भक्तीसत्संगातील सूत्रांवरून भगवान श्रीविष्णु आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील लक्षात आलेले साम्य !

‘सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यानंतर आरंभीची जवळजवळ ३ वर्षे जरी मला गुरुदेवांचे दर्शन झाले नव्हते, तरी ‘ते साक्षात् ईश्वरच आहेत’, असे जाणवायचे. प्रत्यक्ष दर्शनानंतर आणि आश्रमात राहून साधना करू लागल्यानंतर कधी वाटायचे, ‘ते श्रीराम आहेत’, तर कधी वाटायचे, ‘ते श्रीकृष्ण आहेत.’ पुढे ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे साक्षात् श्रीविष्णूचे कलियुगातील अंशावतार आहेत’, असे नाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले. स्वाभाविकच गुरुदेवांमध्ये श्रीविष्णूची वैशिष्ट्ये आहेतच !

वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने झालेल्या भक्तीसत्संगात श्रीविष्णूची वैशिष्ट्ये आणि विविध नावांचा कार्यकारणभाव सांगण्यात आला. ते ऐकत असतांना मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे स्मरण झाले. श्रीविष्णूच्या वैशिष्ट्यांशी साम्य असलेली मला जाणवणारी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची काही निवडक वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१९.३.२०२५ या दिवशी यातील काही वैशिष्ट्ये पाहिली. आज त्यापुढील वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

(भाग २)

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/893944.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

८. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ हे ब्रीद असणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

आपल्या परमभक्तांना सदैव वचन देणारा आणि त्याचे पालन करणारा, असेही श्रीविष्णूचे एक वैशिष्ट्य आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या ९ व्या अध्यायातील ३१ व्या श्लोकात भगवंत म्हणतो, ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझा भक्त नाश पावत नाही.’ संकटकाळी किंवा कठीण परिस्थितीमध्ये आपल्या भक्तांना काहीही उणे पडू न देणे, हे श्रीविष्णूचे वैशिष्ट्य आहे.

श्रीविष्णूच्या या वचनाची सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या संदर्भात आम्हा साधकांना वेळोवेळी प्रचीती येते. याची अनेक उदाहरणे देता येतील. त्यातले एक छोटेसे उदाहरण, म्हणजे कोरोना महामारीचा काळ. त्या काळात घराबाहेर पडणे कठीण झाले होते. लोकांना उपजीविका करणे कठीण झाले होते. अन्न-धान्य, भाज्या, फळे मिळणे दुरापास्त झाले होते; परंतु श्रीविष्णूचे अंशावतार असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने साधकांना त्या काळात काहीच उणे पडले नाही.

श्रीमती अलका वाघमारे

९. साक्षात् भगवंत देवर्षि नारदांना सांगतो,

नाहं वसामि वैकुण्ठे योगिनां हृदये न च ।
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ।।

– पद्मपुराण, उत्तरखण्ड, अध्याय ९२, श्लोक २२

अर्थ : हे नारदा, मी वैकुंठात रहात नाही आणि योग्यांच्या हृदयातही वास करीत नाही. माझे भक्त जेथे माझे गुणगान करतात, तेथे मी वास करतो.

आम्हा साधकांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या पुढील वचनाने फार मोठा आधार दिला आहे.

‘स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा । कैसे असू सर्वदा सर्वा ठायी ।।
सनातन धर्म माझे नित्य रूप । त्या रूपे सर्वत्र आहे सदा ।।’

याची अनुभूती आज असंख्य साधक प्रतिदिन घेत आहेत. या जगतात जेथे जेथे सनातन धर्म आहे, सनातन धर्माप्रमाणे आचरण करणारे लोक आहेत, तेथे तेथे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सूक्ष्मरूपाने अस्तित्व आहे. ‘गुरुदेवांचे सूक्ष्म अस्तित्व अनुभवण्यातला आनंद आम्हा सर्व साधकांना सदैव घेता येवो’, अशी प्रार्थना आहे.

१०. साधकांच्या हृदयात स्वतःच्या चरणस्मृती स्थापित करणारे सच्चिदानंद परबह्म गुरुदेव !

जो श्रीविष्णूची भावभक्तीपूर्ण उपासना करतो, त्याच्या अंतरात श्रीविष्णु स्वतःचे चरण स्थापित करतात. इतकेच नव्हे, तर त्या विष्णु उपासकाच्या हृदयात ते स्वतः निवास करू लागतात. त्या चरणकमलांच्या प्रभावामुळे त्या विष्णुभक्तांचे मन स्थिर होऊन त्याची भगवद्भक्ती दृढ होत जाते.

अ. जो कोणी धर्माचरण करतो, जो साधना करतो त्याच्यासमवेत गुरुदेव सदैव असतात. त्याच्या हृदयात गुरुदेव वास करतात, भलेही त्याला गुरुदेवांनी स्थुलातून पाहिलेले नसेल, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे कदाचित् त्या साधकाला माहीतही नसतील; परंतु गुरुदेव त्याच्या समवेत असतात. सनातनच्या साधकांच्या अंतरात गुरुदेवांचे चरण स्थापित झालेलेच आहेत. आम्ही साधक तर याची अखंड अनुभूती घेत असतो. त्यांच्या कृपेमुळेच आमचे प्रारब्ध सुसह्य होत आहे. जीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देतांना आमच्या अंतरी गुरुदेवांचा वास असल्यामुळे आमची मने स्थिर होत आहेत. गुरुदेवांवरील भक्ती दृढ होत आहे.

