पत्नीची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि दृढ श्रद्धेने प्रतिकूल प्रसंग सकारात्मकतेने स्वीकारणारे संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (वय ३९ वर्षे ) !

‘चैत्र कृष्ण पक्ष प्रतिपदा (२८.४.२०२१) या दिवशी माझे यजमान अधिवक्ता चारुदत्त जोशी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ज्येष्ठ कृष्ण पक्ष प्रतिपदा (२५.६.२०२१) या दिवशी त्यांचे द्वितीय मासिक श्राद्ध आहे. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

(भाग १)

अधिवक्ता चारुदत्त जोशी

सेवेची तीव्र तळमळ आणि साधकत्व असलेले अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी अन् यजमानांच्या मृत्यूसारख्या कठीण प्रसंगाला धिराने सामोरे जाणार्‍या त्यांच्या पत्नी श्रीमती अनिता जोशी !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांच्या सेवेसाठी अधिवक्ता चारुदत्त जोशी रामनाथी (गोवा) येथे येत असत. कधी (निवृत्त न्यायाधीश) पू. सुधाकर चपळगावकरकाका यांच्यासमवेतही ते रामनाथी आश्रमात येत असत. त्या वेळी त्यांची सेवेची तळमळ दिसून येत असे. त्यांच्यातील साधकत्व, नम्रता, संतांविषयीचा भावही प्रकर्षाने जाणवत असे. त्यांच्या नम्र देहबोलीमुळे सर्वांना त्यांच्याशी संवाद साधावा वाटत असे. साधकत्व, इतरांचा विचार करणे, सेवा परिपूर्ण होण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणे आदी गुणांमुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

त्यांच्या पत्नी श्रीमती अनिता या चारुदत्त जोशी यांच्या मृत्यूच्या प्रसंगाला धिराने सामोरे गेल्या, हे कौतुकास्पद आहे. त्यांनी लिहिलेल्या या सुंदर लेखामुळे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी यांची अनेक गुणवैशिष्ट्ये आम्हाला कळली. साधकांना त्यातून शिकता येईल.

शेवटपर्यंत गुरुसेवेचा ध्यास असलेले अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी आणि त्यांच्या धिरोदात्त पत्नी श्रीमती अनिता जोशी यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, अशी श्री महाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना !

– (श्रीसत्‌शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ (२४.६.२०२१)

१. यजमानांच्या जन्मापूर्वी सासू-सासर्‍यांनी केलेली दत्तोपासना !

श्रीमती अनिता जोशी

माझ्या सासूबाईंचे पहिले अपत्य जन्मानंतर ११ दिवसांतच गेले. त्यानंतर माझ्या सासू-सासर्‍यांनी गाणगापूर येथे राहून गुरुचरित्राचे पारायण करत दत्तगुरूंची उपासना केली. दत्तकृपेने चारुदत्त यांचा जन्म झाला.

२. बालपण

२ अ. यजमानांमध्ये उपजत असलेली देवभक्ती : यजमानांची लहानपणापासून देवावर पुष्कळ श्रद्धा होती. ते देवाची पूजा करणे, नियमित देवळात जाणे, नामजप करणे, तसेच पारायण करणे, अशी साधना करायचे.

२ आ. समंजसपणा : लहानपणापासून यजमान पुष्कळ समजूतदार होते. त्यांनी कधी कुठल्याच गोष्टीसाठी आई-वडिलांकडे हट्ट केला नाही. ते नेहमीच ऐकण्याच्या आणि इतरांना समजून घेण्याच्या स्थितीत असायचे.

३. महाविद्यालयात असतांना यजमानांच्या तोंडवळ्यावर श्वेत कोड उठणे आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर ते न्यून झाल्याने त्यांना देवाप्रती कृतज्ञता वाटणे

पहिल्यापासूनच ते प्रत्येक प्रसंगात देवाची कृपा अनुभवायचे. त्यामुळे ‘ते आध्यात्मिकदृष्ट्या नेहमीच सजग असायचे’, असे मला वाटते. महाविद्यालयात असतांना त्यांच्या तोंडवळ्यावर श्वेत कोड उठले होते. आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर ते न्यून झाले. केवळ एका डोळ्यावर थोडेसे कोड राहिले आणि तोंडवळ्यावरील बाकी सर्वत्र असलेले कोड बरे झाले. ही त्यांच्यासाठी मोठी अनुभूती होती आणि त्याविषयी त्यांच्या मनात देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता होती.

