शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला गळती : कोणताही अनुचित प्रकार नाही !


मिरज, ३ जून – शहरातील शासकीय कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला २ जून या दिवशी सायंकाळी अचानक छोटीसी गळती लागली. याच्या देखभाल दुरुस्तीसाठी असलेल्या कर्मचार्‍याच्या निदर्शनास आल्यावर त्याने काही मिनिटातच सहकारी कर्मचार्‍यांच्या साहाय्याने ही गळती तात्काळ रोखली. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यानंतर अग्निशमन दलासह रुग्णालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती रुग्णालयातील नातेवाइकांना समजताच तेही या ठिकाणी उपस्थित झाले. घटना छोटी असतांना अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आणि लोकांची गर्दी आणखी वाढली. (एखाद्या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता त्याचे अफवेत रूपांतर होईपर्यंत संयम न बाळगू शकणारे नागरिक आपत्काळात मोठ्या आपत्तींना तोंड कसे देणार ? यावरून सामान्य नागरिकांनाही आपत्कालीन प्रशिक्षणाची किती आवश्यकता आहे ते लक्षात येते ! – संपादक)

या संदर्भात प्रांताधिकारी समीर शिंगटे म्हणाले, ‘‘या गळतीची महसूल विभागाने गंभीर नोंद घेतली आहे. या घटनेचा अहवाल रुग्णालय प्रशासनाकडून मागवण्यात आला आहे.’’