समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांचा काळ लोटल्यावर संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी अनेक भाषांची निर्मिती झाली. कालांतराने या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्‍या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

आजच्या लेखात आपण ‘समास’ म्हणजे काय आणि ‘सामासिक शब्द’ व्याकरणदृष्ट्या कसे लिहावेत ?’, यांविषयी जाणून घेऊ.

(लेखांक ६ – भाग १)


कु. सुप्रिया नवरंगे

१. शब्दांची बचत करण्याच्या मनुष्यस्वभावाला पूरक अशी व्याकरणातील व्यवस्था म्हणजे ‘समास’ !

मनुष्याचा बोलतांना सोपे आणि सहजपणे उच्चारता येतील, असे शब्द वापरण्याकडे कल असतो. मनातील विचार व्यक्त करण्यासाठी जेवढे अल्प शब्द वापरता येतील, तेवढे तो वापरतो. एरव्ही अन्य विषयांत कदाचित् काटकसर न करणार्‍या व्यक्तीही बोलतांना किंवा लिहितांना मात्र शब्दांची काटकसर अवश्य करतांना दिसतात. या प्रयत्नात एखादा विचार व्यक्त करतांना काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवले जातात आणि कालांतराने ते शब्द भाषेशी एकजीव होऊन जातात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. कांदेपोहे : ‘कांदे घालून सिद्ध केलेले पोहे’, एवढे सगळे म्हणण्याऐवजी ‘कांदेपोहे’ असे म्हटले जाते. यात ‘घालून, सिद्ध आणि केलेले’ हे तीन शब्द गाळले जातात.

आ. देवघर : ‘देवासाठी घर’ या शब्दांतील ‘साठी’ हा शब्द वगळून ‘देवघर’ असा जोडशब्द सिद्ध केला जातो.

इ. पोळपाट : ‘पोळी लाटण्यासाठी पाट’ यांतील ‘लाटण्यासाठी’ हा शब्द काढून ‘पोळपाट’ हा सुटसुटीत शब्द बनवला जातो.

ई. सप्तर्षी : ‘सप्त (सात) ऋषींचा समूह’ यांतील ‘समूह’ हा शब्द गाळून ‘सप्तर्षी’ हा एक शब्द वापरण्यात येतो.

वरीलप्रमाणे ‘बोलतांना किंवा लिहितांना अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे दोन शब्द एकत्र करून त्यांचा जोडशब्द सिद्ध करणे आणि तो सिद्ध करतांना त्यातील दोन्ही शब्दांचा परस्परसंबंध दाखवणारे अन्य सर्व शब्द गाळून टाकणे, या प्रक्रियेला ‘समास’ असे म्हणतात.’ अशा प्रकारे सिद्ध झालेल्या जोडशब्दाला ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात.

२. सामासिक शब्दाचा ‘विग्रह’

‘सामासिक शब्दात कोणते दोन शब्द एकत्र आले आहेत ? आणि त्यांच्या एकत्र येण्यामुळे त्या जोडशब्दाचा अर्थ काय होतो ?’, हे सांगण्यासाठी आपण त्या शब्दाची फोड करतो; उदा. ‘गावजेवण’ या सामासिक शब्दात ‘गाव’ आणि ‘जेवण’ हे दोन शब्द एकत्र आले आहेत. या पूर्ण शब्दाची फोड ‘गावाला दिलेले जेवण’, अशी होते. या फोड करण्याला ‘सामासिक शब्दाचा ‘विग्रह’ करणे’, असे म्हणतात.

३. समासाचे प्रकार

‘समासात एकत्र आलेल्या दोन शब्दांपैकी कोणत्या शब्दाला त्या सामासिक शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे ? कोणत्या शब्दावर त्या जोडशब्दाचा अर्थ अवलंबून आहे ?’, यावरून त्या समासाचा प्रकार निश्चित होतो. हे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

अ. सामासिक शब्दातील पहिला शब्द महत्त्वाचा असणे

आ. सामासिक शब्दातील दुसरा शब्द महत्त्वाचा असणे

इ. सामासिक शब्दातील दोन्ही शब्द महत्त्वाचे असणे

ई. सामासिक शब्दातील दोन्ही शब्द महत्त्वाचे नसणे आणि त्या दोन शब्दांवरून तिसर्‍याच अर्थाचा बोध होणे


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/527178.html


बचतीचा गुण अंगी बाणवी ।

बचत धनाची, बचत क्षणांची । शिकवण ही वडीलधार्‍यांची ।।
बचतीचा गुण अंगी बाणवी । भाषेत साथ ‘समासा’ची ।।

– कु. सुप्रिया शरद नवरंगे (२४.१०.२०२१)

– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२१)