व्यक्तीला येणारा तणाव आणि वैद्यकीय दृष्टीकोनातून ध्यानामुळे होणारे लाभ !

‘काही विकार न उद्भवणे आणि झाल्यास ते नियंत्रणात रहाणे’, यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ‘काही विकार होणे किंवा ते नियंत्रणात न रहाणे’, याला जीवनातील तणाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. ‘जीवनातील तणाव देहक्रियांवर कसा परिणाम करतो ? आणि त्यातून नंतर विकार कसे उद्भवतात ?’ अन् ‘ध्यानामुळे त्यावर नेमका कसा उपाय होतो ?’, हे समजून घेतले, तर ध्यान परिणामकारक होण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करू. या लेखात आपण ‘तणावासंबंधी काही सूत्रे आणि वैद्यकीय दृष्टीने ध्यानाचे लाभ’ यांविषयी थोडक्यात जाणून घेऊया. २१ डिसेंबर या ‘जागतिक ध्यान दिना’च्या दिवशीपासून प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘तणावासंबंधी काही सूत्रे आणि वैद्यकीय दृष्टीने ध्यानाचे लाभ अन् तणावाला प्रतिसाद देणारी शरीरक्रियेची अंगे अणि त्यांची वैशिष्ट्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. 

(भाग ४)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/866477.html

४. दीघर्कालीन तणावामुळे तणाव प्रतिसादाची वारंवारता वाढून आजार होणे 

‘परत परत निर्माण होणारा तणाव किंवा दीर्घकालीन अविरत तणाव यांमुळे निर्माण होणारा सहानुभूती स्वायत्त चेतासंस्थेचा वर उल्लेखित प्रतिसाद शरिरात जणू कायमचा होऊन बसतो. काही कारणाने व्यक्ती आधीच भावनिक दृष्टीने अतिसंवेदनशील असतांना तर सकृतदर्शनी अतिसामान्य वाटणार्‍या घटनांच्या संदर्भातसुद्धा आणीबाणीचे संकेत शरिराच्या अन्य यंत्रणांना जातात. त्यामुळे ‘उच्च रक्तदाब, हृदयविकार, अतिभीती (पॅनिक), परत परत अर्धशिशी होणे’, अशा प्रकारचे आजार होतात.

४ अ. अंतर्स्रावी ग्रंथींचा तणाव प्रतिसाद : तणावामुळे मेंदूकडून प्राप्त संवेदनांमुळे शरिरात विशिष्ट प्रकारचे अंतर्स्राव (हार्मोन्स) वाढतात. त्यामुळे स्नायू आणि मेंदू यांना ऊर्जा मिळते, तसेच ऊतींची (पेशींचा समूह) सुधारणा करणार्‍या पदार्थांची उपलब्धता वाढते. हे घडतांनाच रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. ‘पचनसंस्था, प्रजननसंस्था, तसेच शरिराची वाढ होणे किंवा शरिराचे योग्य पोषण होणे’, यांवर परिणाम होतो. दीर्घकालीन तणावाच्या अधीन झाल्याने रक्तातील शर्करा आणि चरबी यांचे प्रमाण अधिक रहाण्याची शक्यता वाढते. मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

डॉ. दुर्गेश सामंत

४ आ. तणावामुळे रोगप्रतिकारक शक्तीतील पालट : तणाव शरिरातील विशिष्ट रोगप्रतिकारक पेशींच्या क्षमतेवर प्रभाव टाकतो. त्यामुळे जंतू आणि विषाणू यांच्या संसर्गाशी लढण्याची शरिराची क्षमता न्यून होते. तणावामुळे निर्माण झालेला अंतर्स्रावाच्या प्रमाणातील पालट रोगप्रतिकारक द्रव्यांनाही काही प्रमाणात दडपतो, उदा. तणावपूर्ण स्थितीमध्ये IgA वर्गातील ‘अँटीबॉडीज्’ची (टीप १) लाळेतील पातळी लक्षणीय घटते.

टीप १ – ‘अँटीबॉडीज्’ म्हणजे शरिरातील रक्त, लाळ यांसारख्या द्रव पदार्थांत असणारी रक्षाप्रथिने. ही रक्षाप्रथिने शरिरात शिरलेले जंतू, तसेच अन्य पदार्थ यांपासून शरिराचे रक्षण करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या रासायनिक वर्गीकरणानुसार IgA (Immuniglobulin A) हा एक प्रकार आहे.

विशेषतः तणाव दीर्घकालीन वाढलेला असल्यास तो ऊतींमध्ये सूज वाढवतो. अशी दीर्घकालीन सूज रक्तवाहिन्यांचे काठिण्य वाढवते. त्यामुळेही दीर्घकालीन तणाव हृदयविकार, रक्तदाब, ‘रूमॅटॉइड आर्थरायटीस (एक प्रकारचा संधिवात)’, इत्यादी आजारांची शक्यता आणि तीव्रता वाढवतो. शरिरातील रोगप्रतिकारक पेशी ‘शरिराचा कर्करोगापासून बचाव व्हावा’, यासाठी कार्यरत असतात, म्हणजे शरिरात कुठेही कर्करोगाची चुकार पेशी निर्माण झाल्यास या रोगप्रतिकारक पेशी तिला नष्ट करत असतात. स्वाभाविकच दीर्घकालीन तणाव ‘कर्करोगाची शक्यता आणि त्याची वाढ होणे’, याची शक्यता वाढवतो.

४ इ. तणावाचा पेशीतील जनुकांवर (जीन्सवर) परिणाम होणे : एखादे दूषित जनुक पेशीत आहे, म्हणजे लगेच त्याच्याशी संबंधित आजार होतोच, असे नाही. ते जनुक तसेच कार्यरत न होता शांत रहाते; मात्र तणावामुळे अशा दूषित जनुकाला कार्यरत होण्यास साहाय्य होऊन त्यामुळे होणारा आजार होऊ शकतो.

५. वर्तमान तणावाची स्थिती

थोडक्यात बर्‍याचदा आजच्या जीवनात सतत समोर येणार्‍या प्रसंगांशी आपण ना लढू शकतो ना त्यापासून पलायन करू शकतो. शरीरक्रिया सतत तणावाच्या अधीन होऊन रहातात. त्यामुळे आपल्याला दीर्घकालीन अविरत तणावाचा फटका बसतो. सध्याच्या काळात आपण ज्या वातावरणात रहातो, ते स्वतः सतत नवीन तणावकारक स्थिती निर्माण करत असते, उदा. मुंबईतील दूर उपनगरात राहून लोकलने प्रवास करणार्‍या नोकरी करणार्‍या गृहिणीचे जीवन. आपल्या शरिराची एकूण व्यवस्था तणावाला आपोआप तोंड देऊ शकेल आणि आपला आजारांपासून बचाव होईल, अशी नाही; म्हणून आपल्याला आपले शरीर अन् मेंदू यांना साहाय्य करण्याचे मार्ग शोधावे लागतात.’

(क्रमशः)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०२४)