‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने २ कोटी रुपयांची भूमी अवघ्या १० मिनिटांत १८ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केल्याचा आरोप !
अयोध्या – ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने मंदिरासाठी न्यूनतम मूल्याने भूमी खरेदी केली आहे. काही राजकीय पक्षांचे नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. आरोप करणारे लोक राजकारणाशी संबंधित असून समाजाची दिशाभूल करण्यासाठी राजकीय द्वेषातून ते हे आरोप करत आहेत, असे स्पष्टीकरण ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले आहे. या संदर्भात त्यांच्याकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रकच प्रसारित करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत आरोप केला आहे की, १० मिनिटांपूर्वी २ कोटी रुपयांना घेतलेली भूमी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने १८ कोटी ५० लाख रुपये देऊन विकत घेतली. या प्रकरणाची सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Ram Mandir land bought at below open market price, allegations of fraud politically motivated: Trust secretaryhttps://t.co/Na110gdeqq
— TIMES NOW (@TimesNow) June 14, 2021
१. या आरोपावर चंपत राय यांनी म्हटले आहे की, ९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराविषयी निकाल दिल्यानंतर देशभरातून लोक अयोध्येत भूमी विकत घेण्यासाठी येऊ लागले. त्यामुळे येथील भूमीचे भाव वाढले. ज्या भूमीची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होत आहे, ती रेल्वे स्थानकाच्या परिसराजवळ असलेली मोक्याची भूमी आहे. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने मंदिरासाठी आतापर्यंत जी भूमी खरेदी केली, ती न्यूनतम मूल्यात केली आहे. ज्याच्याशी व्यवहार होतो, त्याची संमती घेण्यात आल्यानंतर संबंधित कागदावर स्वाक्षर्या घेतल्या जातात. सर्व प्रकारची ‘कोर्ट फीस’ आणि ‘स्टॅम्प पेपर’ सर्व ऑनलाईन खरेदी केले जात आहे. भूमीची खरेदी संमतीपत्राच्या आधारावरच केली जात आहे. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे भूमीचा मोबदला विक्रेत्याच्या खात्यावर ऑनलाईन जमा केला जातो.’’
२. संजय सिंह त्यांच्या आरोपात म्हटले होते की, १८ मार्च २०२१ या दिवशी १० मिनिटांच्या अंतराने हे दोन्ही व्यवहार झाले. भारतातच काय; पण जगातील कुठल्याच भूमीचा भाव इतक्या वेगाने वाढत नाही. हे उघडपणे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. कोणत्याही ट्रस्टमध्ये भूमी खरेदी करण्यासाठी योग्य बोर्डाचा ठराव असतो. या ट्रस्टने केवळ ५ मिनिटांमध्ये हा प्रस्ताव संमत कसा केला आणि तात्काळ भूमीही खरेदी कशी केली?’’ पत्रकार परिषदेत सिंह यांनी काही कागदपत्रे दाखवली.
सीबीआय चौकशी करा ! – समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे
समाजवादी पक्षाचे नेते तथा अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे म्हणाले, ‘‘बाबा हरिदास यांनी ही भूमी सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांना विकली. त्यानंतर त्यांनी ही भूमी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला विकली. हा भाव २ कोटी रुपयांहून १८ कोटी ५० लाख रुपयांचा कसा होऊ शकतो ? अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय आणि ट्रस्ट विश्वस्त अनिल मिश्र यांच्या उपस्थितीत हा व्यवहार झाला. १७ कोटी रुपये तात्काळ खात्यावर जमा करण्यात आले. हे पैसे कुणी दिले आणि ते कुणाच्या खात्यात जमा करण्यात आले ? याची सीबीआयने चौकशी करावी.’’
१० वर्षांत भूमीचे मूल्य वाढले ! – माजी खासदार डॉ. रामविलास वेदांती
माजी खासदार डॉ. रामविलास वेदांती म्हणाले की, हे सर्व राजकीय आणि आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. प्रत्येक पैशाचे ट्रस्टमध्ये ऑडिट केले जाते. जेव्हा वर्ष २०११ मध्ये भूमी मालकाने करार केला होता, तेव्हा त्याचे मूल्य वेगळे होते आणि ट्रस्टला वर्ष २०२१ मध्ये ती विकेपर्यंत मूल्य वाढले होते. चंपत राय हे एक प्रामाणिक व्यक्ती आहेत. हे सर्व रामभक्तांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र आहे; कारण पूर्वीही राजकीय पक्ष हे करत आले आहेत.
विश्व हिंदु परिषद मानहानीचा दावा ठोकण्याच्या प्रयत्नात !
नवी देहली – विश्व हिंदु परिषद आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि अयोध्येतील माजी आमदार अन् समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांच्याविरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट करण्यावर विचार करत आहे. याविषयी विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी ही माहिती दिली.
आलोक कुमार म्हणाले की, या प्रकरणात सर्व व्यवहार बँकांच्या माध्यमातून झाला आहे. या भूमीचा सध्याचा दर २० कोटी रुपये आहे. त्यामुळे ट्रस्टने १८ कोटी ५० लाख रुपयांत व्यवहार मान्य केला.