विडी आस्थापनाने जाहीर क्षमायाचना न केल्यास कायदेशीर कारवाई करू !

  • शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीची चेतावणी

  • विडीच्या वेष्टनावर गुरु गोविंद सिंह यांचे चित्र

विविध माध्यमांतून धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारी हिंदू, तसेच शीखही करत असतात.सरकार याविषयी कठोर कायदा आणून त्याची कार्यवाही करील का ?
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती

अमृतसर (पंजाब) – विडीच्या वेष्टनावर गुरु गोविंद सिंह यांचे चित्र प्रकाशित केल्याने शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एस्.जी.पी.सी.ने) वेल्लोर (तमिळनाडू) येथील विडी आस्थापनाचा निषेध केला. एस्.जी.पी.सी.ने संबंधित आस्थापनाला पत्र लिहून तात्काळ चित्र काढण्यास आणि जाहीर क्षमा मागण्यास सांगितले. ‘क्षमा न मागितल्यास आस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

सामाजिक माध्यमांतून याविषयीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यामध्ये विडीचे बंडल आणि वेष्टन यांवर गुरु गोविंद सिंह यांचे चित्र मुद्रित केले गेले आहे. एस्.जी.पी.सी.च्या अध्यक्षा बीबी जागीर कौर यांनी ‘या कृतीने शीख बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत’, असे म्हटले आहे.