शब्दांच्या उपांत्य (शेवटून दुसर्‍या) अक्षरांच्या व्याकरणाचे नियम

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

‘व्याकरण ही हिंदु धर्मातील १४ विद्यांपैकी दहावी विद्या आहे. प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांनी संस्कृतपासून मराठी, हिंदी आदी अनेक भाषांची निर्मिती झाली. या भाषांच्या व्याकरणाचा पाया मात्र ‘संस्कृत भाषेचे व्याकरण’ हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण येणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्‍या पिढीसाठी ही गोष्ट अवघड बनली. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. आजच्या लेखात आपण ‘शब्दांची उपांत्य (शेवटून दुसरी) अक्षरे व्याकरणदृष्ट्या कशी लिहावीत ?’, यासंबंधी जाणून घेऊ.                            (लेखांक ४)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/512227.html

१. अक्षरांचे उच्चार करण्यास लागणार्‍या वेळावरून ती अक्षरे ‘र्‍हस्व’ लिहावीत कि ‘दीर्घ’ ? हे ठरत असणे

‘शब्दांचे उपांत्य (शेवटून दुसरे) अक्षर व्याकरणदृष्ट्या कसे लिहावे ?’, हे जाणून घेण्यासाठी प्रथम आपण ‘भाषेतील ‘र्‍हस्व’ अक्षरे कोणती आणि ‘दीर्घ’ अक्षरे कोणती ?’, हे थोडक्यात जाणून घेऊ.  अक्षरांचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो, त्यावरून त्या अक्षरांचे र्‍हस्व-दीर्घ असणे ठरते. ‘ज्या अक्षरांचे उच्चार करण्यास अल्प वेळ लागत असेल, ती र्‍हस्व लिहावीत आणि ज्या अक्षरांच्या उच्चारांस अधिक वेळ लागत असेल, ती दीर्घ लिहावीत’, असा सर्वसाधारण नियम आहे.

१ अ. ‘र्‍हस्व’ अक्षरे

१ अ १. भाषेतील ‘अ’, ‘इ’, ‘उ’, ‘ऋ’ आणि ‘लृ’ हे स्वर (अक्षरे) र्‍हस्व आहेत.

१ अ २. र्‍हस्व स्वर (अक्षरे) ज्या अन्य अक्षरांमध्ये मिसळतात, ती अक्षरे र्‍हस्व मानावीत : र्‍हस्व स्वर (अक्षरे) ‘क’पासून ‘ळ’पर्यंतच्या ज्या ज्या अक्षरांमध्ये मिसळतात, त्या सर्व अक्षरांना ‘र्‍हस्व अक्षरे’ असे म्हणतात, उदा. ‘ख’, ‘गि’, ‘घु’ या अक्षरांपैकी ‘ख’ (ख् + अ = ख) या अक्षरामध्ये ‘अ’ हा र्‍हस्व स्वर िमसळलेला आहे. मराठीतील स्वर वगळून बाकीची सर्व अक्षरे ही मुळात पाय मोडून लिहिली जातात, उदा. च्, ट्, त्, प् इत्यादी. या अक्षरांमध्ये जेव्हा ‘अ’ हा स्वर मिसळतो, तेव्हा ती पूर्ण अक्षरे होतात, उदा. च, ट, त, प इत्यादी. ‘गि’ या अक्षरामध्ये ‘इ’, तर ‘घु’ या अक्षरामध्ये ‘उ’ हा र्‍हस्व स्वर मिसळलेला आहे. त्यामुळे ‘ख’, ‘गि’ (ग् + इ) , ‘घु’ (घ् + उ) ही सर्व अक्षरे र्‍हस्व मानावीत. याची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

ट, ड, चि, ठि, जु, णु इत्यादी.

उपांत्य अक्षरांचे व्याकरण जाणून घेण्यासाठी ‘ऋ’ आणि ‘लृ’ या स्वरांचा उपयोग होत नसल्यामुळे या लेखात या स्वरांचा विचार केलेला नाही.

कु. सुप्रिया नवरंगे

१ आ. ‘दीर्घ’ अक्षरे

१ आ १. भाषेतील ‘आ’, ‘ई’, ‘ऊ’, ‘ए’, ‘ऐ’, ‘ओ’ आणि ‘औ’ हे स्वर (अक्षरे) दीर्घ आहेत.

१ आ २. दीर्घ स्वर (अक्षरे) ज्या अक्षरांमध्ये मिसळतात, ती अक्षरे दीर्घ मानावीत : दीर्घ स्वर (अक्षरे) ‘क’पासून ‘ळ’पर्यंतच्या ज्या ज्या अक्षरांमध्ये मिसळतात, त्या सर्व अक्षरांना ‘दीर्घ अक्षरे’ असे म्हणतात, उदा. ‘ढा’, ‘ती’, ‘दू’ या अक्षरांपैकी ‘ढा’ या अक्षरामध्ये ‘आ’ हा दीर्घ स्वर मिसळलेला आहे. ‘ती’ या अक्षरामध्ये ‘ई’, तर ‘दू’ या अक्षरामध्ये ‘ऊ’ हा दीर्घ स्वर मिसळलेला आहे. त्यामुळे ‘ढा’, ‘ती’, ‘दू’ ही सर्व अक्षरे दीर्घ मानावीत. याची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

दा, धा, नी, पी, फू, भू, मे, ये, बै, रै, लो, वो, शौ, सौ इत्यादी.

