भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्काळातील संजीवनी  औषधी वनस्पती !

संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील; म्हणून आतापासूनच आपण त्यांच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराhttps://sanatanprabhat.org/marathi/482474.html

भाग ४

७. औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यापूर्वी भूमीसंदर्भातील लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे

७ अ. लागवडीसाठी भूमी निवडतांना पुढे लावण्यात येणार्‍या झाडांच्या मुळांची होणारी वाढ आणि भूमीचे विविध थर यांचा अभ्यास करणे आवश्यक असणे : ‘भूमी, हवामान आणि पीक व्यवस्थापन यांवर झाडांची वाढ अवलंबून असते. औषधी वनस्पतींच्या लागवडीचे योग्य व्यवस्थापन केल्यास लागवड जास्त फलदायी ठरते. बहुसंख्य झाडांची मुळे भूमीत खोलवर जाणारी असतात. मुळे खोलवर जात असतांना ती भूमीच्या विविध थरांतून जात असतात. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी भूमीची निवड करतांना पुढे लावण्यात येणार्‍या वनस्पतींच्या मुळांची होणारी वाढ आणि भूमीतील विविध थर यांचा अभ्यास करणे आवश्यक असते.

७ आ. भूमीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म : एखाद्या वेळेस जी भूमी धान्यपिकांसाठी उत्कृष्ट असते, तीच भूमी या वनस्पतींच्या वाढीसाठी अयोग्य ठरू शकते. यासाठी भूमीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म विचारात घेऊन तिच्यात लावण्याच्या वनौषधीची निवड करावी.

७ आ १. भूमीचे भौतिक गुणधर्म : मातीचा रंग तिचे गुणधर्म दर्शवतो. रंगशास्त्रात तांबडा, पिवळा आणि निळा हे मूलभूत रंग असून त्यांच्या एकमेकांतील न्यूनाधिक मिश्रणाने अनेक रंगछटा निर्माण होतात. भूमी कोणत्या प्रकारच्या खडकापासून निर्माण झाली आहे आणि तिच्यात कोणती खनिजे आहेत, यांवर मातीचा रंग अवलंबून असतो.

७ आ १ अ. भूमीतील खनिजे आणि त्यांमुळे भूमीला प्राप्त होणारा रंग : बहुसंख्य खनिजे, उदा. क्वाटर््झ, फेल्डस्पार ही फिकट रंगाची असतात. लोह, मँगनीज यांसारख्या मूलद्रव्यांमुळे मातीला रंग येतो. तांबडा रंग फेरिक रसायन आणि भरपूर खेळती हवा यांमुळे येतो. मध्यम खेळत्या हवेमुळे भूमीला पिवळसर रंग येतो. खेळत्या हवेमध्ये अडथळे असल्यास हिरव्या रंगाचे फेरस द्रव्य आढळते. मँगनीज आणि सेंद्रिय पदार्थ यांमुळे भूमीला गर्द काळा रंग येतो. रंगाच्या गर्दपणावरून भूमीतील सेंद्रिय पदार्थाच्या (‘ह्यूमस’च्या) प्रमाणाचे अनुमान लावता येते, तसेच भूमीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, तापमान इत्यादी गुणधर्म समजण्यास साहाय्य होते.’

‘जेथे भूमीची धूप होते तेथे भूमीच्या वरच्या थरांचा रंग भुरकट पांढरा किंवा करडा दिसतो. ज्या भूमीत लवणांचे प्रमाण अधिक असेल तेथे तिचा रंग पांढरट भुरकट असा दिसतो. जेथे भूमीतून निचरा योग्य होत नसेल, तेथे पृष्ठभागावरील थरांच्या आणि खालील थरांच्या रंगांत तफावत दिसून येते. पृष्ठभागावरील मातीचा रंग तांबडा असेल आणि खालील थरांचा रंग भुरकट पिवळसर असेल, तर तेथे पाण्याचा निचरा नीट होत नसावा, असे मानले जाते.’ (संदर्भ : मराठी विश्वकोश खंड १३, प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, सचिवालय, मुंबई – ४०००३२)

७ आ १ आ. ‘भूमीचा पोत’ म्हणजे काय ? : ‘भूमीचा पोत’ म्हणजे भूमीतील वाळू (जाड आणि बारीक), गाळ (पोयटा) आणि चिकणमाती यांचे परस्परांशी असणारे प्रमाण. भूमीत या चारही प्रकारच्या मातीचे कण न्यूनाधिक प्रमाणात असतात. त्यांच्या प्रमाणावरून भूमीचा पोत ठरवतात.

