फोंडा, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – फोंडा तालुक्यातील सावरगाळ, दाभाळ येथे सोमनाथ इंग्लिश हायस्कूलमध्ये २३ ऑक्टोबरला सकाळी विद्यालयाच्या सभागृहात शिक्षकांसाठी ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या विषयावर सनातन संस्थेच्या साधिका सौ. वेदिका पालन यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘‘मनामध्ये असलेल्या चुकीच्या संस्कारांमुळे ताण निर्माण होतो. त्या ताणाचे अनेक शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक परिणाम आपल्याला सर्वांना भोगावे लागतात. या तणावामुळेच आज समाजाची मानसिक स्थिती अत्यंत खालावली आहे. त्यासाठी साधना करणे म्हणजेच कुलदेवतेचा नामजप करणे आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे. या माध्यमातूनच तो ताण अल्प करता येऊ शकतो.’’
आज शाळांमधून अनेक विषयांचे शिक्षण दिले जाते; परंतु आनंदी रहाण्यासाठी काय करायला पाहिजे, याचेही शिक्षण देण्याची आवश्यकता सध्याच्या काळात निर्माण झाली आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी पुढे सांगितले.
उपस्थित शिक्षकांचे अभिप्राय
सौ. प्रज्ज्वला बखले, मुख्याध्यापिका, सोमनाथ इंग्लिश हायस्कूल : मानवी मन ही जगात एक अनाकलनीय अशी गोष्ट आहे आणि त्यावर नियंत्रण कसे असावे, याविषयी चांगले मार्गदर्शन मिळाले.
सौ. प्रसन्ना पालकर, शिक्षिका : सनातन संस्थेने ‘तणावमुक्त जीवन’ हा विषय शिक्षकाना व्यावस्थितपणे सांगितल्याबद्दल आभारी आहे. तणावमुक्त होण्यासाठी तुम्ही सांगितलेले उपाय आम्ही अवश्य करू आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनाही याबद्दल सविस्तरपणे सांगू.
क्षणचित्र
सनातन संस्थेच्या वतीने शाळेच्या आवारात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचा सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी लाभ घेतला.