भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्काळातील संजीवनी औषधी वनस्पती !

संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील; म्हणून आतापासूनच आपण त्यांच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/484765.html

११.  औषधी वनस्पतींपासून मिळणार्‍या उत्पन्नाची काढणी आणि साठवण

ताज्या वनस्पती नेहमीच उपलब्ध होतील, असे नसल्याने वनस्पती ज्या दिवसांत उपलब्ध होतात, त्या दिवसांत त्या गोळा करून त्यांची साठवण करावी लागते.

११ अ. औषधी वनस्पती काढण्याविषयीचे सर्वसाधारण नियम

११ अ १. कोणती वनस्पती घेऊ नये ?

अ. कीड लागलेली किंवा जळलेली वनस्पती औषधाकरता घेऊ नये.

आ.    प्रदूषित ठिकाणची, सांडपाण्याच्या जवळची, रस्त्यावरील, तसेच स्मशान, वारूळ, घाण, दलदल आदी ठिकाणची वनस्पती घेऊ नये.

११ अ २. वनस्पतींची काढणी कधी करावी ?

अ. कालमेघ, टाकळा यांसारख्या पावसाळ्याच्या दिवसांत उगवणार्‍या, तसेच वर्षायू वनस्पती पूर्ण पक्व झाल्यावर काढाव्यात.

आ. कोणत्याही वनस्पती काढून जास्त दिवसांसाठी साठवून ठेवायच्या असतील, तर त्या पावसाळा संपल्यावर काढाव्यात. पावसाच्या दिवसांत वनस्पती वाळवता येत नाहीत आणि त्या नीट वाळल्या नाहीत, तर बुरशी येऊन खराब होऊ शकतात.

इ. वृक्षाची साल काढायची झाल्यास वृक्ष ८ ते १० वर्षांचा झाल्यानंतर त्याची साल काढावी. त्याआधी साल काढू नये.

ई. आयुर्वेदाच्या ग्रंथांत जेथे ‘वनस्पतीचे मूळ घ्यावे’, असे सांगितले असेल, तेथे ती वनस्पती वृक्ष वर्गातील असल्यास त्या वनस्पतीच्या खोडाची साल घ्यावी आणि ती वेल किंवा लहान वनस्पती असल्यास तिचे पूर्ण मूळ घ्यावे. काही विशिष्ट कारणांसाठी वृक्ष वर्गातील वनस्पतींचेही मूळच वापरायचे असल्यास जाड आणि खोल गेलेल्या मुळाचा एका बाजूचा लहानसा तुकडा काढावा. मूळ जास्त दुखवू नये.

उ. शतावरी, अश्वगंधा, वेखंड आदी वनस्पतींची मुळे औषधामध्ये वापरतात. अशा वनस्पतींची मुळे सर्वसाधारणपणे लागवडीनंतर १८ मासांनी काढणीस येतात.

११ अ ३. वनस्पती केव्हा तोडू नयेत ? : ‘सूर्य उगवणे आणि मावळणे यांच्या अगोदर अर्धा घंटा झाडे झोपलेली असतात. या काळात त्यांना दुखवू नये आणि त्यांच्या फांद्या तोडू नयेत.’ – पू. डॉ. दीपक जोशी उपाख्य गणेशनाथजी (२३.४.२०१३)

११ अ ४. साठवणीसाठी वनस्पतीचा कोणता भाग कोणत्या ऋतूत काढावा ? : वनस्पतींमधील औषधी तत्त्वाचे प्रमाण निरनिराळ्या ऋतूत पालटत असल्याने वनस्पतींचा संग्रह करण्याचे सर्वसाधारण नियम येथे दिले आहेत.

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’)

ज्या व्यक्तींकडे मध्यम (३ – ४ एकर) किंवा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यायोग्य भूमी आहे, अशा व्यक्तींनी केवळ स्वतःच्या परिवारापुरताच विचार न करता समाजबांधवांचा विचार करून मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करावी. या लागवडीमुळे अनेकांना आयुर्वेदीय औषधे उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्यरक्षण होईल. या निःस्वार्थी समाजसेवेच्या माध्यमातून अशा व्यक्तींची समष्टी साधना होईल !  

सनातनच्या रामनाथी आश्रमात लागवडीची सेवा करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !

सर्वत्रचे साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुवर्णसंधी !

‘सनातनच्या रामनाथी आश्रम परिसरात विविध औषधी वनस्पती, फळे, फुले आदींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या झाडांचे वानरांपासून संरक्षण करणे, झाडांची देखभाल करणे, औषधी वनस्पतींची रोपे सिद्ध करणे, नवीन फुलझाडांची लागवड करणे, या सेवांसाठी साधकांची आवश्यकता आहे. शेती करण्याचा अनुभव असलेल्या आणि शारीरिक सेवा करू शकणार्‍या साधकांना या सेवेत सहभागी होता येईल. इच्छुक साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खालील सारणीनुसार आपली माहिती पाठवावी.

टपालाचा पत्ता : श्री. विष्णु जाधव, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संगणकीय पत्ता : [email protected]

यात काही शंका असल्यास श्री. विष्णु जाधव यांच्याशी ८२०८५१४७९१ या क्रमांकावर संपर्क करावा.’

– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०२१)