४. विवाहानंतर यजमानांचे साधनेसाठी लाभलेले सहकार्य

४ अ. ‘यजमानांची कृती, आचरण आणि विचार यांतून साधना कशी करायला हवी ?’, हे शिकायला मिळून विवाहानंतर खर्‍या अर्थाने साधनेला आरंभ होणे : मे २०११ मध्ये माझा विवाह झाला. मी विवाहाआधी ८ वर्षे साधनेत होते; मात्र माझ्या साधनेत सातत्य नव्हते. माझ्यामध्ये ‘हट्टीपणा, अधिकारवाणीने बोलणे, ऐकण्याची वृत्ती नसणे आणि इतरांचा विचार न करणे’, असे अनेक स्वभावदोष अन् अहं यांचे पैलू होते. माझे यजमान मात्र माझ्या अगदी विरुद्ध होते. ते नेहमी ‘इतरांचा विचार करणे, इतरांच्या साहाय्याला धावून जाणे, इतरांना समजून घेणे, परिस्थितीचा सहजतेने स्वीकार करणे’, आदी गुणांनी युक्त होते. इतरांसाठी त्याग करण्याची त्यांची अखंड सिद्धता असायची. त्यांच्या या गुणांमुळे विवाहानंतर खर्‍या अर्थाने माझ्या साधनेला आरंभ झाला. मला साधनेचे दृष्टीकोन आधीपासून ठाऊक होते; मात्र विवाहानंतर ते सर्व दृष्टीकोन माझ्या कृतीत येऊ लागले. मला यजमानांची कृती, आचरण आणि विचार यांतून ‘साधना कशी करायला हवी ?’, हे क्षणोक्षणी शिकायला मिळाले. ‘देवाने माझ्या साधनेसाठीच त्यांना माझ्या आयुष्यात आणले’, असे मला वाटते.

४ आ. ‘विवाहानंतर स्वतःची सेवा चालू राहील का ?’, अशी शंका मनात येणे; मात्र यजमानांनी सेवेसाठी संपूर्ण साहाय्य करणे : विवाहाच्या वेळी माझ्या मनात ‘विवाहानंतर माझ्या सेवेवर काही बंधने येणार नाहीत ना ? माझी सेवा चालू राहील ना ?’, अशी शंका आणि भीती होती; मात्र यजमानांनी माझ्या सेवेला कधीच विरोध केला नाही. ‘माझे प्रथम प्राधान्य सेवेला आहे’, हे त्यांनी आनंदाने स्वीकारले. एवढेच नाही, तर त्यांनी मला सेवेसाठी अखंड साहाय्य केले आणि ते स्वतःही साधनेत कृतीशील झाले.

४ इ. घरच्यांचा नोकरीसाठी आग्रह असतांना यजमानांनी सेवेसाठी सहकार्य करून खंबीरपणे पाठीशी उभे रहाणे : माझ्या सासूबाई ‘शासकीय अधिकारी’ म्हणून मोठ्या पदावर नोकरी करत होत्या. त्यामुळे ‘घरात येणारी सून नोकरी करणारी असावी’, अशी घरातल्या सर्वांची अपेक्षा होती; मात्र यजमानांनी नोकरी करण्याचा मला कधीच आग्रह केला नाही. ‘उलट माझी सेवा कशी चालू राहील ?’, यासाठी ते प्रयत्न करायचे. नोकरीच्या कारणावरून घरात काही वेळा झालेल्या प्रसंगांमध्ये ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायचे.

४ ई. पत्नीकडे ‘साधक’ या दृष्टीने पहाणे : माझे सततचे आजारपण, सततचा दवाखाना, तसेच कौटुंबिक स्तरावरील अन्य समस्या ही सर्व परिस्थिती यजमानांनी मनापासून स्वीकारली होती. ते मला पुष्कळ समजून घ्यायचे. ते माझ्याकडे ‘साधक’ या दृष्टीने पहायचे. ‘आमचे नाते आध्यात्मिक स्तरावरचे आहे’, असे आम्हाला जाणवायचे.

५. यजमानांनी सासूबाईंच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांची मनापासून सेवा करणे आणि ते पाहून साधिकेच्या मनात स्वतःच्या आई-वडिलांप्रती कृतज्ञताभाव निर्माण होणे

माझ्या सासूबाईंना ३ वर्षे बीड जिल्ह्यात नोकरीसाठी जावे लागत होते. त्या प्रतिदिन संभाजीनगर-बीड असे जाऊन-येऊन नोकरी करायच्या. तेव्हा यजमान प्रतिदिन त्यांना बसस्थानकावर पोचवायला जायचे. त्यांना बसमध्ये बसवायचे आणि परत रात्री आणायला जायचे. ते सासूबाईंची सेवा पुष्कळ मनापासून करायचे. त्या नोकरीला किंवा कुठे बाहेर जायला निघाल्यावर यजमान त्यांचे साहित्य उचलून घ्यायचे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या चपलाही दाराबाहेर आणून त्यांच्या समोर ठेवायचे. ते त्यांच्या सर्व वेळा सांभाळून स्वतःची वकिलीची कामे करायचे. सासूबाईंनी त्यांच्यासाठी केलेल्या कष्टांची त्यांना पुष्कळ जाणीव होती. त्यामुळे ‘आईला आपल्याकडून कुठलाही त्रास होऊ नये’, याची त्यांनी शेवटपर्यंत काळजी घेतली. ‘आई-वडिलांवर प्रेम कसे करावे ?’, हे मला यजमानांच्या कृतीतून शिकायला मिळाले. त्यामुळे माझ्याही मनात माझ्या आई-बाबांविषयी कृतज्ञताभाव निर्माण झाला.

– श्रीमती अनिता चारुदत्त जोशी (पत्नी), संभाजीनगर (१८.५.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/491242.html