कुंभमेळ्यामुळे कोरोना देशभर पसरला, असे खोटे पसरवून साधूसंतांवर लांच्छन लावणे, हे महापापच ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘कुंभमेळ्याच्या अपकीर्तीचे राजकीय षड्यंत्र !’ या विषयावर विशेष चर्चासत्र

मागील सवा वर्षापासून सर्वत्र कोरोनासारख्या महामारीचा सामना करावा लागत आहे. या वैश्‍विक संकटकाळातही समाजातील काही घटक या महामारीच्या आधाराने हिंदु धर्म आणि हिंदु परंपरा यांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण विश्‍वातील हिंदूंसाठी ‘कुंभमेळा’ हा महत्त्वपूर्ण आहे. काही दिवसांपूर्वी सेक्युलरवादी (धर्मनिरपेक्ष), साम्यवादी आणि बॉलीवूडचे निर्माते अन् अभिनेते यांनी भारतातील कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेला ‘कुंभमेळा’ कारणीभूत असल्याचा कांगावा केला. या हेतूने साम्यवाद्यांनी अयोग्य पद्धतीने सामाजिक माध्यमांवर अभियान चालवले. तसेच ‘टूलकीट’च्या माध्यमातून कुंभमेळ्याला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादांतर्गत ‘कुंभमेळ्याच्या अपकीर्तीचे राजकीय षड्यंत्र !’ या विषयावर नुकतेच चर्चासत्र घेण्यात आले. या कार्यक्रमात ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, ‘जम्बो टॉक’ या यू ट्यूब वाहिनीचे संचालक श्री. निधीश गोयल, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता राजेंद्र वर्मा आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. कार्तिक साळुंके आणि श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम ४ सहस्र ५०० हून अधिक जणांनी पाहिला.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

सोलापूर – स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक प्रसिद्धीमाध्यमे अन् लेखक विदेशी शक्तींना विकले गेलेले आहेत. ते भारतीय संस्कृती, श्रद्धास्थाने, धर्मपरंपरा आणि हिंदु धर्म यांना सातत्याने अपकीर्त करत आहेत. यातून ते जाणीवपूर्वक देशाला अस्थिर करू पहात आहेत. त्यांचे हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरि यांना विनंती करून कुंभमेळा थांबवण्याचे आवाहन केले. महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरि यांनी राष्ट्रीय आपत्ती लक्षात घेऊन कुंभमेळ्याचा कालावधी शेष असूनही त्वरित हरिद्वार क्षेत्र रिकामे करत कुंभचे समापन केले. यानंतर हरिद्वारातील अनेक मठ, रस्ते रिकामे झाले होते. यासाठी खरेतर साधूसंतांचे अभिनंदन करायला हवे, त्याऐवजी ‘त्यांनी देशभर कोरोना संसर्ग पसरवला’, असा दुष्प्रचार करणे, हे महापाप आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तराठवर प्रयत्न चालू आहेत; मात्र अशा प्रकारे खोटी माहिती प्रसारित करून कुंभमेळ्याला अपकीर्त करण्यामागील राजकारण घातक आहे. त्यावर विश्‍वास न ठेवता अपकीर्ती करणार्‍यांचा घटनात्मक मार्गाने विरोध करा, असे मार्गदर्शन ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी केले.

‘टूलकीट’चा वापर करून आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि त्यांचे हस्तक यांनी कुंभमेळ्याविषयी अपप्रचार केला ! – निधीश गोयल, संचालक, ‘जम्बो टॉक’ यू ट्यूब वाहिनी

श्री. निधीश गोयल

१. भारतात पूर्वीपासून ‘टूलकीट’चा वापर लोकांमध्ये घृणा, वैमनस्य पसरवण्यासाठी होत आहे. या माध्यमातून समाजात विष पसरवण्याचे कार्य केले जाते. अशाच पद्धतीने ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘टाइम’, ‘अल जझिरा’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी ‘कोरोना संसर्ग पसरवण्यासाठी भारतातील हिंदु सण कारणीभूत’, अशा पद्धतीने कुंभमेळ्याविषयी अपप्रचार करण्यास प्रारंभ केला आणि त्यानंतर देशातील त्यांच्या हस्तकांनी अपप्रचार चालू केला. त्यामुळे हिंदु राष्ट्राची मागणी आणि ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर चर्चा सातत्याने होणे आवश्यक आहे.

२. निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसक आक्रमणे झाल्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला नाही; मात्र ‘टूलकीट’प्रकरणी ‘ट्विटर’च्या देहली येथील कार्यालयावर पोलिसांनी कारवाई केल्यावर लगेच काँग्रेसने आक्षेप घेतला, हे समजून घेतले पाहिजे.

३. हिंदु जनजागृती समितीचे १५ लाखांहून अधिक ‘फॉलोअर्स’ असलेले फेसबूक पेज बंद करण्यात आले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सामाजिक प्रसारमाध्यमातील ‘अकाऊंट’ना ब्लॉक करण्यात आले. हे धाडस आस्थापनांकडे कुठून आले ? याला कोणताही एक राजकीय पक्ष कारणीभूत नसून हे एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे.

४. भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणार, याची भीती असणार्‍या काही शक्ती यामागे कारणीभूत आहेत. ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ याविषयावरही चर्चा होऊ नये, असेच या शक्तींना वाटते. भारत हिंदु राष्ट्र झाले आणि येथील लहान मुले ‘रामायण’, ‘महाभारत’ शिकल्यास देशाला विश्‍वगुरु होण्यावाचून कुणी रोखू शकणार नाही, अशी भीती या लोकांना वाटते. त्यामुळे विविध माध्यमांतून हिंदु धर्माला विरोध होत आहे.

५. ‘काय योग्य आणि काय अयोग्य ?’, हे आता समाजाने स्वत:हून समजून घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाविषयीची वस्तूस्थिती ठाऊक असूनही कोरोना संसर्गाला  ‘चिनी व्हायरस’ म्हणण्यास लाज का वाटते ? हिंदूंनी शांतपणे अन्याय सहन केल्यास त्यांच्यावरील अत्याचार आणि अन्यायाच्या घटना थांबणार नाहीत.

हिंदू मतभेद दूर करून संघटित झाल्यास विरोधी शक्तींचा पराभव निश्‍चित ! – अधिवक्ता राजेंद्र वर्मा, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता राजेंद्र वर्मा

हिंदूंची संस्कृती आणि धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि कुंभमेळा यांचे आध्यात्मिक महत्त्व हे विश्‍वात अद्वितीय आहे. आपल्या राज्यघटनेत श्रीराम, श्रीकृष्ण आणि हिंदुत्वाविषयीची अनेक चित्रे आहेत. कुणीही हिंदु देवतांची विटंबना केल्यास त्याला कायद्याने विरोध करता येतो. आपण आपल्या मुलांना भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व यांविषयी ज्ञान देतो का ? याचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. कुंभमेळ्यासारख्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाई करता येते. सर्व हिंदूंनी संघटित होऊन स्वत:तील मतभेद प्रथम दूर करायला हवेत. हिंदू संघटित झाल्यास विरोधी शक्तींचा पराभव निश्‍चित होईल.

कुंभमेळ्याची अपकीर्ती करणारे लोक बंगाल येथील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराविषयी शांत का ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

१. हरिद्वार कुंभमेळ्याला कोरोनाचा संसर्ग वाढवण्यासाठी कारणीभूत ठरवून काँग्रेसने घृणास्पद राजकारण केले आहे. यावरून काँग्रेस पक्षाची हीनता दिसून येते. काँग्रेसने हिंदु धर्माविषयी प्रथमच अपप्रचार केला आहे, असे नाही, तर यापूर्वीही काँग्रेसने असे प्रयत्न केलेले आहेत. अचानकपणे हिंदूंच्या कुंभमेळ्याची अपकीर्ती कशी चालू झाली ? तसेच अभिनेत्यांनी कुंभमेळ्याची अपकीर्ती करणे कसे चालू केले ? हेच अभिनेते आणि काँग्रेसवाले मरकजविषयी तबलिगी किंवा बंगाल येथे हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात काही बोलत नाहीत, हेही सर्वसामान्य हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे.

