‘साधक-पती’ या नात्याने पत्नीची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि साधनेमुळे प्रतिकूल प्रसंगही सकारात्मकतेने स्वीकारणारे संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (वय ३९ वर्षे) !

२५ जून २०२१ या दिवशीच्या भागात आपण कै. चारुदत्त जोशी यांच्यातील सकारात्मकता, इतरांना साहाय्य करणे इत्यादी गुण पाहिले. आज त्यांच्या पत्नीला जाणवलेले त्यांचे अन्य गुण, तसेच निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांच्या सत्संगाचा साधनेसाठी त्यांना झालेला लाभ आणि त्यांच्यात झालेले पालट यांविषयीची सूत्रे पहाणार आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/489705.html


(भाग २)

कै. चारुदत्त जोशी

६. यजमानांचे जाणवलेले अन्य गुण

६ अ. आनंदी वृत्ती : यजमान कुठल्याही प्रसंगात नेहमी सकारात्मक आणि आनंदी असायचे.

६ आ. सर्वांशी मिळून-मिसळून रहाणे : यजमान नातेवाईक, तसेच इतर सर्वांशी मिळून-मिसळून रहायचे. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ते समोरच्या व्यक्तीला लगेच आपलेसे करायचे. त्यांची सर्व वयाच्या व्यक्तींशी लगेच जवळीक व्हायची. ते स्वतःच्या वागण्या-बोलण्यातून सर्वांना आनंद द्यायचे. त्यामुळे त्यांच्या सहवासात सर्वांच्या तोंडवळ्यावर हास्य उमटायचे. ते सर्व नातेवाइकांचे पुष्कळ लाडके होते.

६ इ. इतरांचा विचार करणे : ते पुष्कळ शिस्तप्रिय होते. एखाद्या वस्तूचा वापर झाल्यानंतर ती वस्तू पुन्हा त्याच ठिकाणी ठेवली पाहिजे; कारण ‘ती शोधण्यात इतरांचा वेळ जाऊ नये आणि त्यांना त्रास होऊ नये’, असा त्यांचा विचार असायचा.

६ ई. इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती

श्रीमती अनिता जोशी

१. ते माझ्या बाबांना त्यांच्या व्यवसायात साहाय्य करायचे. दोघांमध्येही ‘सासरे-जावई’ या नात्यापेक्षा ‘वडील-मुलगा’ असे नाते आहे’, असे जाणवायचे.

२. यजमानांच्या नातेवाइकांना त्यांचा आधार वाटायचा. कुणीही साहाय्य मागण्याआधीच ते साहाय्यासाठी धावून जायचे. एखाद्या कुटुंबातील विवाहसंबंधी गोष्ट असो किंवा इतर कुठली समस्या असो, सर्वांनाच त्यांचा सहभाग हवा असायचा. तेही तेवढ्याच आत्मीयतेने, प्रेमाने आणि निरपेक्षपणे साहाय्य करायचे. ‘भगवंताला माझ्याकडून हे अपेक्षित असेल’, या भावाने ते प्रत्येक कृती करायचे. त्यांनी काही कुटुंबांमधील पुष्कळ किचकट प्रश्नही सोडवले होते. तेव्हा ‘देवानेच हे माझ्याकडून करवून घेतले’, अशी त्यांची धारणा असायची.

६ उ. लहान भावाशी प्रेमाने वागणे : यजमान माझ्या लहान दिराला पुष्कळ समजून घ्यायचे. त्या दोघांमध्ये एकमेकांविषयी पुष्कळ प्रेम होते. ‘त्या दोघांत कधी कशावरून वाद झाला’, असे मी पाहिले नाही.

६ ऊ. वाहनांची पुष्कळ काळजी घेणे : ते त्यांच्या सर्व वाहनांची पुष्कळ काळजी घ्यायचे. ‘वाहन स्वच्छ ठेवणे, तसेच वाहनांचे वेळेवर ‘सर्व्हिसिंग’ करणे’, यांकडे त्यांचे लक्ष असायचे. ‘वाहन आपल्याला सदैव साहाय्य करते. त्यामुळे त्यालाही जपले पाहिजे’, असा त्यांचा भाव होता. त्यामुळे त्यांची वाहने जुनी असूनही नव्यासारखीच दिसतात.

