प्रचलित मराठी व्याकरणामध्ये ‘द्वंद्व समास’ या नात्याने ‘रामलक्ष्मण’ असा एकत्र लिहिला जातो; परंतु सनातनच्या व्याकरणानुसार आपण तो ‘राम-लक्ष्मण’ असा मध्ये संयोगचिन्ह (-) देऊन लिहितो. याचे कारण असे की, वाचतांना ‘रामलक्ष्मण’ या शब्दापेक्षा ‘राम-लक्ष्मण’ या शब्दावर निवळ दृष्टी टाकली, तरी त्याचा अर्थ झटकन लक्षात येतो. सध्याच्या गतीमान जगामध्ये वाचकाला शब्दावर दृष्टी टाकताच त्याचा अर्थ समजणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे काळानुसार आपण हा पालट केला आहे. पुढे हिंदु राष्ट्रात मात्र ‘रामलक्ष्मण’ हा शब्द आपण मूळ संस्कृत व्याकरणानुसार जोडूनच लिहिणार आहोत. याप्रमाणे अपवाद केलेले आणखी काही शब्द पुढीलप्रमाणे आहेत.
पाप-पुण्य, आई-वडील, मामा-मामी, ने-आण, दोन-तीन, खरे-खोटे इत्यादी.

८ आ. ‘द्वंद्व समासा’चा स्त्रीदेवता आणि पुरुषदेव यांच्याशी संबंधित नियम : स्त्रीदेवता आणि पुरुषदेव यांची नावे एकत्र लिहितांना ती जोडूनच लिहावीत. त्यांच्यामध्ये संयोगचिन्ह (-) देऊ नये. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

८ आ १. एका गाभार्‍यात एकत्र मूर्ती नसलेल्या देवदेवतांची नावे या नियमाला अपवाद असणे : ‘विठ्ठल-रुक्मिणी’, ‘लक्ष्मी-व्यंकटेश’ यांसारख्या देवदेवतांच्या मूर्ती काही पौराणिक कारणांमुळे त्यांच्या प्रमुख मंदिरांत एका गाभार्‍यात स्थित नाहीत. अशा देवदेवतांची नावे लिहितांना मध्ये संयोगचिन्ह (-) द्यावे.

८ इ. समाहार द्वंद्व : यातील सामासिक शब्दाची फोड केल्यास तिच्यातून मूळ जोडशब्दात असलेल्या शब्दांशिवाय त्या शब्दांच्या अर्थाला शोभतील, अशा इतर शब्दांचाही बोध होतो, उदा. ‘चहापाणी’ या शब्दाची फोड केवळ ‘चहा आणि पाणी’, अशी होत नाही, तर ती ‘चहा, पाणी आणि अल्पाहाराचे इतर पदार्थ’, अशी होते; कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, ‘‘आमच्याकडे चहापाण्याला या’’, असे म्हणतो, तेव्हा आपण तिला केवळ चहा आणि पाणी देत नाही, तर बिस्किटे, चिवडा, लाडू, कचोरी किंवा पोहे असे अल्पाहाराचे अन्य पदार्थही देतो. अशा प्रकारच्या समासाला ‘समाहार द्वंद्व’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे आणि ती सुलभतेने समजण्यासाठी त्यांचे विग्रह पुढे दिले आहेत.

(क्रमशः)

– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२१)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/531003.html