२. हरिद्वार आणि मरकज यांची तुलनाच होऊ शकत नाही अन् अशी तुलना कुणी करत असल्यास ते अयोग्य आहे. जे लोक मरकजचे समर्थन करत होते, तेच लोक आज कुंभचा विरोध करत आहेत. मरकजमध्ये आलेल्या लोकांनी कोणत्याही प्रकारची अनुमती घेतलेली नव्हती. त्यामुळे त्यामध्ये सहभागी झालेल्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. अनेक तबलीगींनी कोरोना असल्याचे लपवले. यातूनच त्यांनी जाणीवपूर्वक कोरोना पसरवण्याचा प्रयत्न केला, हे सर्वजण जाणतात. त्यामुळे मरकजशी कुंभची तुलना होऊच शकत नाही. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनीही ‘कुंभची तुलना मरकजशी होऊ शकत नाही’, असे सांगितले आहे.

३. याउलट कुंभमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले होते. साधू-संत यांनीही कोरोनाविषयीची सर्व काळजी घेतली होती, तसेच अनेक मठ-आश्रमांत कोरोना ‘निगेटिव्ह’ (नकारात्मक) प्रमाणपत्र प्रवेशासाठी बंधनकारक असल्याचे फलक लावलेले होते. इतकी काळजी घेऊनही कुंभला अपकीर्त का केले जात आहे ? ‘टूलकीट’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कुंभची अपकीर्ती करण्यात आली. काँग्रेसशासित क्षेत्रांत ईदच्या निमित्ताने दळणवळण बंदीचे नियम शिथिल केले जातात; मात्र त्याविषयी कुठेही बोलले जात नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि यामध्ये सहभागी प्रसारमाध्यमे यांनी संपूर्ण देशाची क्षमा मागायला हवी. याचसमवेत हिंदूंच्या धार्मिक भावनांवर सातत्याने आघात करणार्‍या काँग्रेस पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने रहित करावी.

४. दैनिक ‘जागरण’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे की, कुंभमेळ्याच्या निमित्ताने महाशिवरात्रीच्या दिवशी ३२ लाखांहून अधिक भाविक हरिद्वार येथे आले होते. त्यानंतर २० दिवसांनी कोरोना किती प्रमाणात पसरला, याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्या वेळी केवळ २९३ रुग्ण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आढळून आले, तर त्यातील केवळ ७० रुग्ण हरिद्वार येथील होते. यावरून ‘कुंभमुळे कोरोना पसरला’, असा आरोप करत प्रसारमाध्यमे किती अयोग्य विचारधारा पसरवत होते, हे लक्षात येते.

५. हिंदुद्वेषी किंवा साम्यवादी यांनी हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केल्यास देशातील कोट्यवधी हिंदू संघटित होऊन विरोध करतील. या देशातील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी हिंदुद्वेेष करणार्‍याच्या विरोधात तत्परता दाखवून त्याचा घटनात्मक मार्गाने विरोध करणे आणि त्याला जाब विचारणे आवश्यक आहे. असे झाल्यास हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही.

टूलकीट म्हणजे काय ?

टूलकीट शेतकरी आंदोलनासाठी समर्थकांची संख्या कशा प्रकारे वाढवता येईल ? या मार्गदर्शक तत्त्वाची सूची आहे. सामाजिक माध्यमांवर आवाहन करतांना कोणत्या ‘हॅशटॅग’चा वापर करण्यात यावा ? आंदोलन करत असतांना काही अडचण आल्यास कुणाशी संपर्क करावा ? आंदोलनात काय करावे आणि काय करू नये ? या सर्व गोष्टी त्यात समजावून सांगण्यात आल्या आहेत.