औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. अशा वेळी कोणत्या वनस्पती लावाव्यात ? असा प्रश्न पडू शकतो. प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी, याविषयी माहिती दिली आहे. या सध्याचा आपत्काळ लक्षात घेता वृक्षवर्गीय वनस्पतींच्या लागवडीपेक्षा अशा वनस्पतींना प्राधान्य दिल्यास आपल्याला या वनस्पतींचा लगेच उपयोग होऊ शकतो. औषधी वनस्पतींची रोपे सहजपणे सर्वत्र उपलब्ध होत नाहीत. या समस्येवरील उपाययोजनाही या लेखातून मिळेल. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात. ११ जून या दिवशीच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, गुळवेल आणि कोरफड यांच्याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/485638.html |
संकलक : श्री. माधव रामचंद्र पराडकर आणि वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
मार्गदर्शक : डॉ. दिगंबर नभु मोकाट, साहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तथा प्रमुख निर्देशक, क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार.
५. कालमेघ
५ अ. महत्त्व : ही वनस्पती साथीच्या रोगांवर अतिशय उपयुक्त आहे. ही अत्यंत कडू असते. ही तापावर आणि जंतांवर वापरतात. ही सारक (पोट साफ करणारी) असल्याने काही ठिकाणी पावसाळ्यात आणि त्यानंतर येणार्या शरद ऋतूत आठवड्यातून एकदा हिचा काढा करून घेण्याचा प्रघात आहे. याने शरीर निरोगी रहाते. ही वनस्पती वात वाढवणारी असल्याने ताप नसतांना आणि वैद्यांनी सांगितल्याखेरीज हिचा काढा प्रतिदिन घेऊ नये.
५ आ. ओळख : या वनस्पतीला कोकणीत ‘किरायते’ म्हणतात. पावसाळ्याच्या आरंभी हिची पाने रुंद असतात. (छायाचित्र १) पावसाळा गेल्यावर पाने निमुळती होतात. पावसानंतर पाणी दिले, तर ही वनस्पती टिकते, नाहीतर वाळून जाते. बर्याच वेळा कोकणात पावसाळ्यानंतर वाळलेल्या अवस्थेत ही वनस्पती ठिकठिकाणी आढळते. हिला पावसाळ्याच्या शेवटी बारीक बोंडे येतात. (छायाचित्र २) यांमध्ये बी असते.
५ इ. लागवड : ही वनस्पती कोकणात बहुतेकांच्या घरी असते. पहिला पाऊस झाला की, या वनस्पतीची रोपे आधी पडलेल्या बियांपासून मोठ्या संख्येत तयार होतात. ही तयार रोपे आणून लावता येतात. पाऊस संपतांना जे बी होते, ते एकत्र करून ठेवल्यास दुसर्या वर्षी पावसाच्या आरंभी पेरून त्यापासूनही रोपे बनवता येतात.
६. जाई
६ अ. महत्त्व : रक्तस्राव थांबवण्यासाठी जाईच्या पानांचा उपयोग होतो. तोंड येते तेव्हा जाईची पाने चावून थुंकल्यास लगेच बरे वाटते. ४ जणांच्या कुटुंबासाठी एखादे झाड असावे.
६ आ. सापडण्याचे ठिकाण : काही देवस्थानांमध्ये जाईच्या फुलांचा उत्सव असतो, उदा. गोव्यातील शिरोड्याचे कामाक्षी देवस्थान, म्हार्दाेळचे महालसा देवस्थान. अशा गावांमध्ये जाईची शेती केली जाते. बर्याच लोकांच्या घरी जाई असते.
६ इ. लागवड : जाईच्या फांद्या आणून लावल्यास त्या होतात. पावसाळ्यात जाईच्या फांद्या लावायच्या असल्यास मुळांना उष्णता मिळावी, यासाठी फांदीच्या मुळाकडील भागाभोवती वाळलेल्या गवताच्या १ – २ काड्या गुंडाळाव्यात. यामुळे आवश्यक तेवढी उष्णता मिळून फांदीला मुळे फुटतात. गवत न गुंडाळल्यास थंडाव्याने फांदी कुजू शकते.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.: https://sanatanprabhat.org/marathi/486664.html |