भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी आतापासून औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्काळातील संजीवनी  औषधी वनस्पती !

मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/485172.html

११. औषधी वनस्पतींपासून मिळणार्‍या उत्पन्नाची काढणी आणि साठवण

११ आ. औषधी वनस्पती काढण्यापूर्वी तिला आवाहन आणि प्रार्थना करणे

१. शनिवारच्या दिवशी काढलेली वनस्पती अधिक परिणामकारक ठरते, असे जाणते वैद्य सांगतात. यासाठी वनस्पतीचा कोणताही भाग किंवा पूर्ण वनस्पती शनिवारी काढावी. रुग्णाला तातडीने आवश्यकता असल्यास ती कधीही काढली, तरी चालते.

२. वनस्पती काढण्याच्या आदल्या दिवशी वनस्पतीला हात जोडून कृतज्ञता व्यक्त करावी, ‘हे वनस्पती, रुग्णाला आरोग्य लाभण्यासाठी तू स्वतःला अर्पण करत आहेस. तुझ्या त्यागाची मला जाणीव राहू दे. मी तुझ्याप्रती कृतज्ञ आहे.’ त्यानंतर तिला प्रार्थना करावी, ‘हे वनस्पती, उद्या मी तुला न्यायला येईन. त्या वेळी तुझ्यातील औषधी गुणधर्म वृद्धींगत होऊ देत. त्यांचा रुग्णाला यथोचित लाभ होऊ दे. तुझी आम्हा सर्वांवर कृपादृष्टी असू दे.’

३. दुसर्‍या दिवशी वनस्पती काढण्यापूर्वीही परत कृतज्ञता व्यक्त करून, तसेच प्रार्थना करून ती काढावी.

११ इ. वनस्पतींची विविध अंगे काढण्याच्या पद्धती

११ इ १. मुळे

अ. ‘सर्पगंधा, अश्वगंधा यांसारखी पिके काढणीला आल्यावर भूमीपासून १५ सें.मी. वर ती कापून शेताला हलके पाणी द्यावे. त्यामुळे मुळ्या काढणे सोपे जाते. ट्रॅक्टर किंवा बैल नांगरणीच्या साहाय्याने किंवा कुदळीने मुळांची काढणी करता येते.

आ. अनंतमुळासारख्या, म्हणजे ज्या वनस्पतींची लागवड मुळांचे छाट लावून केली जाते, अशा वनस्पतींची मुळे काढतांना मुळाचा काही भाग भूमीत ठेवून मुळे काढावीत. म्हणजे पुढील लागवडीचा व्यय अल्प करता येतो.

इ. मुळांची काढणी केल्यावर त्या मुळांमध्ये माती रहाणार नाही, याची काळजी घ्यावी.’

११ इ २. कांड (वनस्पतींचे तुकडे) : ब्राह्मी, दूर्वा यांसारख्या पसरणार्‍या वनस्पती काढतांना त्यांची मुळे आणि भूमीलगत खोड ठेवून कापणी करावी. यामुळे राहिलेल्या मुळांमधून त्या वनस्पती परत उगवतात.

११ इ ३. साल

अ. ‘झाडाची साल काढतांना ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी योग्य आहे. यामुळे साल काढलेल्या भागाची जखम पावसाळ्यापूर्वी भरून येते. साल काढतांना चारही बाजूंची साल न काढता प्रथम एका बाजूच्या १० ते २० सें.मी. इतक्या भागाची साल काढावी. त्यानंतर त्या समोरील भागाची साल २ मासांनंतर काढावी.

आ. वृक्षांच्या खोडाची साल कशीही ओरबडून काढल्याने वृक्ष मरतात. अशास्त्रीय पद्धतीने साल काढल्याने आज अनेक प्रजाती दुर्मिळ होत आहेत. एका अभ्यासावरून असे दिसून आले की, अर्जुन वृक्षाची ५ Ñ १० सें.मी. आकाराची काढलेली सालीची जखम १० महिन्यांत पूर्ण भरून येते. या अभ्यासामध्ये २० ते ३० सेंमी घेराच्या झाडामध्ये सालीची प्रत चांगली मिळाली. त्यामुळे झाड २५ ते ३० सें.मी. घेराचे झाल्यानंतर त्याची साल काढावी. सालीसाठी मुख्य खोडाऐवजी फांद्या तोडल्यास झाडाची जास्त हानी होत नाही.

११ ई. वनस्पतींची साठवण

१. वनस्पतीची काढणी झाल्यावर ती कच्च्या स्थितीत, म्हणजे औषधी कल्प न बनवता ठेवायची असल्यास नीट वाळवून ठेवावी लागते. औषधी वनस्पती ही सर्वसाधारणपणे सावलीत आणि तेही पातळ थरात पसरवून सुकवणे योग्य असते. काही औषधी कडक उन्हात सुकवल्यास त्यांतील गुणद्रव्ये न्यून होऊ शकतात.

२. मुळे, साली यांसारख्या वनस्पतींच्या जाड आणि मोठ्या अंगांचे लहान लहान तुकडे करून वाळवावेत.

३. औषधी वनस्पती वाळत घालतांना कापडाने झाकाव्यात. यामुळे त्यांमध्ये केरकचरा पडणार नाही.

४. औषधींच्या वाळवणावर दव पडू देऊ नये. त्यावर दव पडल्यास त्यातील औषधी द्रव्ये घटतात.

५. सावलीमध्ये नीट वाळलेल्या वनस्पती जास्त प्रमाणात असल्यास गोणपाटामध्ये किंवा अल्प प्रमाणात असल्यास हवाबंद प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवाव्यात. हे गोणपाट किंवा पिशव्या खेळत्या, तसेच कोरड्या हवेच्या ठिकाणी ठेवाव्यात.

११ उ. औषधांमध्ये कार्यशील तत्त्वे टिकण्याचा कालावधी

१. वनस्पतीचा रस आणि काढा हे नेहमी ताजेच वापरावेत.

२. चूर्णातील तत्त्व ४ मासच कार्यशील रहाते. वनस्पती चूर्ण न करता अखंड ठेवल्यास तेच तत्त्व एका वर्षापर्यंत कार्यशील रहाते.

३. वनस्पतींपासून आसवे किंवा अरिष्टे (स्वयंजनित मद्यार्क) बनवल्यास ती अनेक वर्षे कार्यशील रहातात.

(या लेखाचा क्रमशः भाग वाचा पुढील बुधवारी)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’)

वाचा उद्याच्या अंकात 

‘महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?’, याचे विस्तृत विवेचन

पुढील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/488955.html