व्यक्तीला येणारा तणाव आणि वैद्यकीय दृष्टीकोनातून ध्यानामुळे होणारे लाभ !

‘काही विकार न उद्भवणे आणि झाल्यास ते नियंत्रणात रहाणे’, यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ‘काही विकार होणे किंवा ते नियंत्रणात न रहाणे’, याला जीवनातील तणाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. ‘जीवनातील तणाव देहक्रियांवर कसा परिणाम करतो ? आणि त्यातून नंतर विकार कसे उद्भवतात ?’ अन् ‘ध्यानामुळे त्यावर नेमका कसा उपाय होतो ?’, हे समजून घेतले, तर ध्यान परिणामकारक होण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करू. या लेखात आपण ‘तणावासंबंधी काही सूत्रे आणि वैद्यकीय दृष्टीने ध्यानाचे लाभ’ यांविषयी थोडक्यात जाणून घेऊया. २१ डिसेंबर या ‘जागतिक ध्यान दिना’पासून प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘तणावासंबंधी काही सूत्रे आणि वैद्यकीय दृष्टीने ध्यानाचे लाभ अन् तणावाला प्रतिसाद देणारी शरीरक्रियेची अंगे अणि त्यांची वैशिष्ट्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.           

(भाग ३)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/866056.html

३ आ. स्वायत्त चेतासंस्थेच्या कार्यासंबंधी महत्त्वाची सूत्रे : ‘स्वायत्त चेतासंस्थेच्या व्यवस्थेमध्ये मेंदूतील ‘हायपोथॅलॅमस’ हा भाग एक प्रकारचा नियंत्रण कक्ष (कमांड सेंटर) आहे. मेंदूचा हा भाग स्वायत्त चेतासंस्थेद्वारे, म्हणजे तिच्या नसांद्वारे शरिराच्या बाकीच्या भागांशी संवाद साधतो. तो ‘श्वसन, रक्तदाब, हृदयाचे ठोके योग्य राखणे आणि फुप्फुसांमधील मुख्य रक्तवाहिन्या अन् लहान वायूमार्ग (ब्रॉन्किओल्स) यांचे आकुंचन-प्रसरण’, यांसारख्या अनैच्छिक शारीरिक कार्यांचे नियंत्रण करतो.

३ आ १. स्वायत्त चेतासंस्थेची दोन अंगे आणि त्यासापेक्ष तणाव प्रतिसादाचे प्रकार   

३ आ १ अ. सहानुभूती (सिंपथॅटिक) चेतासंस्था : या चेतासंस्थेची सक्रीयता ‘कार’मधील ‘एक्सीलरेटर पेडल’सारखे कार्य करते. परिस्थितीकडून धोक्याचा संकेत मिळताच ती तणाव प्रतिसाद चालू करते. हा प्रतिसाद ‘संघर्ष किंवा पलायन (fight or flight) करणे’, या प्रकारचा असतो, म्हणजे शरीर त्वरित धोक्याच्या आव्हानाशी लढण्यासाठी किंवा धोक्यापासून पळून जाण्यासाठी सिद्ध होते. यासाठी पुष्कळ अधिक ऊर्जा लागते. सामान्यपणे तणाव प्रतिसाद या संज्ञेतून हा प्रतिसाद गृहित धरलेला आहे. तणाव प्रतिसाद जेव्हा सहानुभूती चेतासंस्थेला सक्रीय करतो, तेव्हा ‘हृदयाचे ठोके जलद होणे, जलद आणि उथळ श्वसन, उच्च रक्तदाब’ इत्यादी परिणाम होतात. सामान्यतः हे परिणाम अल्पकालीन असतात आणि परिस्थिती पालटून तणावमुक्त झाल्यानंतर न्यून होतात.

डॉ. दुर्गेश सामंत

३ आ १ अ १. तणावापासून वाचवण्यासाठी मेंदूकडून होणार्‍या प्रयत्नांची त्रासदायक बाजू : परत परत तणावजनक परिस्थिती निर्माण होऊ लागल्यास मेंदू धोकादायक परिस्थितीविषयीच्या जाणिवांच्या संदेशांसंबंधीच्या संवेदनशीलतेची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मेंदू आपल्या लक्षात येणार्‍या जाणिवा अल्पऐवजी मध्यम तीव्रतेच्या संवेदनेच्या पातळीला राखण्याचा प्रयत्न करतो, उदा. आई-वडिलांच्या मोठ्या आवाजात परत परत होत असणार्‍या भांडणाविषयीची लहान मुलाची संवेदनशीलता. आरंभी लहान मूल घाबरते. नंतर हे नेहमीचेच आहे; म्हणून दुर्लक्ष करते; परंतु त्याच्यावर अंतस्थ परिणाम होत रहातो. मग त्याच्या परिस्थिती समजून घेण्याच्या जाणिवा बोथट होतात. ते मूल जेवतांनाही किरकिर करत जेवते. अशा प्रकारे होणार्‍या संवेदनशीलतेसंबंधीच्या मर्यादेच्या (threshold) वाढीमुळे मेंदू परिस्थितीमध्ये उत्पन्न होणार्‍या चांगल्या संवेदनांविषयीही बोथट होतो, म्हणजे मेंदूकडून त्या संवेदना पकडल्या जाऊन त्यानुसार शरिरात प्रतिसाद निर्माण होत नाही. त्या संवेदना तो गमावतो. त्यामुळे शरिरात सकारात्मक प्रतिसाद उत्पन्नच होत नाहीत आणि त्रासदायक ठरतील असे तणाव प्रतिसाद उत्पन्न होत रहातात. त्यांचा प्रभाव न्यून करील, असा चांगला प्रतिसाद शरिरात निर्माण होत नाही. या समस्येवर सोपा उपाय आहे, तो म्हणजे सकारात्मकता वाढवणे. ‘आपल्या जीवनात काय सकारात्मक आहे ?’, हे प्रतिदिन लक्षात घ्यावे. विश्वाप्रती कृतज्ञ असावे. नित्य जीवनातील सकारात्मक पैलू शोधून त्यांवर लक्ष केंद्रित करावे. ‘असे होत नसणे’, हे घराघरांत असणार्‍या असमाधानतेचे एक कारण आहे.

३ आ १ आ. परासंवेदनात्मक (पॅरासिंपथॅटिक) चेतासंस्था : सहानुभूती चेतासंस्थेच्या प्रतिसादाच्या उलट या संस्थेचे कार्य असते. या चेतासंस्थेची सक्रीयता ‘कार’मधील ‘ब्रेक’सारखे काम करते. ती धोका दूर झाल्यानंतर शरिरास शांत करणारा ‘विश्राम आणि पचन किंवा चर्वण’, या प्रकारचा प्रतिसाद चालू करते. ‘वाढलेला रक्तदाब न्यून होणे, हृदयाची वाढलेली गती न्यून होणे’, अशा स्वरूपाचा हा प्रतिसाद असतो.’ (क्रमशः) (१७.१२.२०२४)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, रामनाथी, गोवा.