६ ए. घरी पुष्कळ त्रास आणि अडचणी असतांनाही ‘प्रत्येक प्रसंग देवाच्या इच्छेने घडत आहे’, असा विचार करून सकारात्मक रहाणे : व्यावहारिकदृष्ट्या पाहिले, तर आमच्या घरी पुष्कळ त्रास आणि अडचणी आहेत. असे असूनही ‘प्रत्येक प्रसंग देवाच्या इच्छेने घडत आहे आणि देवाने तो आपल्या चांगल्यासाठी घडवला आहे’, असे यजमानांचे सकारात्मक विचार असायचे. ते ‘न्यायालयात घडलेल्या प्रसंगांत देवाने कसे सांभाळले ? वाईटातूनही चांगले कसे घडले ?’, असा सकारात्मक विचार करून आध्यात्मिक दृष्टीने सर्व प्रसंगांकडे पहायचे.

६ ऐ. परिस्थिती सहजतेने स्वीकारणे

६ ऐ १. पत्नी माहेरी गेली असतांना घरातील कामे विनातक्रार करतांना व्यष्टी साधनाही मनापासून करणे : मध्यंतरी माझ्या शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांमध्ये पुष्कळ वाढ झाल्याने मी ६ मास माझ्या माहेरी रहात होते. घरी केवळ यजमान आणि सासूबाई दोघेच रहात होते. तेव्हा दळणवळण बंदी असल्याने घरातील बरीचशी कामे यजमानांना करावी लागायची. या काळात त्यांचे ‘दिवसभर वेगवेगळे सत्संग, सेवा, व्यष्टी साधना, घरातील कामे’, असे सर्व चालू होते. त्यांनी दळणवळण बंदीच्या या काळाचा साधनेसाठी चांगला लाभ करून घेतला. ‘त्यांची साधना एकलव्याप्रमाणे चालू आहे’, असे मला वाटायचे.

६ ऐ २. पक्षकारांनी बुडवलेल्या पैशांच्या विचारात न अडकणे : एकदा एका पक्षकाराने यजमानांनी वर्षभर केलेल्या त्यांच्या वेगवेगळ्या कामांचे पैसे बुडवले. असे आणखी २ – ३ जणांनीही केले. त्यामुळे त्या कामासाठी त्यांनी केलेले परिश्रम वाया गेले. त्या वेळी आम्हाला पैशाची आवश्यकता असतांनाही यजमानांनी ते सर्व विचार देवाला अर्पण केले. यजमान मलाही त्या पैशात न अडकण्याविषयी सांगायचे. ते या प्रसंगांतून पुष्कळ सहजतेने बाहेर पडले.

६ ओ. सेवेची तळमळ

६ ओ १. कोणतीही सेवा करण्याची सिद्धता असणे : यजमान कोणतीही सेवा करायला तत्परतेने सिद्ध असायचे. ते ती सेवा तळमळीने आणि दायित्व घेऊन करायचे. ते व्यवहारापेक्षा सेवेला प्रथम प्राधान्य द्यायचे. ‘जिथे कमी, तिथे आम्ही’, असे ते उत्स्फूर्तपणे सांगायचे आणि तशी कृतीही करायचे. अन्य ठिकाणीही त्यांचा असाच विचार असायचा.

६ ओ २. गुरुपौर्णिमा, मेळावे इत्यादी कार्यक्रमांच्या वेळी साहित्याची ने-आण करण्याची सेवा दायित्वाने आणि परिपूर्ण करणे : हिंदु राष्ट्र-जागृती सभा, मेळावा किंवा गुरुपौर्णिमा अशा कार्यक्रमांच्या वेळी ते सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य चारचाकी गाडीतून ने-आण करण्याची सेवा करायचे. कार्यक्रम संपल्यावर ‘सर्व साहित्य त्या त्या ठिकाणी पुन्हा पोचवण्याचे सर्व दायित्व स्वतःचे आहे’, या विचाराने ते सेवा करायचे. ते म्हणायचे, ‘‘इतर साधक प्रतिदिन सेवा करतात. मला तशी सेवा करायला जमत नाही. आता प्रासंगिक सेवा मिळाली आहे, तर मी ती पूर्णपणे झोकून देऊन केली पाहिजे.’’

