प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विरोधात स्वदेशी अ‍ॅप ‘कू’च्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद !

  • अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, नेते, खेळाडू यांचाही सहभाग !

  • प्लास्टिकचे राष्ट्रध्वज न वापरण्याचे आवाहन !

हिंदु जनजागृती समितीने १६ हून अधिक वर्षांपासून चालू केलेल्या प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याच्या चळवळीला आज राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे, याविषयी समितीचे कौतुक करावे तितके थोडेच !

नवी देहली – प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या विरोधात स्वदेशी ‘कू’ अ‍ॅपकडून मोहीम चालवली जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अ‍ॅपवर काही मुख्यमंत्री, मंत्री, नेते, खेळाडू आणि वलायांकित व्यक्ती यांनी प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरण्याची शपथ घेतली. तसेच जनतेला कागद आणि कापड यांचा राष्ट्रध्वज वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. #SayNoToPlasticTiranga आणि #PledgeOnKoo या नावाने हॅगटॅगही (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) या अ‍ॅपवरून ‘ट्रेंड’ (चर्चेत असलेला विषय) करण्यात आले होते.

१. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या अकाऊंटवरून म्हटले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि राष्ट्रहितासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याची शपथ घ्या. प्लास्टिक मुक्त भारत बनवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन केले.

२. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या अ‍ॅपवर कागद आणि कापड यांच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्याचे आवाहन केले.

३. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या कार्यालयाच्या अकाउंटवरूनही ‘देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळा’, असे आवाहन करण्यात आले.

४. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा, मणिपूरचे मुख्यमंत्री एन्. बीरेन सिंह, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देब, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह, राजस्थानचे पर्यावरण मंत्री सुखराम बिश्‍नोई, लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान आणि टोकियो ऑलिंपिकमध्ये कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवणारे खेळाडू रविकुमार दहिया यांनीही प्लास्टिकचे राष्ट्रध्व न वापरण्याचे आवाहन केले.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून निर्देश

केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांना पत्र पाठवून प्लास्टिकचे ध्वज न वापरण्याचे निर्देश दिले. तसेच केवळ कागद आणि कापड यांचेच राष्ट्रध्वज वापरण्यात यावेत, असे सांगितले.