‘शरीर पडले, मृत्यू झाला की, सूक्ष्म देह बाहेर पडतो. आकाश, वायु आणि अग्नि अशा ३ तत्त्वांचा सूक्ष्म देह बनला आहे. वासना हेच त्यांचे जीवन आहे. वासना नष्ट झाल्या की, हा देहही संपतो. हीच मुक्ती ! जीवनभर ब्रह्मचिंतन करणारा, ब्रह्मानुभूतीला प्राप्त झालेला जीवनमुक्त होऊन मरतो. त्याचा देह पडतो. वासनाच उरल्या नसल्यामुळे वासनादेह, म्हणजे ‘अतिवाहिक देह’ही उरत नाही. त्याचा सूक्ष्मदेहही विलीन होतो. तो कुठेच जात नाही, तर येथेच विराट अस्तित्वाशी एक होतो. ज्याला वासना असतात, त्यांचा सूक्ष्मदेह मृत्यूनंतर शरिरातून बाहेर पडतो. सूक्ष्मदेह (लिंगदेह किंवा वासनादेह) जोवर आहे, तोवर तो नवे नवे देह धारण करतो. जन्मानंतर जन्म घेत भटकतो. आत्मसाक्षात्काराविना आणि भगवत्तेविना (भगवंताच्या कृपेविना) सूक्ष्मदेहांचे, वासनादेहाचे विसर्जन होत नाही. तोवर चैन नाही, शांती नाही, मुक्ती नाही !’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२२)