चीनप्रमाणे भारतात कोरोनाच्या संदर्भात कठोर नियम लागू करता येणार नाहीत ! – गुजरात उच्च न्यायालय

कर्णावती – भारताची तुलना केवळ चीनशीच होऊ शकते; पण नागरिकांनी शिस्त पाळण्याच्या संदर्भात चीनमध्ये असलेल्या कठोर नियमांप्रमाणे भारतात तसे नियम लागू करता येणार नाहीत, असे मत गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती भार्गव डी. करिया यांच्या खंडपिठाने एका सुनावणीच्या वेळी व्यक्त केले. न्यायालयाने गुजरातमधील कोरोनाची परिस्थिती आणि त्यासंदर्भातील सूत्रांची नोंद घेत स्वतःहून जनहित याचिका प्रविष्ट करून घेतली. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

न्यायालयाने पुढे म्हटले की, कोरोनाच्या येणार्‍या तिसर्‍या आणि चौथ्या लाटांच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यातील धोका लक्षात घेऊन गुजरात सरकारने आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. लोकांकडून अद्यापही कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पालन होतांना दिसत नाही. राज्याचे अ‍ॅटर्नी जनरल कमल त्रिवेदी यांनी यासंदर्भात राज्याला सिद्धता करण्याची आवश्यकता प्रतिपादित करत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारताची तुलना युरोपीयन देशांशी केली. त्यावर न्यायालयाने चीनने कोरोनासंदर्भात उत्तम काम केल्याचे सांगत त्यामुळेच भारताची तुलना चीनशी होऊ शकते; पण तेथील कठोर नियम भारतात लागू करू शकत नाही, असे मत व्यक्त केले.