राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या गायकाच्या विरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट झाल्यावर त्याच्याकडून भारतियांची क्षमायाचना !

  • क्षमा मागितली असली, तरी पुन्हा कुणी अवमान करू नये, यासाठी संबंधिताला शिक्षा होणेच योग्य !
  • शासनाने आतापर्यंत नागरिकांत राष्ट्रप्रेम न रुजवल्यानेच कुणीही उठतो आणि राष्ट्राचा अवमान करतो.

मडगाव, २९ सप्टेंबर (वार्ता.) – भारताच्या राष्ट्रगीताच्या चालीवर चुकीचा शब्दप्रयोग करून राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणी संबंधिताच्या विरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट झाल्यावर संबंधित गायकाने समस्त भारतियांची क्षमा मागितली आहे. गाण्याच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या तक्रारी मडगाव आणि पर्वरी पोलीस ठाण्यांमध्ये प्रविष्ट करण्यात आल्या होत्या.

गायकाने ‘जन गण मन …’ या राष्ट्रगीताच्या चालीत ‘जय हे’ या शब्दाची थट्टा करून कोकणी भाषेत ‘जेया रे’ (जेवण घ्या) असा शब्दप्रयोग गाण्यात वापरला, तसेच ‘जन गण मन …’ म्हटल्याने आपले पोट भरत नाही’, असे गायक गाण्यात म्हणत आहे. या गाण्यावर मागे बसलेल्या काही युवती हसतांना दिसत आहेत. हा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांत प्रसारित लागल्यावर याविरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट झाल्या. यानंतर संबंधित युवकाने क्षमा मागतांना म्हटले, ‘‘राष्ट्रगीताचा अवमान करून मी चूक केली आणि मी सर्वांची क्षमा मागतो. राष्ट्रगीताचा असा अवमान मी करायला नको होता. मी एक भारतीय आहे आणि मी देशावर प्रेम करतो. मी पुन्हा असे करणार नाही.’’ (असे म्हणणे हा कारवाई टाळण्याचा प्रकार आहे. देशावर प्रेम करत असता, तर राष्ट्रगीताचा अवमान करण्याचा विचारही आला नसता. त्यामुळे त्यासाठी या गायकाने कठोर प्रायश्चित्त घेणे किंवा शासनाने त्याला शिक्षा करणेच योग्य ! – संपादक)

गायकाला कठोर शिक्षा करा ! – तारा केरकर, सामाजिक कार्यकर्त्या

पर्वरी येथे तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर तक्रारदारासमवेत पोलीस ठाण्यात गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर म्हणाल्या, ‘‘संबंधित गायकाला कठोर शिक्षा करण्याची मागणी मी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. गायकाने केवळ क्षमा मागून चालणार नाही, तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. ‘व्हिडिओ’मध्ये काही युवती गाण्यावर हसतांना दिसत आहेत. त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई करावी.’’