डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने उमदा प्रशासक आणि अर्थतज्ञ गमावला ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डावीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. मनमोहन सिंह

मुंबई – भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक आणि अर्थतज्ञ गमावला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारताच्या राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपुल लेखनही त्यांनी केले आहे. त्यांनी केलेले कार्य देशवासियांच्या स्मरणात कायम राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो, अशी शोक संवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त केली.

ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. मनमोहन सिंह यांनी आधी वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असतांना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावले उचलली. अर्थव्यवस्थेचे दरवाजे खुले करत नवी आर्थिक क्रांती आणली. साध्या, सरळ आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणार्‍या मनमोहन सिंह यांनी नामवंत अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवली होती. त्यांच्या निधनाने धोरणी आणि हुशार असा अर्थतज्ञ अन् दूरदृष्टी असलेले राजकीय नेतृत्व हरपले आहे.

जागतिक मंदीतही भारताची अर्थव्यवस्था भक्कमपणे उभी राहिली, याचे श्रेय डॉ. मनमोहन सिंह यांना जाते ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण यांच्या वाटेवर नेण्याचा क्रांतीकारी निर्णय घेणारे अन् तो निर्णय यशस्वी करून दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक अन् आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहन सिंह यांनी रचला. गेल्या अनेक दशकांत आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीतही भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचे बहुतांश श्रेय डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांना जाते.