महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?

औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. अशा वेळी कोणत्या वनस्पती लावाव्यात ? असा प्रश्न पडू शकतो. प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?, याविषयी माहिती दिली आहे. या वनस्पती लागवड केल्याच्या साधारण ३ मासांपासून त्या औषधांसाठी वापरता येण्यासारख्या आहेत. सध्याचा आपत्काळ लक्षात घेता वृक्षवर्गीय वनस्पतींच्या लागवडीपेक्षा अशा वनस्पतींना प्राधान्य दिल्यास आपल्याला या वनस्पतींचा लगेच उपयोग होऊ शकतो. औषधी वनस्पतींची रोपे सहजपणे सर्वत्र उपलब्ध होत नाहीत. या समस्येवरील उपाययोजनाही या लेखातून मिळेल. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात. या लेखात दिलेल्या औषधी वनस्पतींचा औषधांत उपयोग कसा करावा ? याची माहिती सनातनचे ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’, ‘११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म’ आणि ‘९५ वनस्पतींचे औषधी गुणधर्म’ यांत दिली आहे.

संकलक : श्री. माधव रामचंद्र पराडकर आणि वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

मार्गदर्शक : डॉ. दिगंबर नभु मोकाट, साहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तथा प्रमुख निर्देशक, क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार.

१. तुळस

१ अ. महत्त्व : ‘सर्व प्रकारच्या तापांमध्ये तुळशीचा काढा उपयुक्त आहे. तुळशीचे बी थंड असून मूत्रविकारांवर मोठे औषध आहे. यामुळे घराभोवती तुळशीची लागवड शक्य तेवढ्या अधिक प्रमाणात करावी. येण्याजाण्याच्या वाटेच्या दोन्ही बाजूंना तुळशीची रोपे लावता येतात. याने वातावरण प्रसन्न रहाते. काळी (कृष्ण तुळस) किंवा पांढरी (राम तुळस) कोणतीही तुळस लावली, तरी चालते.

१ आ. बियांद्वारे लागवड : तुळशीची वाळलेली मंजिरी हातावर चोळल्यास तिच्यातून बारीक बिया निघतात. या बिया रुजत घालण्यापूर्वी हातावर चोळाव्यात. असे केल्याने बीच्या वरील टरफल काही प्रमाणात घासले जाते आणि बियांची रुजून येण्याची शक्यता वाढते. ‘साधारणपणे बीची जेवढी जाडी असते, तेवढ्या जाडीचा मातीचा थर बीच्या वर असावा’, असे शास्त्र आहे. तुळशीचे बी आकाराने अगदी लहान असल्याने बियांवर थोडीशीच माती भुरभुरवावी. बी जास्त खोल पुरल्यास रुजून येत नाही. बी रुजत घातल्यावर पाणी देतांना काळजीपूर्वक द्यावे, नाहीतर बीवरील माती बाजूला सरून बी उघडे पडण्याची शक्यता रहाते. रोप ४ ते ६ इंचाचे झाल्यावर अलगद काढून योग्य त्या जागी लागवड करावी.

१ आ १. मुंग्यांचा प्रतिबंध करण्याचे उपाय : तुळशीच्या बियांना लगेच मुंग्या येतात. मुंग्या येऊ नयेत, यासाठी ज्या कुंडीत बी रुजत घातले आहे, ती कुंडी पाण्यात ठेवावी. यासाठी रंगाच्या डब्याचे प्लास्टिकचे झाकण घेऊन त्यामध्ये पाणी घालावे आणि त्यामध्ये मध्यभागी कुंडी ठेवावी. कुंडीच्या भोवताली पाणी नेहमी राहील, असे पहावे, नाहीतर जेव्हा पाणी नसते, तेव्हा मुंग्या कुंडीत येऊन बी खाऊ शकतात. मुंग्यांचा प्रतिबंध करण्यासाठी कुंडीभोवती कापूर, फिनाईल यांपैकी काहीही एक कुंडीच्या भोवती थोडे थोडे घालून ठेवता येते. बिया रुजून आल्यावर जी रोपे बनतात, ती काढून भूमीत लावता येतात.

१ इ. पावसाळ्यात आपोआप उगवणार्‍या रोपांपासून लागवड : पावसाळ्यात आधी पडलेल्या बियांपासून झाडाखाली आपोआप रोपे उगवतात. ही रोपेही अलगद मुळासकट काढून योग्य त्या ठिकाणी लावावीत.