भूमीतील पाण्याची चलनवलन क्षमता भूमीच्या पोतावर अवलंबून असते. मातीचे कण जितके सूक्ष्म तितके अधिक पाणी सूक्ष्म कणांतील पोकळीत साठून रहाते. भारी पोताच्या भूमीत बारीक कणांचे प्रमाण, खनिज द्रव्यांचा साठा आणि भूमीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही अधिक असते. म्हणून पिकांच्या दृष्टीने भारी भूमी सुपीक असतात. केशाकर्षणामुळे या भूमीतील पाणी बर्‍याच काळापर्यंत पिकाच्या मुळांना मिळू शकते. हलक्या पोताच्या अथवा वाळूसर भूमीत पाणी फार वेळ राहत नाही. त्यामुळे पिकास दिलेले खत निचर्‍यावाटे बाहेर पडण्याची शक्यता अधिक असते.’ – डॉ. जनार्दन कदम, वृषाली देशमुख (सोलापूर) (संदर्भ : दैनिक ‘लोकसत्ता’, २.३.२०१३)

७ आ १ इ. भूमीचे भौतिक गुणधर्म जाणण्याची आवश्यकता : ‘भूमीच्या भौतिक गुणधर्मावरून भूमीचा प्रकार, पोत आणि घडण समजते. पाणी तुंबून रहाणार्‍या आणि अल्प प्रमाणात हवा खेळती रहाणार्‍या भूमीमध्ये कितीही पोषक द्रव्ये असली, तरी तिच्यामध्ये वनौषधी आणि वनवृक्ष जोमाने वाढत नाहीत.’

७ आ २. भूमीचे रासायनिक गुणधर्म : ‘भूमीचे रासायनिक गुणधर्म हे तिच्यामध्ये असलेल्या पोषक द्रव्यांवर अवलंबून असतात.

७ आ २ अ. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक मूलद्रव्ये : वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक मूलद्रव्यांमध्ये कर्ब (कार्बन), हायड्रोजन, प्राणवायू (ऑक्सिजन), नत्र, स्फुरद, पालाश, मँगनीज, सल्फर, आयर्न, झिंक, ताम्र (कॉपर), मॉलिब्डेनम, सोडीयम, कोबाल्ट इत्यादींचा समावेश असतो.’

७ आ २ आ. ‘भूमीचा सामू’ : ‘भूमीचा सामू’ म्हणजे ‘भूमीचे आम्ल आणि विम्ल (अल्कली) गुण निर्देशित करणारे परिमाण मूल्य’. याला इंग्रजीत ‘पीएच्’ (pH) असे म्हणतात. या मूल्यामुळे मातीतील ‘हायड्रोजन आयन’च्या प्रमाणाचे निर्देशन होते. हे मूल्य १ ते १४ या अंक मोजपट्टीत दर्शवले जाते.’

– डॉ. विठ्ठल चापके, मराठी विज्ञान परिषद (संदर्भ : दैनिक ‘लोकसत्ता’, ६.३.२०१३)

७ आ २ आ १. ‘वनस्पतींना पोषणद्रव्ये किती प्रमाणात उपलब्ध होतील ?’ हे भूमीच्या सामूनुसार ठरत असणे : ‘भूमीने ठेवलेल्या द्रव्यांचा संबंध सामूशी निगडित असतो. सामू ७ पेक्षा अल्प असल्यास ती भूमी ‘आम्लयुक्त’ आणि ७ पेक्षा अधिक असल्यास ‘विम्लयुक्त’ गणली जाते. सर्वसाधारणपणे ६ ते ७ निर्देशांकाच्या भूमी उत्कृष्ट असतात. हलक्या भूमीमधील हा निर्देशांक न्यून-अधिक करता येतो; परंतु भारी भूमीत या निर्देशांकांत पालट करणे अशक्य असते. विम्लयुक्त भूमी पोषक द्रव्ये इतकी घट्ट धरून ठेवतात की, ती द्रव्ये वृक्षांना लवकर उपलब्ध होत नाहीत. कोकण किनारपट्टीच्या तांबड्या भूमी, त्याचप्रमाणे जास्त पावसाच्या हलक्या भूमी यांचा निर्देशांक जास्त असतो. अशा भूमीत जस्त (झिंक), ताम्र, लोह मोठ्या प्रमाणात असूनही वनस्पतींना ती उपलब्ध होत नाहीत.’

(क्रमश:) 

भाग ५ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/483100.html

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’)

आपत्काळाच्या दृष्टीने वनौषधींच्या लागवडीचे महत्त्व दर्शवणारी ही लेखमाला साधक आणि वाचक यांनी संग्रही ठेवावी.

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क: ९३२२३ १५३१७