पणजी, २९ मे (वार्ता.) – घरी अलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना ‘किट’मध्ये ‘आयुष-६४’ हे आयुर्वेदिक औषध उपलब्ध करण्यात येणार आहे. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘आयुष-६४’ या औषधाच्या वितरणाचा २८ मे या दिवशी शुभारंभ केला.
कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे पुष्कळ प्रभावी ! – श्रीपाद नाईक, केंद्रीयमंत्री
आयुर्वेद ही भारतीय उपचारपद्धत सहस्रो वर्षे जुनी आहे. आयुर्वेदावर संशोधन करणार्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी गेली सुमारे २ वर्षे संशोधन करून नवीन औषधांची निर्मिती केली आहे. अॅलोपॅथी आणि आयुर्वेद यांचे मोजमाप करण्यासाठी एकच पद्धत सध्या वापरली जाते आणि ते चुकीचे आहे. आयुर्वेदाला सहस्रो वर्षे पूर्ण होऊनही ती औषधे आजही जसाच तशी मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. यामुळे आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. आयुर्वेदाने शासनाच्या मागणीनुसार संशोधनाच्या पद्धतीत पालट करून कोरोनावर मात करण्यासाठी औषधाची निर्मिती केली आहे. योगऋषी रामदेव बाबा यांनीही कोरोनावर मात करण्यासाठी ‘कोरोनिल’ औषधाची निर्मिती केली आहे. ही सर्व औषधे कोरोनावर मात करण्यासाठी, तसेच मनुष्यातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहेत.
मोदी शासनाने योगाचा जगभर प्रचार केल्याने अनेक देश कोरोना महामारीच्या विरोधात यशस्वीपणे लढू शकले
मोदी शासनाने योगाचा जगभर प्रचार केल्याने अनेक देश कोरोना महामारीच्या विरोधात यशस्वीपणे लढू शकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ वर्षांपूर्वीपासून ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे जगभरात योगासनांविषयी जागृती निर्माण झाली, असे मत केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी पुढे व्यक्त केले.
‘आयुष-६४’ हे औषध आरोग्य केंद्रांमध्येही उपलब्ध केले जाणार आहे, अशी माहिती स्वत: आयुर्वेदाचे वैद्य असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.