चक्रीवादळांच्या पार्श्‍वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी १ सहस्र ४८२ कोटी रुपयांच्या निधीची विभागीय आयुक्तांकडे मागणी

  • जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना,

  • कडक निर्बंध, लसीकरण, तसेच संभाव्य अतीवृष्टी या विषयांवर आढावा बैठक

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – चक्रीवादळांच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी १ सहस्र ४८२ कोटी रुपये आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी एका पत्राद्वारे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध, लसीकरण, तसेच संभाव्य अतीवृष्टी यांविषयी १० जूनला आढावा बैठक घेतली. या बैठकीत उपरोक्त मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चक्रीवादळांच्या पार्श्‍वभूमीवर करावयाच्या कायमस्वरूपी उपाययोजनांमध्ये धूपप्रतिबंधक बंधारे बांधणे, चक्रीवादळ प्रवण भागात भूमीगत विद्युत्वाहिन्या टाकणे, वीज अटकाव यंत्रणा उभारणे, वादळाची पूर्वसूचनाप्रणाली बसवणे, शाळांमध्ये चक्रीवादळ प्रतिरोधक निवारे उभारणे, दरड प्रवण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे या कामांचा समावेश असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

कोरोनाबाधितांचे समुपदेशन करण्यासह योग आणि काढे देण्यावरही भर द्यावा !   

या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘‘जिल्ह्यात होणार्‍या कोरोनाच्या चाचण्या आणखी वाढवाव्यात. त्याचबरोबर आरोग्य विभागाने रुग्णांचे समुपदेशन करावे. योग आणि काढे देणे यांवरही भर द्यावा. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी राज्याच्या ‘टास्क फोर्स’शी कायम संपर्कात राहून उपचाराविषयी चर्चा करावी.’’