SP leader Occupied Kannauj ShivTemple : कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाचे नेते कैश खान यांनी प्राचीन शिवमंदिरावर मिळवले नियंत्रण

  • शिवलिंग आणि मूर्ती विहिरीत फेकल्या

  • विरोध करणार्‍या हिंदूंना खोट्या खटल्यांमध्ये अडकवण्याची दिली धमकी  

श्री जागेश्‍वरनाथ शिवमंदिर

कन्नौज (उत्तरप्रदेश) – येथील बालापीर परिसरातील २०० वर्षे जुन्या श्री जागेश्‍वरनाथ शिवमंदिरावर अतिक्रमण केल्याची घटना उघडकीस आली आहे. समाजवादी पक्षाचे नेते कैश खान यांनी प्राचीन जागेश्‍वरनाथ शिवमंदिरावर नियंत्रण मिळवले आहे आणि तेथे ३ मजली घर बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक आणि भाजपचे नेते यांनी दावा केला आहे की, समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात मंदिरातून शिवलिंग आणि मूर्ती काढून विहिरीत फेकल्या गेल्या आणि त्यावर बांधकाम करण्यात आले.

१. जेव्हा स्थानिकांनी कैश खान यांच्या अतिक्रमणाला विरोध केला, तेव्हा कैश खान यांनी त्यांना धमकावले आणि त्यांना खोट्या खटल्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर भुरा खान आणि इतर स्थानिक रहिवासी यांनी या प्रकरणाची तक्रार भाजपच्या नेत्यांकडे केली. भाजपचे माजी खासदार सुब्रत पाठक, तिर्वा मतदारसंघाचे आमदार कैलाश राजपूत आणि इतर कार्यकर्ते यांनी २६ डिसेंबर या दिवशी घटनास्थळी भेट दिली.

समाजवादी पक्षाचे नेते कैश खान

२. भाजपचे नेते म्हणाले की, जर येथील विहीर खोदली गेली, तर त्यात शिवलिंग आणि इतर मूर्ती आढळू शकतात. हे थेट हिंदु धर्मावर आक्रमण आहे.

३. माजी खासदारांनी जिल्हाधिकारी शुभ्रांतकुमार शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मंदिराची भूमी हडप करणार्‍या नेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

४. जिल्हाधिकारी शुक्ला यांनी आश्‍वासन दिले की, अधिकार्‍यांचे एक पथक लवकरच घटनास्थळी पाठवले जाईल आणि चौकशी केली जाईल. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी आशिष कुमार यांच्याकडे अन्वेषण सोपवले. २ दिवसांत अहवाल मागवण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

५. माजी खासदार सुब्रत पाठक म्हणाले की, जर प्रशासनाने मंदिर मुक्त करण्यासाठी आणि शिवलिंग पुनर्स्थापित करण्यासाठी कारवाई केली नाही, तर माझ्या समर्थकांसह मी बालापीर मोहल्ला येथे धरणे आंदोलन करणार आहे.

६. विश्‍व हिंदु परिषदेने मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली. ‘अशा घटनांमुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात’, असे विहिंपने म्हटले आहे.

७. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, कैश यांनी ही भूमी विकत घेतली आहे आणि धार्मिक स्थळ अजूनही सुरक्षित आहे. भाजप वातावरण बिघडवत आहे, असा आरोप त्यांनी केला.

संपादकीय भूमिका

  • अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा बांगलादेश येथे नाही, तर हिंदूबहुल उत्तरप्रदेशातील ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद ! देशातील मुसलमानबहुल भागांतील हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासाठी हिंदूंनी सरकारांवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
  • धर्मांध आणि हिंदुद्वेष्टे नेते यांचा भरणा असलेला समाजवादी पक्ष सामाजिक शांतता काय प्रस्थापित करणार ? हा पक्ष हिंदूंसाठी धोकादायक !