आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाल्यास कुटुंबाला शासनाकडून २ लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य

गोवा घटकराज्य दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली घोषणा

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ३० मे (वार्ता.) – आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाल्यास संबंधित कुटुंबाला शासनाकडून २ लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. ३५ व्या गोवा घटकराज्य दिनाच्या निमित्ताने गोमंतकियांना ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने संबोधित करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलेली अन्य महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

१. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठी ३ जूनपासून पुन्हा कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. २ वर्षांहून अल्प वय असलेल्या बालकांच्या दोन्ही पालकांना कोरोना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्याधींनी ग्रस्त व्यक्ती, रिक्शा आणि टॅक्सी चालक, मोटरसायकल पायलट, विकलांग आणि खलाशी यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

२. मुख्यमंत्री अनाथ आधार योजनेच्या अंतर्गत अनाथ झालेल्या मुलांसाठी मासिक वेतन योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. इयत्ता १० वी किंवा त्याहून पुढील शिक्षण घेत असलेल्या अनाथ मुलांसाठी विनामूल्य भ्रमणसंगणक (लॅपटॉप) दिला जाणार आहे. मुलांचे संगोपन करणार्‍या संस्थांना १८ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलासाठी वेतन दिले जात होते आणि आता ही वयोमर्यादा वाढवून ती २१ वर्षे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अनाथ आधार योजनेच्या अंतर्गत केवळ कोरोनामुळे दोन्ही पालक मृत्यू पावलेल्या अनाथ मुलांसाठीच नव्हे, तर सर्व अनाथ मुलांसाठी या नवीन योजना लागू होणार आहेत.

३. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या पंचायतींना कोरोना महामारी किंवा चक्रीवादळ या आपत्कालीन स्थितीत आर्थिक साहाय्य म्हणून ५० सहस्र रुपये ३१ मे किंवा १ जूनपर्यंत दिले जाणार आहे.

४. केंद्रशासनाने कोरोना महामारीवरून लागू केलेल्या सर्व योजनांचा गोमंतकातील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

सरकारी कागदपत्रांवरील ‘दमण आणि दीव’ हे शब्द हटवणार

गोवा राज्याला वर्ष १९८७ मध्ये घटकराज्याचा दर्जा मिळाला आणि ‘गोवा, दमण आणि दीव’ मधील ‘दमण आणि दीव’ हे केंद्रशासित प्रदेश निराळे करण्यात आले; मात्र सरकारी कागदपत्रात अजूनही ‘गोवा, दमण आणि दीव’ असाच उल्लेख आहे. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘यापुढे गोव्याच्या नावापुढील ‘दमण आणि दीव’ हे शब्द वगळण्याचे काम राज्याचा कायदा विभाग करणार आहे. सर्व सरकारी कागदपत्रांवर यापुढे केवळ ‘गोवा’ हा शब्दच राहील.’’