कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळेच मृत्यूच्या अहवालास विलंब झाल्याचा खासगी रुग्णालयांचा दावा

मडगाव, ९ जून (वार्ता.)-  ‘गोंयकारपण’ संकेतस्थळाने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या लपवून ठेवणार्‍या रुग्णालयांची नावे उघड केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी येथील ‘मदर केअर’ रुग्णालयाने ‘कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे मृतांच्या संख्येची माहिती देण्यास विलंब झाला’, अस निवेदन दिले आहे. ‘मदर केअर’ रुग्णालयाचे संचालक सागर उटगी यांनी ‘गोंयकारपण’ला केलेल्या इमेलमध्ये म्हटले आहे की, ‘‘आपल्या संकेतस्थळावर ‘आमच्या रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद दिली गेली नाही’, असे सांगणारे एक वृत्त आले आहे. ते चुकीचे आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी आम्ही आमचे संपूर्ण रुग्णालय कोरोना रुग्णालयात रूपांतरित केले होते; म्हणूनच

१५ एप्रिल २०२१ पासून आमच्या रुग्णालयात होणारे सर्व मृत्यू हे कोरोनाबाधित रुग्णांचे होते. जेव्हा ऑनलाईन पोर्टल अद्ययावत् करायचे असते, तेव्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी प्रतिदिन मृतांची संख्या, नवीन रुग्णांची संख्या, वापरलेले ऑक्सिजन सिलिंडर आणि आवश्यक असणारे सिलिंडर ही माहिती नोंदवली होती. कर्मचार्‍यांची तीव्र कमतरता आणि रुग्णांच्या वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी असलेला प्रचंड दबाव यांमुळे ‘एक्सेल शीट’ मध्ये उल्लेख केलेल्या रुग्णांचा तपशील काही दिवस विलंबाने देण्यात आला. आम्ही आशा करतो की, आम्ही ज्या कठीण परिस्थितीत काम केले आहे, ते आपण समजून घ्याल. सर्व मृत्यूंसाठी मृत्यूचे कारण मृताच्या नातेवाइकांना अंत्यसंस्कार करण्याआधी द्यावे लागते. मृत्यूचा दाखला देण्यासाठी आम्हाला स्थानिक पालिकेला तपशीलही सादर करावा लागतो.’’

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती न देणार्‍या खासगी रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

९ मास खासगी रुग्णालयांकडून मृत्यूची माहिती येत नसल्याचे प्रशासनातील कुणालाच लक्षात आले नाही का ? त्यांच्यावरही कारवाई झाल्यास सुप्रशासन निर्माण होईल !

गेल्या ९ मासांत कोविडमुळे मृत्यू पावलेल्या एकूण ६७ रुग्णांविषयी माहिती न देणार्‍या खासगी रुग्णालयांना शासनाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.