६ ओ ३. आढावा पाठवण्याची सेवा समयमर्यादेत करतांना साधकांच्या अडचणींचा विचार करून परिपूर्ण सेवा करणे : यजमानांकडे प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’, तसेच ‘ऑनलाईन सत्संग’ यांच्या वितरणाच्या संदर्भातील आढावा पाठवण्याची एक सेवा होती. केंद्रातील सर्व साधकांचा आढावा प्रतिदिन समयमर्यादेत येण्यासाठी त्यांना पुष्कळ तळमळ असायची. ज्या साधकांचा आढावा यायचा नाही, त्यांना ते आढावा पाठवण्याची प्रेमाने आठवण करून द्यायचे. ते मला म्हणायचे, ‘‘साधकांना पुष्कळ सेवा असतात. त्यामुळे त्यांच्याकडून आढावा पाठवायचा राहून जात असेल. ‘केवळ आलेला आढावा पुढे पाठवणे’, ही माझी सेवा नसून सर्व आढावा एकत्रित करण्यासाठी साधकांचा पाठपुरावा करणे’, हेही माझेच दायित्व आहे.’’ अशा व्यापक विचारांनी त्यांची सेवा चालू असायची. त्यांच्या अशा प्रयत्नांमुळे संभाजीनगर येथील आढाव्याची घडी पुष्कळ छान बसली आहे. ‘प्रत्येक सेवेतून साधना कशी करायची ?’, हे मला यजमानांकडून शिकायला मिळायचे.

७. निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांच्या सत्संगाचा साधनेसाठी झालेला लाभ

७ अ. पू. काकांनी यजमानांना साधनेसाठी वेळोवेळी दिशा देणे : यजमान साधनेत आल्यापासून त्यांच्या विचारांना पू. सुधाकर चपळगावकरकाकांनी पदोपदी योग्य दिशा दिली. त्यांच्यामुळे यजमानांच्या विचारांमध्ये व्यापकता निर्माण झाली. पू. काकांमुळे न्यायालयीन विषयांशी संबंधित सेवेचाही त्यांना अनेक वेळा लाभ झाला आणि अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पूर्वी यजमानांना ‘सिग्नल’ तोडणार्‍या किंवा कुठल्याही ठिकाणी अप्रामाणिकपणे वागणार्‍या व्यक्तींचा पुष्कळ राग यायचा. कुणी अशी अयोग्य कृती करतांना दिसल्यास ते त्यांना चुकीची जाणीव करून द्यायचे. तेव्हा त्यांची पुष्कळ चिडचिड व्हायची आणि त्यांना प्रतिक्रिया यायच्या. एकदा त्यांनी त्यांच्या मनाची होणारी ही चिडचिड पू. चपळगावकरकाकांना सांगितली. तेव्हा पू. काकांनी त्यांना पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले, ‘‘आपण इतरांमध्ये पालट करू शकत नाही. आपण केवळ स्वतःला पालटण्याचे प्रयत्न करू शकतो. कुणी चुकत असले, तरी आपल्याला त्याला रागावण्याचा अधिकार नाही. ‘रागावणे किंवा भांडण करणे’, यांमुळे आपली साधना व्यय होते.’’ पू. काकांनी दिलेले दृष्टीकोन यजमानांनी लगेच स्वीकारले आणि ते कृतीतही आणले.