आ. भलेही प्रारब्धवशात साधकांना संस्थेपासून दूर जावे लागले असेल, तरीही गुरुदेवांना कोणीच विसरलेले नाही. त्यांच्या अंतरात गुरुदेवांप्रती तेवढीच श्रद्धा आजही आहे. गुरुदेवांच्या स्मरणाने त्यांचे नेत्र आजही पाणावतात. गुरुदेवांचे ते स्मरण त्यांना प्रारब्ध भोगण्याचे बळ देते. याचे कारण भगवान श्रीविष्णुप्रमाणे गुरुदेवांनी त्यांच्या चरणस्मृती साधकांच्या हृदयात स्वतः स्थापित केल्या आहेत.

११. अहंकाररूपी रोगाची तीव्रता जशी आणि ज्या प्रमाणात असेल, त्यानुसार त्यावर औषधयोजना किंवा उपाययोजना करणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

भक्ताचे स्वभावदोष किंवा अहंकार यांच्यामुळे त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा येत असतो. या अहंकाररूपी रोगाची तीव्रता जशी आणि ज्या प्रमाणात असेल, त्यानुसार भगवंत त्यावर औषधयोजना किंवा उपाययोजना करतो.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचेही असेच आहे. साधकांचे स्वभावदोष किंवा अहंकार यांच्यामुळे त्यांच्या प्रगतीत अडथळा येत असल्यास अंतर्यामी असलेले गुरुदेव ते जाणतात आणि साधकाचा अहंकाररूपी रोग नाहीसा करण्यासाठी उपाययोजना करतात. तो दोष दाखवण्यासाठी अन् साधकाला साहाय्य करण्यासाठी प्रसंग घडवतात. त्या साधकाला त्याच्यातील स्वभावदोषांची जाणीव करून देतात. गुरुदेवांनी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ त्यासाठीच निर्मिली आहे. ती प्रक्रिया राबवल्याने साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीतील अडथळे दूर होत आहेत. कित्येकांचे स्वभावदोष आणि अहं अल्प होऊन आध्यात्मिक प्रगतीही झाली आहे.

१२. बिंब-प्रतिबिंब या न्यायाने वागणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

आपण दर्पणापुढे ज्या रूपात आणि ज्या स्थितीत उभे रहातो, आपले तसेच रूप दर्पण दाखवतो. आपले जसेच्या तसे प्रतिबिंब दर्पणात दिसते. भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलेच आहे, ‘ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ११) म्हणजे ‘जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसेच भजतो.’

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचेही असेच आहे. साधक ज्या वेळी गुरुदेवांच्या समोर जातात, त्या वेळी त्या साधकाचे प्रतिबिंब गुरुदेवांच्या हृदयात पडते. साधकांच्या प्रश्नांची उत्तरे आणि वैयक्तिक शंकांचे समाधान ते बिंब-प्रतिबिंब या न्यायाने करतात.

१३. धर्मसंस्थापना आणि भक्तांचे रक्षण

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । 
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ७

अर्थ : हे भारता (भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ह्रास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ८

अर्थ : सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणार्‍यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगांत प्रगट होतो.

प्रत्येक युगात मानवाची प्रवृत्ती अधिकाधिक तमोगुणी होत असते. अशा वेळी विश्वाचा समतोल राखण्यासाठी सत्त्वगुण वाढणे आवश्यक असते; म्हणून मानवाच्या मनात ईश्वरभक्ती वाढावी आणि तमोगुण न्यून व्हावा, यासाठी दुर्जनांच्या नाशाचे कार्य भगवान श्रीविष्णु करतो. त्यासाठी तो युगानुयुगे अवतार घेतो.

आज कलियुगांतर्गत कलियुगात नेमकी हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. लोक धर्माचरण विसरले असल्याने धर्माला ग्लानी आली अाहे. दुर्जनता, दुर्व्यवहार यांमुळे तमोगुणाने परिसीमा गाठली आहे. अशा परिस्थितीमध्ये विश्वाचा समतोल राखण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव गेली ३५ वर्षे समाजाला साधना सांगून अध्यात्माचा प्रसार करत आहेत. त्या माध्यमातून सत्त्वगुणी लोकांचे राज्य स्थापण्यासाठी ते अखंड कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याला यश येत असून हळूहळू हिंदूंमध्ये जागृती होत आहे. लोक धर्माचरण करण्यास प्रवृत्त होत आहेत. साहजिकच योग्य वेळ येताच अधर्माचरण, दुर्जनता यांचा नाश होऊन तमोगुणाचे प्राबल्य घटणार आहे. परिणामी समाजातील सत्त्वगुण वाढणार आहे.

प्रार्थना आणि कृतज्ञता

नाडीपट्टी वाचनात सांगितल्याप्रमाणे ‘श्रीविष्णूचे अंशावतार असलेल्या गुरुदेवांच्या धर्मसंस्थापनेच्या या कार्याला यश येऊन निश्चितच दुर्जनता नाहीशी होईल आणि सत्त्वगुणी लोकांचे राज्य येईल’, यात शंकाच नाही. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सत्त्वगुणी लोकांचे राज्य स्थापनेचे ध्येय शीघ्रातीशीघ्र साकार होवो’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे.

भगवान श्रीविष्णु आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या कृपेने त्यांच्या वैशिष्ट्यांमधील साम्य लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता !’

(समाप्त)

– श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक