सनातनचे अध्यात्मावर आधारलेले मराठी व्याकरण !

‘व्याकरण ही हिंदु धर्मातील १४ विद्यांपैकी दहावी विद्या आहे. ‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी देवभाषा संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे सहस्रो वर्षांचा काळ लोटल्यावर संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी अनेक भाषांची निर्मिती झाली. कालांतराने या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्‍या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेतील काही विद्वानांनी तर मराठीवरील संस्कृत व्याकरणाचे वर्चस्व झुगारण्याची बंडखोरी करण्यासही प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

आजच्या लेखात आपण ‘हिंदु’ हा शब्द धर्म, संघटना, व्यक्ती आदी विविध संदर्भांत लिहितांना त्याचे अंत्य (शेवटचे) अक्षर व्याकरणदृष्ट्या कसे लिहावे ?’, हे जाणून घेऊ.

(लेखांक ३)

‘हिंदु’ या शब्दाच्या अंत्य (शेवटच्या) अक्षराच्या व्याकरणासंबंधीचे नियम !

कु. सुप्रिया नवरंगे

१. ‘हिंदु’ शब्द धर्मवाचक (धर्माचे नाव सांगणारा) असल्यास तो लिहिण्याची पद्धत

१ अ. ‘हिंदु धर्म’ यातील ‘हिंदु’ शब्द धर्मवाचक (धर्माचे नाव सांगणारा) असल्यामुळे तो संस्कृत व्याकरणानुसार र्‍हस्वांत लिहावा ! : हिंदु धर्म हा वेदांप्रमाणे अनादि आणि अपौरुषेय (कुठल्याही मनुष्याने निर्माण न केलेला) आहे. तो अखिल मानवजातीचा ऐहिक अन् आध्यात्मिक उत्कर्ष साधणारी तत्त्वे सांगणारा आहे. तो देवता, धर्मग्रंथ आणि ऋषिमुनी यांच्याप्रमाणे विश्वाचे परम मंगल साधणारा आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण देवता, धर्मग्रंथ आणि ऋषिमुनी यांची नावे संस्कृत व्याकरणानुसार लिहितो, त्याप्रमाणे ‘धर्म’ म्हणून उल्लेख करतांना ‘हिंदु’ शब्दही संस्कृत व्याकरणानुसार लिहावा; म्हणजे त्यातील ‘दु’ र्‍हस्व लिहावा.

१ आ. तत्त्वज्ञान, संस्कृती, परंपरा, आचार इत्यादी शब्दांच्या आधी येणारा ‘हिंदु’ शब्द धर्मवाचक होत असल्यामुळे र्‍हस्वांत लिहावा ! : तत्त्वज्ञान, संस्कृती, परंपरा, आचार इत्यादींच्या आधी जेव्हा ‘हिंदु’ शब्द येतो, तेव्हा त्या सर्वांचा संबंध हिंदु धर्माशी जोडला जातो, उदा. ‘आपण ‘हिंदु तत्त्वज्ञान’, असे म्हणतो, तेव्हा आपल्याला ‘हिंदु धर्मातील तत्त्वज्ञान’ हा अर्थ अभिप्रेत असतो; ‘हिंदु संस्कृती’ या शब्दप्रयोगात ‘हिंदु धर्माची संस्कृती’, असे आपल्याला म्हणावयाचे असते.’ हेच सूत्र ‘हिंदु परंपरा’, ‘हिंदु आचार’ इत्यादींनाही लागू आहे. अशा शब्दप्रयोगांत ‘हिंदु’ शब्द र्‍हस्वांत लिहावा.

१ इ. ‘हिंदु’ शब्द धर्मवाचक असणारे आणखी काही शब्दप्रयोग त्यांच्या स्पष्टीकरणांसह पुढे दिले आहेत.