१ ई. रोपांची घ्यायची काळजी : तुळशीच्या रोपांना नियमित पाणी द्यावे आणि मंजिर्‍या वाळत आल्यावर खुडाव्यात.

२. अडुळसा

२ अ. महत्त्व : अडुळशाला ‘भिषङ्माता (वैद्यांची आई)’ असे म्हटले आहे. अनेक रोगांमध्ये याचा उपयोग होतो. अडुळसा साथीच्या रोगांमध्ये अत्यंत उपयोगी आहे. गोवर, कांजिण्या, ताप यांची साथ येते, त्या वेळेस अडुळशाचा पोटात घेण्यासाठी, तसेच अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ करण्यासाठी उपयोग होतो. याच्या पानांमध्ये भाजी आणि फळे इत्यादी ठेवल्यास जास्त दिवस टिकतात. अडुळसा आपल्या घराभोवती जास्तीतजास्त प्रमाणात लावावा. जागेच्या कुंपणाला अडुळशाची झाडे लावावीत.

२ आ. ओळख आणि सापडण्याचे ठिकाण : ही वनस्पती शहरांतही आढळते. काही ठिकाणी ही वनस्पती पुष्कळ मोठ्या प्रमाणात आढळते, उदा. ‘फोंडा तिस्क’वरून रामनाथीला जातांना ‘दाग’ येथील सरस्वती मंदिराच्या समोर रस्त्याच्या डावीकडे पुष्कळ मोठ्या प्रमाणात अडुळसा पहायला मिळतो. या वनस्पतीची पाने हिरवीगार आणि भाल्याच्या पात्यासारखी टोकदार असतात. पिकलेली पाने पिवळ्या रंगाची असतात. पानांना विशिष्ट गंध असतो. (छायाचित्र क्र. १) डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत फुले येतात. फुले पांढर्‍या रंगाची असतात. फुलाचा आकार जबडा उघडलेल्या सिंहाच्या मुखाप्रमाणे असतो. त्यामुळे याचे एक संस्कृत नाव ‘सिंहास्य’ असे आहे. ‘सिंहास्य’ म्हणजे ‘सिंहाच्या तोंडाप्रमाणे आकार असलेला.’ (छायाचित्र क्र. २)

२ इ. फांद्यांपासून लागवड : अडुळशाच्या राखाडी रंगाच्या परिपक्व फांद्या कापून लावाव्यात. फांद्या कापतांना पेराच्या थोडे खाली कापावे. (‘पेर’, म्हणजे ‘खोडाला पाने जिथे जुळतात, तो भाग’.) जो भाग मातीत पुरला जाणार आहे, तेथील पेरावरील पाने कापावीत. त्या ठिकाणी मुळे फुटतात. पानांमुळे पाण्याचे बाष्पीभवन होते, तसेच झाडाला त्याचे अन्न सिद्ध करता येते. उन्हाळ्यात लागवड करायची झाल्यास फांदीमधील पाण्याचे बाष्पीभवन अधिक होऊ नये; परंतु फांदीला तिचे अन्नही बनवता यावे, यासाठी वरची पाने अर्ध्यावर कापावीत. पावसाळ्यात लागवड करतांना वरची पाने कापण्याची आवश्यकता नसते. अडुळशाची फांदी लावल्यावर तिला साधारण १५ दिवसांत मुळे फुटतात. आधीची पाने गळून जातात आणि नवीन पाने येतात.

३. गुळवेल

३ अ. महत्त्व : हिच्या गुणांना अंत नाही. कोरोनाच्या काळात गुळवेलीचे महत्त्व सर्वांना ठाऊक झाले आहे. तापापासून दम्यापर्यंत बहुतेक रोगांमध्ये हिचा लाभ होतो. गुळवेल ही उत्तम रसायन (शक्तीवर्धक) आहे. दुभत्या गुरांना गुळवेल खाऊ घातल्यास त्यांचे दूध वाढते. हिची अधिकाधिक प्रमाणात लागवड करावी.