७ आ. पू. काकांनी साधनेसाठी एकमेकांचे साहाय्य घेण्यास सांगणे : पू. काका आम्हा दोघांना साधनेच्या दृष्टीने मार्गदर्शन करायचे. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुम्ही साधनेविषयी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला आणि एकमेकांचे साहाय्य घ्या.’’ त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आम्हाला लाभ झाला. ‘आपण कुठे न्यून पडत आहोत ? कोणते प्रयत्न वाढवायला हवेत ?’, याविषयी आमचे चिंतन होऊन प्रयत्न वाढले.

पू. काकांच्या सहवासात यजमानांची अंतर्मुखता पुष्कळ वाढली होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना स्वतःत पुष्कळ पालट झाल्याचे जाणवून पू. काकांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटायची. ‘पू. काकांचा मिळणारा सहवास, म्हणजे गुरुदेवांनी माझ्यावर केलेली कृपाच आहे’, असे ते म्हणायचे.

८. परात्पर गुरु डॉक्टरांनी यजमानांचे केलेले कौतुक !

पूर्वी आम्हाला देवाच्या कृपेने रामनाथी, गोवा येथील आश्रमात सहकुटुंब जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाली. त्यावेळी गुरुदेवांनी यजमानांचे आणि त्यांच्या विचारांचे पुष्कळ कौतुक करून ‘‘ते साधनेत तुमच्यापेक्षा पुष्कळ पुढे आहेत’’, असे सांगितले.

९. सर्व साधकांना मिळालेले प्रभु श्रीरामाचे चित्र यजमानांना न मिळाल्याने त्याची ‘झेरॉक्स’ काढण्याविषयी यजमानांना विचारणे, त्यांनी ‘अशा प्रकारे मनाने कृती करायला नको’, असे सांगणे आणि त्या वेळी ‘याचा गुरुदेवांना त्रास व्हायला नको’, असा त्यांचा भाव असणे

यजमानांच्या मनात गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा आणि भाव होता. काही वर्षांपूर्वी साधकांना प्रभु श्रीरामाचे चित्र नामजपादी उपायांसाठी मिळाले होते. त्या वेळी मलाही ते चित्र मिळाले; मात्र यजमानांना ते मिळाले नव्हते. त्याचे मला फार वाईट वाटत होते. मी यजमानांना विचारले, ‘‘तुमच्यासाठी मी माझ्याकडील चित्राची ‘झेरॉक्स’ (छायांकित प्रत) काढू का ?’’ तेव्हा ते माझ्यावर रागावले आणि म्हणाले, ‘‘मला या चित्राची आवश्यकता असेल, तेव्हा गुरुदेव मला ते चित्र देतील. आताही सूक्ष्मातून गुरुदेव माझ्यासमवेत आहेत. अशा प्रकारची चुकीची कृती करून गुरुदेवांना किंवा सनातन संस्थेला त्रास झाला, तर मला चालणार नाही.’’ तेव्हा मला माझ्या चुकीच्या विचारप्रक्रियेची जाणीव झाली. यजमानांचा गुरुदेवांप्रती असलेला भाव पाहून माझी भावजागृती झाली. त्या वेळी ‘स्वतःच्या मनाने कोणतीही अयोग्य कृती करायला नको’, असे त्यांना वाटत होते.

१०. यजमानांमध्ये जाणवलेले पालट

१० अ. यजमानांमधील पालट पाहून नातेवाइकांना आश्चर्य वाटणे : साधनेमुळे यजमानांमध्ये पुष्कळ पालट झाले होते. आमच्या नातेवाइकांनाही त्याचे आश्चर्य वाटायचे. एका नातेवाईकांनी मला बोलून दाखवले, ‘‘दादांना (यजमानांना) या दीड-दोन वर्षांत काय झाले ?’, ते ठाऊक नाही; पण आता ‘त्यांना कशाचा राग आला आहे’, असे कधी दिसत नाही. अलीकडे त्यांच्या बोलण्यातून केवळ प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त होतो.’’