१. हिंदु राष्ट्र – हिंदु धर्मावर आधारलेले राष्ट्र

२. हिंदु नववर्ष दिन – हिंदु धर्माने सांगितलेला नववर्ष दिन

३. हिंदु समाज – हिंदु धर्मीय समाज

४. हिंदु संघटना – हिंदु धर्मासाठी कार्यरत असणार्‍या संघटना

५. हिंदु जनजागृती समिती – हिंदु धर्मीय जनांमध्ये जागृती निर्माण करणारी समिती

६. हिंदु बांधव – हिंदु धर्मीय बांधव

७. हिंदु पुरुष – हिंदु धर्मीय पुरुष

८. हिंदु तरुणी – हिंदु धर्मीय तरुणी

९. हिंदुद्रोही – हिंदु धर्माशी द्रोह करणारे

१०. हिंदुहित – हिंदु धर्माचे हित (येथे हे लक्षात घ्यावे की, हिंदुहित म्हणजे केवळ हिंदु व्यक्तींचे हित नव्हे, तर ‘हिंदूंचे धर्मग्रंथ, त्यांची मंदिरे, त्यांच्या यात्रा, गोमाता इत्यादी सर्व गोष्टींचे हित.’ या अर्थाने हा शब्द धर्मवाचक झाला आहे. त्यामुळे त्यातील ‘दु’ र्‍हस्व लिहावा. याच सूत्रानुसार हिंदुरक्षक आणि हिंदुद्वेष्टे या शब्दांतील ‘दु’ही र्‍हस्व लिहावा.)

वरील स्पष्टीकरणांवरून ‘हिंदु’ शब्द धर्मवाचक आहे कि नाही ? हे कसे ओळखावे ?’, हे आपल्या लक्षात येते. त्यावरून ‘हिंदु’ शब्द र्‍हस्वांत लिहावा कि नाही ?’, हे आपण निश्चित करू शकतो.

२. ‘हिंदु’ शब्द व्यक्तीवाचक (व्यक्तीला उद्देशून लिहिलेला) असल्यास तो लिहिण्याची पद्धत

२ अ. हिंदु व्यक्तीचा एकवचनी उल्लेख र्‍हस्वांत आणि अनेकवचनी उल्लेख दीर्घांत लिहावा ! : ‘एक हिंदु’ असा एकवचनी उल्लेख करावयाचा असेल, तर ‘हिंदु’ शब्द र्‍हस्वांत लिहावा, उदा. ‘रेल्वेस्थानकावर एक हिंदु उभा होता.’ जेव्हा ‘अनेक हिंदू’ असा अनेकवचनी उल्लेख करावयाचा असेल, तेव्हा ‘हिंदू’ शब्द दीर्घांत लिहावा, उदा. ‘घंटानाद ऐकून शेकडो हिंदू गोळा झाले.’

२ आ. ‘हिंदु’ शब्द व्यक्तीवाचक असणारे आणखी काही शब्दप्रयोग त्यांच्या स्पष्टीकरणांसह पुढे दिले आहेत.

१. थोर हिंदू – येथे ‘हिंदू’ शब्द ‘व्यक्ती’ या अर्थाने वापरण्यात आला असल्यामुळे तो दीर्घांत लिहिण्यात आला आहे.

२. हिंदू मेळावा – हिंदूंचा मेळावा (जसा मुसलमानांचा मेळावा असतो, ख्रिस्त्यांचा मेळावा असतो, तसा हा हिंदूंचा मेळावा आहे; म्हणजे येथे ‘हिंदू’ शब्द व्यक्तींना उद्देशून वापरला आहे. त्यामुळे त्यातील ‘दू’ दीर्घ आहे.)

३. अखिल भारतीय हिंदू अधिवेशन – अधिवेशन हिंदूंसाठी असल्यामुळे येथे ‘हिंदू’ शब्द व्यक्तीवाचक आणि म्हणून दीर्घांत झाला आहे.

४. हिंदूसंघटन – हिंदूंचे संघटन

५. हिंदूऐक्य – हिंदूंचे ऐक्य

वरील शब्दांचा अभ्यास केल्यावर ‘हिंदू’ शब्द व्यक्तीवाचक आहे कि नाही ? हे कसे ओळखावे ?’, हे आपल्या लक्षात येते. यावरून अशा ठिकाणी ‘हिंदू’ शब्द दीर्घांत लिहावा’, हे आपण निश्चित करू शकतो.

३. नेहमी वापरल्या जाणार्‍या विविध शब्दप्रयोगांमध्ये ‘हिंदु’ शब्द कसा लिहावा ?’, हे सांगणारी काही उदाहरणे

टीप : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य पुढे पेशव्यांनी पुष्कळ मोठ्या प्रमाणात विस्तारले. या राज्याला पेशव्यांच्या काळापासून ‘हिंदुपदपातशाही’ असे संबोधण्यात येऊ लागले.’

– कु. सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२१)