Dr. Manmohan Singh Funeral : डॉ. मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावर २८ डिसेंबरला अंत्यसंस्कार

देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह व त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे २६ डिसेंबरच्या रात्री निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. ते दीर्घकाळ आजारी होते. घरीच बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना रात्री देहलीच्या एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथेच रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या, २८ डिसेंबर या दिवशी देहलीत शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव येथील काँग्रेस कार्यालयात काही वेळ ठेवण्यात येणार आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे. सकाळी ११ वाजता मंत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. दुसरीकडे बेळगाव येथे चालू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक रहित करण्यात आली आहे. काँग्रेस स्थापनादिनाचे कार्यक्रमही रहित करण्यात आले आहेत. पक्षाचे कार्यक्रम ३ जानेवारीनंतर प्रारंभ होतील.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा जीवन परिचय

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म २ सप्टेंबर १९३२ या दिवशी आताच्या पाकमधील पंजाब प्रांतातील एका गावात झाला होता. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण पंजाब आणि पेशावर येथील प्राथमिक शाळांत झाले. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय भारतातील पंजाबच्या अमृतसरमध्ये आले. येथे त्यांनी मॅट्रिक परीक्षा पूर्ण केली. नंतर पंजाब विद्यापिठातून अर्थशास्त्रात एम्.ए. केले. यानंतर पुढील अभ्यासासाठी ते परदेशात गेले. त्यांनी केंब्रिज विद्यापिठातून अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी सन्मान पदवी मिळवली. तसेच ऑक्सफोर्ड विद्यापिठातून डी.फीलची पदवी मिळवली. ते पंजाब विद्यापिठातील अर्थशास्त्रााचे वरिष्ठ व्याख्याते होते. यासह त्यांनी देहली विद्यापिठाच्या ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिकवण्याचे कामही केले. ते नियोजन आयोगाचे सदस्य आणि नंतर उपाध्यक्षही राहिले होते. भारतात ते रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर होते. तसेच वर्ष १९९१ मध्ये पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते. याच वेळी त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण बनवले. वर्ष २००४ मध्ये आणि परत वर्ष २००९ मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ‘राईट टू एज्युकेशन’ (शिक्षणाचा अधिकार), राईट टू इन्फॉरमेशन (माहिती अधिकार) आदी निर्णय घेतले. ते देशातील पहिले शीख आणि सर्वाधिक काळ सेवा करणारे चौथे पंतप्रधान होते.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

डॉ. मनमोहन सिंह यांनी आर्थिक संकटाने घेरलेल्या देशात नव्या अर्थव्यवस्थेचा मार्ग मोकळा केला ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशवासियांच्या वतीने मी डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

पक्षीय राजकारणाच्या वर उठून त्यांनी प्रत्येक पक्षातील लोकांशी संपर्क ठेवला आणि ते सहज उपलब्ध राहिले. देहलीत आल्यानंतरही मी त्यांना भेटायचो. त्यांच्यासमवेत  झालेल्या माझ्या भेटीगाठी आणि चर्चा मला नेहमी आठवतील. या कठीण काळात मी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करतो. मी सर्व देशवासियांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. मनमोहन सिंह यांनी आर्थिक संकटाने घेरलेल्या देशात नव्या अर्थव्यवस्थेचा मार्ग मोकळा केला. त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांची जनतेशी आणि देशाच्या विकासाची बांधिलकी नेहमीच आदराने पाहिली जाईल. त्यांचे जीवन त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि साधेपणाचे प्रतिबिंब होते. त्यांची नम्रता आणि सौम्यता हे त्यांच्या संसदीय जीवनाचे वैशिष्ट्य ठरले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, मी माझे मार्गदर्शक आणि गुरु गमावले.

डॉ. मनमोहन सिंह भारतीय अर्थव्यवस्थेचे आधुनिक निर्माते ! – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांचे जाणे महान देशासाठी आणि वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हानी आहे. मी त्यांना वर्षानुवर्षेपासून ओळखत होतो. मी त्यांना राष्ट्रपती भवनात भेटायचो. ते सौम्यतेचे प्रतीक होते. ते भारतीय अर्थव्यवस्थेचे आधुनिक शिल्पकार होते.

मनमोहन सिंह यांचे देशासाठीचे योगदान सदैव स्मरणात राहील ! – रा.स्व. संघ

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी शोक व्यक्त केला. संयुक्त निवेदनात ते म्हणाले की, मनमोहन सिंह एका सामान्य कुटुंबातून आले आणि देशातील सर्वोच्च पदावर पोचले. ते प्रसिद्ध अर्थतज्ञ होते. त्यांचे योगदान देश सदैव लक्षात ठेवेल. ईश्‍वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

भारत-अमेरिका संबंधांचे महान समर्थक ! – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करतांना ‘भारत-अमेरिका संबंधांचे महान समर्थक’ असा त्यांचा उल्लेख केला. ‘गेल्या २ दशकांतील भारत आणि अमेरिका यांच्या द्विपक्षीय कामगिरीचा पाया मनमोहन सिंह यांचे कार्य होते, असे ब्लिंकन यांनी म्हटले.

कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी म्हटले की, डॉ. मनमोहन सिंह विलक्षण बुद्धीमत्ता, प्रामाणिकपणा आणि शहाणपणा असणारे व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या मृत्यूमुळे मला वैयक्तिकरित्या खूप दुःख झाले आहे.

जागतिक माध्यमांनी प्रसिद्ध केले लेख !

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर जागतिक माध्यमांमध्ये अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

  • ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकी वृत्तपत्राने त्यांचे वर्णन ‘मृदुभाषी आणि बुद्धीवंत’ असे केले आहे.
  • ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने ‘मोठे पालट घडवून आणणारा नेता’ असे म्हटले आहे.
  • बीबीसीने ‘आर्थिक सुधारणांचे प्रणेते’ म्हणून वर्णन केले.
  • ‘द गार्डियन’ने डॉ. मनमोहन सिंग यांना ‘अनिच्छुक पंतप्रधान’ म्हटले आहे.