१० आ. ‘दादा स्थितप्रज्ञ झाला असून प्रत्येक प्रसंगात पुष्कळ स्थिर असतो’, असे लहान दिरांनी म्हणणे : माझ्या लहान दिरांना काही अडचण आल्यावर यजमानांनी दिलेल्या दृष्टीकोनांमुळे ते स्थिर व्हायचे. त्यांना यजमानांमधील पालट जाणवायचे. ते माझ्या सासूबाईंना म्हणाले, ‘‘दादा आता स्थितप्रज्ञ झाला आहे. तो प्रत्येक प्रसंगात पुष्कळ स्थिर असतो. परिस्थिती कशीही असली, तरी त्याला काही फरक पडत नाही. तो विचलित होत नाही.’’

१० इ. सासूबाईंनी यजमानांमधील पालट पाहून ‘माझा दादा संतच आहे’, असे उद्गार काढणे : मी ६ मास माहेरी राहून सासरी परत आल्यावर माझ्या सासूबाईंच्या डोळ्यांत अश्रू आले. दळणवळण बंदीच्या काळात यजमानांचा होत असलेला त्याग, मनोलय आणि परेच्छेने वागणे हे सर्व त्यांना जाणवत होते. त्या मला म्हणाल्या, ‘‘माझा दादा (सासूबाई यजमानांना ‘दादा’ म्हणायच्या.) संतच आहे. त्याच्या कसल्याही मागण्या नाहीत. कसलीही अपेक्षा नाही कि कशाविषयी गार्‍हाणे नाही. काही करायचे असल्यास तो मला म्हणायचा, ‘‘आई, तू सांग. त्याप्रमाणे आपण करू.’’

१० ई. व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढणे : यजमानांचे व्यष्टी साधनेविषयीचे गांभीर्य पुष्कळ वाढले होते. काही वेळा त्यांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या वेळी त्यांना मला रुग्णालयात न्यावे लागायचे. त्या वेळी ते त्यांची आढाव्याची वही समवेत ठेवायचे. आम्ही रुग्णालयाच्या प्रतिक्षालयात असतांना ते त्यांचा आढावा द्यायचे. ‘माझ्या शारीरिक त्रासामुळे त्यांनी आढावा देण्यात सवलत घेतली’, असे कधी झाले नाही. ते आढाव्यातील आनंद स्वतः घेऊन नंतर मलाही त्यातील सूत्रे सांगून आनंद देण्याचा प्रयत्न करायचे.

१० उ. ‘यजमानांचा राग न्यून होऊन त्यांची अंतर्मुखता आणि देवाशी अनुसंधान वाढले आहे’, असे जाणवणे अन् त्यांच्या सहवासात आनंद आणि शांती जाणवणे : पूर्वी यजमानांमध्ये ‘राग येणे आणि चिडचिडेपणा’ हे तीव्र स्वभावदोष होते. ‘त्यांच्यात इतर पुष्कळ चांगले गुण आहेत; पण या स्वभावदोषांच्या तीव्रतेमुळे त्यांच्या अन्य चांगल्या गुणांवर विरजण पडते’, असे मला वाटायचे; मात्र या दीड वर्षात त्यांच्यात पूर्णपणे पालट झाला होता. त्यांचे राग येण्याचे प्रमाण उणावले होते. गेल्या काही मासांपासून त्यांची अंतर्मुखता आणि देवाशी अनुसंधान वाढले आहे’, असे मला जाणवायचे. त्यांची स्थिरता पुष्कळ वाढली होती. त्यांच्या सहवासात आनंद आणि शांती जाणवायची. त्यांची वृत्ती पुष्कळ समाधानी होती. ‘आपल्याकडे आहे त्यात समाधान आणि आनंद मानावा. ‘आपल्याकडे काय नाही ?’, या विचारापेक्षा ‘देवाने आपल्याला काय दिले ?’, हे पाहून देवाच्या चरणी कृतज्ञ रहायला हवे’, असे ते मला म्हणायचे. जातांना मला जणू ‘ते साधनेची शिदोरीच देऊन गेले आहेत’, असे मला वाटते.

– श्रीमती अनिता चारुदत्त जोशी (पत्नी), संभाजीनगर

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/491509.html