३ आ. ओळख : रस्त्यावरून येता-जाता पावसाच्या दिवसांत काही झाडांवरून पिवळट हिरव्या रंगाचे २ – ३ मिलिमीटर व्यासाचे तंतू लोंबतांना दिसतात. हे तंतू गुळवेलीचे असतात. हिची बाह्य साल करड्या रंगाची असते आणि सालीवर फोडांप्रमाणे उंचवटे असतात. यांना इंग्रजीत ‘लेंटिसेल्स (lenticels)’ म्हणतात. कांड कुटल्यावर वरची करड्या रंगाची साल सुटते आणि आतील हिरवट रंगाची साल दिसू लागते. गाभा पिवळ्या रंगाचा असतो. गुळवेलीच्या कांडाचा धारदार शस्त्राने ‘आडवा छेद (क्रॉस सेक्शन)’ घेतला असता आतमध्ये चक्राकार भाग दिसतो. (छायाचित्र क्र. ३) ओली गुळवेल कापली असता तिच्यातून पारदर्शक पाण्यासारखा द्रव पाझरतो. हा द्रव किंचित् कडूसर असतो.

३ इ. लागवड : गुळवेलीचे कांड कापून भूमीवर ठेवून दिले आणि त्याला पोषक वातावरण मिळाले, तरी त्याच्यातून वेल सिद्ध होते. कापून टाकलेल्या गुळवेलीपासूनही पुन्हा वेल तयार होते; म्हणून तिला ‘छिन्नरुहा (छिन्न – कापल्यावर, रुहा – पुन्हा निर्माण होणारी)’ असेही संस्कृत नाव आहे. गुळवेलीच्या कांडाचे वीतभर लांबीचे तुकडे मातीत उभे पुरावेत. कांड कापतांना मुळाकडील बाजूला तिरकस कापावे. हा तिरकस भाग बाजारात मिळणार्‍या ‘रूटेक्स’ पावडरमध्ये बुडवून गुळवेलीचे कांड मातीत लावल्यास कांडाला लवकर मुळे फुटतात. (कोणत्याही वनस्पतीची फांद्यांपासून अभिवृद्धी करायची असतांना याप्रमाणे रूटेक्स पावडरचा वापर केल्यास फांद्यांना लवकर मुळे फुटतात आणि त्या जगण्याची शक्यता वाढते.) कुंपणावर, सज्जातील गजांवर, आंबा, कडूनिंब यांसारख्या वृक्षांवर ही वेल सोडावी. ही वेल विषारी वृक्षांवर (उदा. काजरा किंवा कुचला) सोडू नये; कारण तसे केल्यास त्या वृक्षाचे विषारी गुण गुळवेलीत उतरतात.

४. कोरफड

४ अ. महत्त्व : हे नियमित लागणारे औषध नाही. भाजणे – पोळणे, मासिक पाळीचे त्रास, खोकला, कफ यांमध्ये कोरफडीचा उपयोग होतो. ४ माणसांच्या कुटुंबासाठी २ ते ४ रोपे पुरेशी होतात; पण घराभोवती जागा असेल, तर १० ते १२ रोपे लावू शकतो.

४ आ. लागवड : बर्‍याच लोकांकडे कोरफड लावलेली असते. कोरफडीला बाजूने नवीन मुनवे येतात. (मुनवा म्हणजे झाडाला मुळाकडून येणारे नवीन रोप.) हे मुनवे काढून लावले असता त्यांपासून नवीन झाडे तयार होतात. शेजार्‍यापाजार्‍यांकडून १ – २ मुनवे मागून आणून लावले, तर वर्षभरात आपल्याकडे ४ जणांना पुरेल एवढी कोरफड तयार होते. हिची रोपे रोपवाटिकांमध्ये विकतही मिळतात.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/485982.html

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘कोरोनाच्या साथीमध्ये उपयोगी ठरू शकणारी आयुर्वेदातील औषधे’ या लेखात दिल्याप्रमाणे औषधोपचार करून आलेले अनुभव कळवा !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

८.५.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘कोरोनाच्या साथीमध्ये उपयोगी ठरू शकणारी आयुर्वेदातील औषधे’ हा पू. वैद्य विनय भावे यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. ज्यांनी या लेखात दिल्याप्रमाणे औषधोपचार करून पाहिले असतील, त्यांनी याविषयी आपल्याला आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव [email protected] या ई-मेल पत्त्यावर टंकलिखित करून पाठवावेत किंवा लिखित स्वरूपात पुढील पत्त्यावर पाठवावेत.

टपालासाठी नाव आणि पत्ता : ‘सौ. भाग्यश्री सावंत, सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.८.२०२१)