लंडन – ब्रिटनमध्ये आयुर्वेदाच्या औषधांचा वापर झपाट्याने वाढत आहे. आता ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य योजनेत आयुर्वेदाचा औपचारिक समावेश करण्याची सिद्धता चालू झाली आहे. एका सर्वपक्षीय समितीने आयुर्वेदाची प्रभावी आणि उत्तम औषध प्रणाली म्हणून शिफारस केली आहे. भारतातील आयुर्वेदाच्या डॉक्टरांसाठी ही एक चांगली बातमी ठरू शकते. पुढील ५ वर्षांत ब्रिटनमध्ये १० सहस्र आयुर्वेदाच्या डॉक्टरांची भरती केली जाईल. त्याच वेळी ब्रिटनमधील आयुर्वेदाशी संबंधित सौंदर्य, आरोग्य आणि शैक्षणिक संस्था यांची संख्याही ५ वर्षांत ५०० पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे.
भारतीय आयुर्वेदाच्या पदवीला मान्यता
ब्रिटनच्या ‘आयुर्वेद सेंटर फॉर एक्सलन्स’चे (‘एसीई’चे) प्रमुख अमरजीत सिंह ब्रह्मा म्हणाले की, ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य योजनेत आयुर्वेदाचा समावेश करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. यानंतर भारतातील सरकारी मान्यताप्राप्त संस्थांकडून आयुर्वेदाची पदवी घेतलेले आयुर्वेदाचे डॉक्टर ब्रिटनमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतील.
ब्रिटनमध्ये आयुर्वेदाच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ
ब्रिटनमध्ये आयुर्वेदाचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. यावर्षी ‘ब्रिटिश कॉलेज फॉर आयुर्वेद’मध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या ७० टक्क्यांनी वाढली आहे.