Cyclone Fengal : ‘फेंगल’ चक्रीवादळाचा तमिळनाडूला फटका; मात्र जोर ओसरला !

(फेंगल हा अरबी शब्द असून याचा अर्थ उदासीन असा आहे.)

नवी देहली – ‘फेंगल’ चक्रीवादळाने तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर पुद्दुचेरी, कुड्डालोर आणि विल्लुपूरम् यांच्या शेजारी भागात अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे चक्रीवादळ हळूहळू पश्‍चिमेकडे सरकेल आणि नंतर त्याची तीव्रता न्यून होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तत्पूर्वी ३० नोव्हेंबरला  सायंकाळी ५.३० वाजता हे चक्रीवादळ पुद्दुचेरीच्या पूर्वेकडील समुद्रकिनारी धडकले होते. त्या वेळी हवेचा वेग ९० कि.मी. प्रतिघंटा होता. त्यामुळे तमिळनाडूतील चेन्नईसह ७ जिल्ह्यांत, तसेच पुद्दुचेरी, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यांतील सागरी किनारी भागात जोरदार पाऊस झाला.

चेन्नईच्या समुद्रकिनारी एक मीटर उंचीच्या लाटा धडकत होत्या. चक्रीवादळापासून विमानांचे संरक्षण करण्यासाठी चेन्नईचे विमानतळ दुपारी १२.३० ते सायंकाळी ७ पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. रात्रीही जोरदार पाऊस चालू राहिल्याने १ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजेपर्यंत उड्डाणे बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला होता. त्यामुळे चेन्नईतून ५५ विमानांची उड्डाणे रहित करावी लागली, तर बाहेरहून येणारी १२ विमाने बेंगळुरूच्या विमानतळावर वळवण्यात आली. चेन्नई विज्ञान केंद्राच्या मते अजून ३ दिवस पावसाचा जोर रहाण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार चक्रीवादळामुळे तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांत पावसाची शक्यता आहे.