२. शब्दाचे शेवटचे अक्षर अ-कारांत

(‘अ’ स्वर मिसळलेले) असेल, तर शेवटून दुसर्‍या अक्षराचे इ-कार किंवा उ-कार दीर्घ लिहावेत

जाणीव, वीस, कठीण, फूल आणि सून या शब्दांची शेवटची ‘व’, ‘स’, ‘ण’, ‘ल’ अन् ‘न’ ही अक्षरे अ-कारांत आहेत, म्हणजे या अक्षरांमध्ये ‘अ’ हा स्वर मिसळलेला आहे. अशा शब्दांची उपांत्य (शेवटून दुसरी) अक्षरे दीर्घ लिहावीत. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

मीठ, तीन, विहीर, चूल, झुडूप, ऊस, ऊन इत्यादी.

३. तत्सम (संस्कृतमधून जशाच्या तशा आलेल्या) शब्दांची शेवटची अक्षरे अ-कारांत असतील, तर त्यांच्या आधी येणारी इ-कार किंवा उ-कार असलेली अक्षरे उच्चारांनुसार र्‍हस्व अथवा दीर्घ लिहावीत

प्रिय, चकित, संगीत, गुण, युग आणि देवदूत हे अ-कारांत असलेले तत्सम (संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले) शब्द आहेत. या शब्दांतील ‘प्रि’, ‘कि’, ‘गी’, ‘गु’, ‘यु’ आणि ‘दू’ ही अक्षरे उच्चारांनुसार र्‍हस्व किंवा दीर्घ लिहावीत. या नियमाची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

मंदिर, परिचित, अखिल, द्रविड, सजीव, प्राचीन, मंजुळ, कुसुम, त्रिकूट, त्रिशूळ, कुरूप इत्यादी.

४. शब्दातील शेवटच्या अक्षराचा स्वर दीर्घ असेल, तर त्याच्या आधीच्या अक्षराचा स्वर र्‍हस्व लिहावा, उदा. इच्छा, करुणा, खुणा, उडी, सुखी, किल्ली, तेलुगू, इथे इत्यादी.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२१)


 वाचकांना निवेदन !

‘हिंदु जनजागृती समिती’ यातील ‘दु’ र्‍हस्व, तर ‘हिंदू जागृती समिती’ यातील ‘दू’ दीर्घ असण्यामागील कारण !

‘रविवार, १९.९.२०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या ‘हिंदु’ या शब्दाच्या अंत्य (शेवटच्या) अक्षराच्या व्याकरणासंबंधीचे नियम !’ या लेखात ‘हिंदु जनजागृती समिती’ यातील ‘दु’ र्‍हस्व लिहावा आणि ‘हिंदू जागृती समिती’ यातील ‘दू’ दीर्घ लिहावा’, असे सांगण्यात आले होते. याविषयी काही वाचकांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे ‘हे सूत्र आणखी स्पष्ट व्हावे’, याकरता त्याविषयीचे विवेचन येथे देत आहे.

१. ‘हिंदु जनजागृती समिती’ यातील ‘हिंदु’ शब्द धर्मवाचक असल्यामुळे र्‍हस्वांत असणे

‘हिंदु जनजागृती समिती’ म्हणजे ‘हिंदु जनांमध्ये जागृती निर्माण करणारी समिती.’ यात ‘जनांचा धर्म कोणता ?’, असे विचारल्यास त्याचे उत्तर ‘हिंदु’, असे मिळते. त्यामुळे या ठिकाणी ‘हिंदु’ शब्द जनांचा धर्म सांगणारा, म्हणजे धर्मवाचक होतो; म्हणून त्यातील ‘दु’ र्‍हस्व लिहावा. जसे ‘हिंदु लोक’, ‘हिंदु तरुणी’, ‘हिंदु युवक’ इत्यादी असते, तसेच हे आहे.

२. ‘हिंदू जागृती समिती’ यातील ‘हिंदू’ शब्द व्यक्तीवाचक असल्यामुळे दीर्घांत असणे

‘हिंदू जागृती समिती’ म्हणजे ‘हिंदूंमध्ये जागृती करणारी समिती.’ जशा काही समित्या मुसलमानांमध्ये जागृती करतात, काही ख्रिस्त्यांमध्ये करतात, तशी ही हिंदूंमध्ये जागृती करणारी समिती आहे. यावरून येथे ‘हिंदू’ शब्द व्यक्तींना उद्देशून लिहिला आहे. ‘रेल्वेस्थानकावर काही हिंदू उभे होते’, या वाक्यात ज्याप्रमाणे ‘हिंदू’ शब्द व्यक्तींना उद्देशून लिहिला आहे, तसेच या समितीच्या नावातही तो व्यक्तीवाचक आहे. त्यामुळे त्यातील ‘दू’ दीर्घ लिहावा.’

– कु. सुप्रिया नवरंगे